रवींद्रनाथ टागोरांनी केलेल्या जाहिरातीमुळे ‘गोदरेज’ ब्रँड म्हणून उभा राहिला !

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना आपण ओळखतो ते नोबेल पारितोषिक विजेते महान साहित्यिक आणि भारताच्या राष्ट्रगीताचे लेखक म्हणून. पण तुम्हाला कल्पना नसेल की रवींद्रनाथ टागोर हे साबण आणि फेअरनेस क्रीमची जाहिरात करणारे पहिले भारतरत्न देखील होते.

तुम्हाला या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवणं कदाचित थोडं अवघड जाऊ शकेल पण ही गोष्ट अगदी खरी आहे. रवींद्रनाथ टागोरांनी जवळपास ५०० पेक्षा अधिक उत्पादनांची जाहिरात केली होती.

टागोरांनी केलेली गोदरेज साबण आणि कॅडबरी बोर्नव्हिटाची जाहिरात ‘आनंद बझार पत्रिका’ आणि ‘द स्टेटसमन’ सारख्या तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेली आपल्याला बघायला मिळते. अनेक विदेशी उत्पादनापेक्षा स्वदेशी उत्पादने कशी सरस आहेत, हे सांगणारी टागोरांची अनेक विधाने त्यांच्या फोटोसह या जाहिरातीत वापरण्यात आलेली आहेत.

वर्ष होतं १९१८.

गोदरेजने जगातील पहिली ‘व्हेज साबण’ बनवली होती. आता तुम्ही विचारणार की साबण कुठे व्हेज आणि नॉन-व्हेज असते का..? तर त्यामागचा किस्सा असा की तोपर्यंत बहुतांश साबणांचं उत्पादन युरोपात होत असे. या साबणाच्या उत्पादनात  प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असे.

भारतासारख्या अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या आणि शाकाहारी लोकांचं प्रमाण मोठं असणाऱ्या देशातील लोकांसाठी हे साबण वापराच्या दृष्टीने योग्य नव्हतं. त्यामुळेच यावर उपाय म्हणून गोदरेजने साबणाचं उत्पादन केलं होतं. गोदरेजकडून या साबणाचं ब्रँडिंग ‘जगातला पहिला व्हेज साबण’ म्हणून करण्यात आलं होतं.

गोदरेजने १९१९ साली ‘गोदरेज नं.२’ या नावाने आपली साबण बाजारात आणली. आता इथे परत तुम्हाला प्रश्न पडेल की आजघडीला बाजारात तर गोदरेजचा साबण ‘गोदरेज नं. १’ या नावाने आहे, मग ही ‘गोदरेज नं.२’ नेमकी काय भानगड आहे..?

हा गोदरेजचा एक मार्केटिंगचा फंडा होता.

‘गोदरेज नं.२’ नावाने साबण लॉच करायचा आणि तो जर चालला तर परत नवीन साबण ‘गोदरेज नं. १’ नावाने बाजारात आणायचा. म्हणजे ‘नं.२’ जर इतका चांगला असेल तर ‘नं. १’ किती खास असेल अशी लोकांची उत्सुकता तयार करून बाजारावर ताबा मिळवायचा हे त्यामागे धोरण होतं.

गोदरेजचा हा प्रयोग यशस्वी ठरला आणि १९२२ साली ‘गोदरेज नं. १’ नावाने हे उत्पादन बाजारात आलं. जे प्रचंड चाललं. गांधीजींनी चालवलेल्या स्वदेशीच्या चळवळीचा आणि अहिंसेच्या तत्वाच्या पुरस्काराचा फायदा गोदरेजला झाला आणि ब्रँड म्हणून गोदरेज प्रस्थापित झाला.

गोदरेजच्या या स्वदेशी उत्पादनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खुद्द टागोरांनी आपलं योगदान दिलं. त्यासाठी त्यांनी गोदरेजची जाहिरात केली. या  जाहिरातीत  एका बाजूला त्यांचा फोटो वापरण्यात आलाय आणि दुसरीकडे त्यांचा कोट आहे. आपल्याला माहित असलेल्या इतर कुठल्याही विदेशी कंपनीपेक्षा गोदरेजची  साबण चांगली असल्याचं सांगत ही साबण वापरण्याचा सल्ला टागोरांनी दिला.

बोर्नव्हिटा आणि गोदरेजच्या जाहिरातीतील रवींद्रनाथ टागोर

साल १९३७.

याचवर्षी बोर्नव्हिटाची सुरुवात झाली होती. त्यावेळी रवींद्रनाथांच्या प्रकृतीच्या किरकिरी सुरु झाल्या होत्या. अशावेळी टागोरांनी बोर्नव्हिटाची एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत ते म्हणतात की, “बोर्नव्हिटामुळे माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायला मदत होत आहे”

या फक्त उदाहरणादाखल दिलेल्या जाहिराती यापलीकडे जाऊन अनेक जाहिरातींमध्ये रवींद्रनाथ टागोर झळकले होते. अनेकांनी रवींद्रनाथ टागोर या ब्रँडचा उपयोग स्वतःच्या जाहिरातीत केला होता आणि त्यावेळी या लोकांना त्याचा फायदा देखील झाला होता. या अर्थाने रवींद्रनाथ टागोर भारतीय जाहिरात विश्वातील देखील हुकमी एक्का होते !

Leave A Reply

Your email address will not be published.