आबा म्हणाले, ‘मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला’

महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अजातशत्रू म्हणून जे मोजके नेते म्हणून उल्लेख करता येईल असे मोजके नेते होऊन गेले त्यात आर आर पाटील यांचं नाव हमखास घेता येत.  कोणताही राजकीय वारसा नसलेला एका सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी घरातून आलेला मुलगा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचतो हे नवलच होतं.

पहिल्यांदा आमदारकी जिंकली तेव्हापासून आर आर पाटील हे नाव गाजत होतं. विरोधी पक्षाच्या बाकावरून त्यांनी केलेली भाषण, पुढे ग्राम विकास मंत्री म्हणून गाडगे बाबा ग्रामस्वच्छता योजना, तंटा मुक्ती योजना सारख्या जबरदस्त योजना त्यांनी आणल्या आणि यशस्वीरित्या राबवल्या.

गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाल्यावर हि डान्स बार बंदीसारखे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्यावर चुकीचा व्यवहार केला अशी टीका झाली नाही. अण्णा हजारेंच्या सारखे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते देखील त्यांच्या चारित्र्याची हमी द्यायचे.

आबांचा आणखी एक गाजलेला निर्णय म्हणजे त्यांनी गृहमंत्री असताना स्वीकारलेलं गडचिरोलीचं पालकमंत्रिपद.

नक्षलवादामुळे आबांच्या पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्रीपद देखील राखीव गोष्ट असायची. मंत्र्यांना देखील शिक्षा देण्यासारखा हा प्रकार होता. इथे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्यासाठी देखील पालकमंत्र्यांचे पाय लागत नसत.  

आबांनी विरोधी पक्षाला चॅलेंज म्हणून हे पालकमंत्रिपद स्वीकारलं आणि  तिथला पहिलाच दौरा मोटारसायकलीवरून केला. हा फक्त स्टंट नव्हता तर नक्षलवादाविरुद्ध आपण कटिबद्ध आहोत हा नागरिकांना दिलेला आबांचा विश्वास होता. 

तिथून पुढे आर आर पाटलांनी गडचिरोलीचे अनेक दौरे केले. यामुळे गडचिरोली भागातील प्रशासन अलर्ट झाले. आबांनी आधुनिक शस्त्रास्त्रे देऊन तिथले पोलीस दल सक्षम केले. सर्वसामान्य पोलीस जवानांना देखील आबांच्या मुळे नवा उत्साह आला. 

मात्र याच काळात एक घटना अशी घडली जेव्हा स्वतः आबांच्या मनात अपमानित होण्याची भावना आली होती.   

त्याकाळात आंध्र छत्तीसगड गडचिरोलीच्या सीमाभागात नक्षलवादी कारवाया वाढल्यामुळे देशभरातील कारवाई तीव्र करण्यात आली होती. ऑपरेशन ग्रीनहंट अंतर्गत नक्षलवादी कारवाया नियंत्रणात कशा आणता येतील याचे प्रयत्न चालू होते. तेव्हा केंद्रात गृहमंत्री होते पी चिदम्बरम.

पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे लाडके समजले जाणारे पी चिदम्बरम हे देशातील पॉवरफुल राजकारणी बनले होते. दिल्लीत आपल्या इशाऱ्यावर प्रशासनाला हलवणाऱ्या चिदंबरम यांचा आत्मविश्वस शिखरावर होता. 

नक्षलवादाच्या विरोधात तडफदारपणे त्यांनी काही निर्णय घेतले होते. त्यातूनच गडचिरोली येथे एक बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अशी सर्व मंडळी हजर होती.

त्या दिवशी चिदम्बरम यांचा मूड काही चांगला नव्हता. ते काहीसे त्रासलेले होते. अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढणे सुरु होतं. ते दाक्षिणात्य असल्यामुळे त्यांची हिंदी तितकीशी पक्की नाही. बैठकीत सर्वानी इंग्रजीमधून बोलावं असा त्यांचा आग्रह होता.

त्यामानाने आर.आर.आबा  यांची इंग्रजी इतकी सफाईदार नव्हती. कोणती तरी माहिती इंग्रजीतून देतांना ते चांगलेच अडखळले आणि म्हणून गांगरलेही. त्याचा चिदंबरम यांना संताप आला आणि त्यांनी मोठ्या आवाजात आबांचा पाणउतारा केला. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचीही चांगलीच झाडाझडती घेतली . बैठक संपल्यावर सगळे पांगले. 

दरम्यान ही बातमी पत्रकारांपर्यंत पोहोचली. आर.आर.पाटील आणि जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्यात चांगली मैत्री होती. त्याच दिवशी रात्री त्या दोघांची भेट ठरलेली होती. आबा भेटल्यावर बर्दापूरकर यांनी त्यांच्याजवळ सहज हा विषय काढला. बर्दापूरकर आपल्या ब्लॉगमध्ये सांगतात, 

मी तो विषय काढल्यावर आबा गंभीर झाले . ती हकिकत सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलेलं होतं. ‘मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला’ असं कातर स्वरात तेव्हा आबा म्हणाल्याचं अजूनही पक्कं स्मरणात आहे .

फक्त इंग्रजीचा प्रॉब्लेम असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या समोर आपल्या सहकाऱ्याचा पाणउतारा करणे हे संयुक्तिक तर नव्हतेच पण आर.आर.पाटील यांच्यासारख्या कार्यक्षम मंत्र्यांचा अपमान देखील करणारे होते. सत्तेच्या व अधिकाराच्या नशेमध्ये चिदम्बरम हि चूक करून बसले होते. 

ही हकीकत जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या ब्लॉगवर सांगितली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.