राबडी देवींची एक झलक पाहण्यासाठी लालू पोलिसांच्या तावडीतून पळाले होते.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका महिलेच्या नावाची चूप चर्चा होतीये. ते नाव म्हणजे रश्मी ठाकरे. रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंची धुरा सांभाळतील अशा चर्चांनी उधाण आलंय. तर दुसरीकडे अजून एका गोष्टीसाठी रश्मी ठाकरे चर्चेत आहे. ते म्हणजे त्यांची राबडी देवी यांच्याशी होत असलेली तुलना. चौथी पास राबडी देवींनी लालू प्रसाद यादव यांची राजकीय धुरा सांभाळली होती. पण लालूंच्या राजकीय भविष्याचं शिवधनुष्य पेलणाऱ्या या राबडी देवी लालूंच्या आयुष्यात कशा आल्या, यामागे खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.

राबडी देवींचा लालू प्रसाद यादव यांच्याशी बालविवाह झाला होता.

राबडी देवी १४ वर्षांच्या होत्या तर लालू प्रसाद यादव २५ वर्षांचे होते. पण लग्नाच्या आधी त्यांनी एकमेकांना बघितलेलं सुद्धा नव्हतं. राबडी देवींना तेव्हा जास्त कळत नव्हतं. पण लालूंना आपली होणारी बायको कशी आहे, याबद्दल जाम उत्सुकता होती. पण ते स्वतः बघायला जाऊ शकत नव्हते. मग अशात लालूंनी शक्कल लढवली. त्यांनी आपल्या खास मित्राला राबडी देवींच्या घरी पाठवलं.

मित्र परत आला तेव्हा म्हणाला “भावा, वाहिनी खूपच सुंदर आहे.”

राबडी देवी यांचे काका त्यांचं लग्न लालूंसोबत करण्याच्या सक्त विरोधात होते. कारण राबडी देवींची घरची परिस्थिती खूप चांगली होती. आणि लालू साधारण घरातले होते. एक एक पैसे मिळवण्यासाठी कष्ट करावे लागत होते. राबडी देवी घरात सगळ्यांच्या खूप लाडक्या होत्या. त्यामुळे काकांची आणि घरातील बाकी सदस्यांची इच्छा होती की, आपल्या मुलीचं लग्न अशा घरात व्हावं जिथे त्यांना सगळ्या सुख सुविधा मिळतील.

पण राबडी देवींच्या वडिलांच्या मनात काही वेगळंच होतं. ते अशा मुलाच्या शोधात होते जो स्वतःच भविष्य स्वतः घडवेल. कुणावर निर्भर राहणार नाही. अशावेळी त्यांनी घरवाल्यांच्या विरोधात जाऊन निवड केली ती लालू प्रसाद यादवांची.

लग्न झालं पण लगेच राबडी देवी काही लालूंच्या घरी गेल्या नाही. त्यांच्याकडे गौना पद्धत असल्याने लालूंना तीन वर्ष वाट बघावी लागली. अखेर तीन वर्षांनी ती वेळ आली. राबडी देवींचा गौना झाला आणि त्या सासरी आल्या. बघतात तर काय? त्यांच्या सासरच्या अंगणात पोलीस होते जे लालूंना अटक करण्यासाठी आले होते. तेव्हा चालू असलेल्या एक आंदोलनात लालू सामील असल्याने त्यांच्या अटकेचं वॉरंट निघालं होतं.

राबडी देवी गृहप्रवेश करत होत्या आणि लालूंना घरातून बाहेर काढलं जात होतं. राबडी देवींच्या गृह प्रवेशाच्या वेळी असा फुल्ल फिल्मी स्टाईल सीन झाला होता.

अशा परिस्थितीतही लालूंना राबडी देवींची एक झलक बघायची होती. म्हणून लालूंनी लपून छपून राबडी देवींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काढलाच. ते राबडी देवींना भेटले आणि त्यांना सांगितलं की, त्यांना का अटक करण्यात येत आहे. आणि त्यानंतरच लालूंनी स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं. लालू किती दिवाने होते हेच यातून दिसतं.

लालू जरी व्हॅलेंटाईन डे मानत नसले तरी त्यांच्या आयुष्यात गुलाबाला खूप महत्त्व आहे. लालूंच्या आयुष्यातील कोणत्याही महत्वाच्या वेळी राबडी देवी त्यांना गुलाब देताच देता. लालूंचा राबडी देवीवर असलेला विश्वास आणि प्रेमाचं उदाहरण म्हणजेच लालूंनी राबडी देवींना दिलेलं मुख्यमंत्री पद.

लालूंचं आयुष्य आणि त्यांचं घर सांभाळणाऱ्या राबडी देवींवर लालूंनी त्यांची राजकीय धुरा सांभाळण्याची जबाबदारीही तितक्याचं विश्वासाने दिली. आणि राबडी देवींच्या अक्ख्या राजकीय प्रवासात त्यांची साथ न सोडता ठामपणे सोबत उभे राहिले.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.