महाराष्ट्राच्या इतिहासात एका विधेयकासाठी विधानसभा चक्क पहाटे ५ वाजेपर्यंत चालली होती…

रामभाऊ म्हाळगी म्हणजे महाराष्ट्रात संघाची विचारसरणी रुजवण्यात सिंहाचा वाटा असणारा माणूस. पुढे संघाच्या विचारधारेतून जनसंघाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाकडून विधानसभेत निवडून जाणारे ते पहिले आमदार म्हणून देखील त्यांना ओळखलं जात. पुढे जनसंघचे प्रदेशाध्यक्ष बनले.

पण या पलीकडे देखील सभागृहात आपल्या पक्षाची ताकद कमी असली तरी केवळ आपल्या अभ्यासाच्या जोरावर सभागृहाचं लक्ष वेधणारा, सत्ताधारी पक्षाला विचार करायला लावणारा आमदार अशी ओळख त्यांनी मिळवली. योग्य विषयांवर बोलण्यासाठी ते वेळेची पण पर्वा करत नसतं.  

त्यांच्या अभ्यासाबद्दलचा एक किस्सा सांगायचं म्हंटल तर एक दिवस विधानसभेमध्ये रामभाऊ कोणत्या तरी महत्त्वाच्या विषयावर बोलायला उभे राहिले. टाचणी पडेल तरी आवाज होईल इतकी शांतता होती. बराच वेळ भाषण चालले. अखेर सभापतींनी रामभाऊंना सांगितलं,

“रामभाऊ नियमानुसार तुम्हाला दिलेली वेळ संपली आहे. आता पुढच्या वक्त्याला बोलू द्या. “

खरं तर या नंतरचा नंबर मृणाल गोरे यांचा होता. मृणाल गोरे या हाडाच्या समाजवादी. जनसंघ आणि समाजवादी विचारसरणी हे सुरवातीपासून एकमेकांचे कट्टर विरोधक. तरीही मृणाल गोरे म्हणाल्या,

“रामभाऊ मांडत असलेला विषय महत्त्वाचा आहे, अभ्यासपूर्ण आहे. माझा वेळ त्यांना द्या. माझे म्हणणे त्यांच्याहून काही वेगळे नाही.”

सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

अशा या रामभाऊ म्हाळगींनी एकदा आपल्या अभ्यासाच्या जोरावर विधानसभा पहाटे ५ वाजेपर्यंत चालू ठेवली होती.

गोष्ट आहे १९६६-६७ च्या काळातली. आज महाराष्ट्र शासनाची जी म्हाडा संस्था आहे ती पूर्वी मुंबई गृहनिर्माण इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ म्हणून ओळखली जात होती. याच संस्थेच्या विलीनीकरणानंतर १९७७ साली अधिकृत म्हाडाची स्थापना झाली होती.

अशा या मुंबई गृहनिर्माण इमारत दुरुस्ती मंडळाकडून गिरणगावातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे विधेयक विधानसभेत चर्चेला आलं. तेव्हा गृहनिर्माण मंत्रीपदी होते यशवंतराव मोहिते. तेही अभ्यासू. त्यांची ओळख म्हणजे अत्यंत तत्वनिष्ठ माणूस.

पण रामभाऊ म्हाळगींनी मोहितेंनी मांडलेल्या या विधेयकाला जवळपास १९५ उपसूचना मांडल्या. त्यांचं म्हणणं होतं राष्ट्रीय संपत्तीमध्ये सामान्य माणसांची समान भागीदारी असली पाहिजे. आणि त्या उपसूचना नुसत्या मांडल्या नाहीत तर यातील प्रत्येक उपसूचना मताला टाकली. यशवंतरावांनी देखील दिलदारपणा दाखवत कोणत्याही उपसूचनेला विरोध केला नाही.

त्यामुळे सकाळी ११ वाजता सुरु झालेलं विधानसभेचं काम मध्यरात्र उलटली तरी चाललं होतं.

बराच वेळ झाल्यामुळे सगळेच आमदार कंटाळले होते, सभागृहातच सतत यशवंतरावांकडे बघत होते. त्यामुळे अखेरीस यशवंतरावांनी म्हाळगींना हात जोडून विनंती केली. पण प्रत्येक वेळी रामभाऊ ‘आता संपत आलं, आता संपत आलं’ असं सांगून उपसूचना रेटत राहायचे.

शेवटी पहाटे ५ वाजता शेवटच्या उपसूचनेवरच मतदान संपल्यानंतर विधेयक मंजूर झाले.

एखाद्या इमारतीच्या पुनरर्चनेच्या विधेयकारावर विरोधी पक्षांकडून त्यात ही संख्याबळ कमी असलेल्या पक्षाकडून सत्ताधाऱ्यांची लागलेली कसोटी हा बहुदा विधासभेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होतं. अशा या ऐतिहासिक दिवसाची आठवण आजही जुन्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळते.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.