आठवलेंना फक्त राजकीय पक्षातून नाही तर नाटक-सिनेमांमधून पण ऑफर येतात

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे केवळ मंत्री नसून, संघर्षातून पुढे आलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. जे पोटात तेच ओठात असणारे, बिनधास्त आणि निर्भीड व्यक्तिमत्व परिचित आहेत. सत्तेच्या वाऱ्याची दिशा ओळखणारा राजकारणी म्हणून त्यांना ओळखलं जात.

त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्र आणि देशात आहे, त्यामुळेच त्यांना वेगवेगळ्या पक्षातून ऑफर असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात.  

पण ते जेवढे राजकारणी म्हणून देशाला परिचित आहेत तेवढेच ते शीघ्र कवि म्हणून देखील ओळखले जातात. अवघ्या देशात त्यांच्या कविता फेमस आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर ‘गो कोरोना’ म्हणत त्यांनी सगळ्यांनाच पोट धरून हसवलं पण पुढे जाऊन तीच कोरोना लढ्याविरुद्धची टॅगलाइन बनली होती. 

मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे राजकारण, त्यांच्या कविता या पलीकडे जाऊन देखील रामदास आठवले यांची अजून एक ओळख आहे. कवितांमधून मनोरंजन करणारे आठवले हे आपल्या अभिनय कौशल्यातून देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. याची चुणूक त्यांनी आपल्या नाटक आणि चित्रपटांमधून प्रत्यक्षात दाखवली आहे. ते ही अगदी त्यांच्या शालेय जीवनापासून. 

बसला ना धक्का? आठवले आणि चित्रपट – नाटकामध्ये?

तर नागपूरमध्ये झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनच्या व्यासपीठावरून त्यांनी स्वतः शालेय जीवनातील त्यांची एक आठवण सांगितली होती,

ते म्हणाले होते, मलाही शाळेपासून नाटकाची आवड आहे. एकच प्याला नाटकातील तळीरामाची भूमिका मी केली होती. यावेळी त्यांनी त्या नाटकाविषयीची आठवण सांगताना एक कविता देखील सादर केली होती.

ज्या वेळेला मी घेतला होता, माझ्या हातामध्ये एकच प्याला

त्यावेळेला समोरचा ते बघून भ्याला, पुढे एकदम थंड झाला

म्हणून मी माझ्या हातातला, सोडून दिला एकच प्याला

त्यानंतर १९९३ साली आलेल्या सुदर्शन के.बब्बर दिग्दर्शित ‘अन्यायाचा प्रतिकार’ या चित्रपटातुन देखील त्यांनी आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिल आहे. यात निळू फुले, विठ्ठल उमप असे अनेक सुप्रसिद्ध होते.

पुढे २००८ मध्ये आलेल्या शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘जोशी की कांबळे’ या चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. ‘आरक्षण’ या विषयावर आधारीत हा चित्रपट होता. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात (जोशी) जन्मलेल्या परंतु एका बौद्ध अनुसूचित जातीच्या (कांबळे) कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा होती. अभिनेता अमेय वाघ यात प्रमुख भूमिकेत होता.

अलीकडेच २०१६ मध्ये स्त्री-भ्रुणहत्या या गंभीर विषयावर ‘कन्यारत्न’ नावाचा चित्रपट शिवाजी डोलताडे यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेसाठी चर्चेतला चेहरा हवा होता. त्यांनी रामदास आठवले यांना त्याबाबत विचारलं आणि त्यांनी ही ‘ऑफर’ हसत हसत स्वीकारली.

‘रिअल लाइफ’मधील ‘त्या’ खुर्चीवर बसायचं अनेक वर्षं उराशी बाळगलेलं त्यांचं स्वप्न ‘रील लाइफ’मध्ये साकार झाल्यानं ही भूमिका करताना भलतेच खुश झाले होते.

२०१६ मधील फेब्रुवारीमध्ये फिल्म सिटीतील प्रांगणात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अत्यंत हळव्या भाषणाचा ‘शॉट’ एकाच टेकमध्ये ‘ओके’ करून टाकला. त्यांच्या या नॅचरल अभिनय सगळ्यांनाच भावाला होता. त्यावेळी ते म्हणाले होते,

मुख्यमंत्र्याची भूमिका साकारताना थोडंसं अवघडल्यासारखं झालं होतं, पण शेवटी अभिनय हा अभिनय आहे.

या चित्रपटाचं चित्रीकरण चालू असतानाच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘गॉडफादर ऑफ इंडिया’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेची ‘ऑफर’ ही त्यांना आली होती.

2-3 वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा जीत आठवले याने देखील ‘चलो फिर तस्वीर बनाये’ या ‘राष्ट्रीय एकात्मते’ वर बनवण्यात आलेल्या लघुपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.