रविद्रनाथ टागोरांच पहिलं प्रेम असणारी ती मराठी मुलगी.

जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते भारतीय साहित्यिक रवीन्द्रनाथ टागोर यांच्या आयुष्याचा एक हळवा कोपरा लवकरच एका सिनेमाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. या सिनेमातून रविंद्रनाथ टागोरांची ‘किडल्ट’ लव्ह स्टोरी चित्रपटरसिकांना अनुभवता येईल.

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या ‘पर्पल पेबल्स पिक्चर्स’कडून ‘नलिनी’ या मराठी-बंगाली चित्रपटाची निर्मिती करण्यात येतेय.  हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर आणि अन्नपूर्णा उर्फ नलिनी तर्खडकर यांच्या प्रेमकथेवर आधारित असणार आहे.

कोण होत्या नलिनी उर्फ अन्नपूर्णा तर्खडकर…?

मराठी व्याकरणकार आणि समाजसुधारक तसेच प्रार्थना समाजाच्या संस्थापकांपैकी एक असणाऱ्या आत्माराम उर्फ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या कन्या म्हणजे अन्नपूर्णा तर्खडकर. ‘नलिनी’ हे रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना दिलेलं नांव. ‘नलिनी’ याच नावाने रवीन्द्रनाथांनी त्यांना आपल्या कवितांमधून अजरामर करून टाकलं.

कशी फुलली प्रेमकहाणी…?

साल १८७८.

रवींद्रनाथ टागोर त्यावेळी १७ वर्षांचे होते आणि आपल्या पुढील शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला जायचं होतं. रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ टागोर यांची अशी इच्छा होती की  इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांनी इंग्रजी भाषा व्यवस्थित आत्मसात करावी. त्याचसाठी सत्येन्द्रनाथांनी साधारणतः २ महिन्यांसाठी रवींद्रनाथांना मुंबईत दादोबा तर्खडकरांच्या घरी राहायला पाठवलं.

अतिशय उच्चशिक्षित असणाऱ्या तर्खडकर कुटुंबीयांच्या सहवासात रवींद्रनाथ टागोर यांच्या इंगार्जीमध्ये चांगली सुधारणा होईल असं सत्येन्द्रनाथांना वाटायचं. दादोबा हे सत्येंद्रनाथ टागोरांचे चांगले मित्र होते.

अन्नपूर्णा त्यावेळी २० वर्षांच्या होत्या आणि नुकत्याच इंग्लंडहून परतल्या होत्या. रवींद्रनाथांच्या इंग्रजीच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. याचदरम्यान अन्नपूर्णा यांच्याकडून इंग्रजीचे धडे घेता-घेता हे दोघं एकमेकांकडून प्रेमाची भाषा देखील शिकत होते. याच २ महिन्यांच्या काळात रवींद्रनाथ टागोर आणि अन्नपूर्णा यांच्यामध्ये प्रेम फुलत गेलं. रवींद्रनाथांनी अन्नपूर्णा यांच्यावर अनेक कविता केल्या, ज्यात त्यांनी अन्नपूर्णा यांना ‘नलिनी’ हे नांव दिलं.

प्रेमकहाणीचं पुढे काय झालं…?

२ महिन्यांच्या मुंबईतील वास्तव्यानंतर रवींद्रनाथ टागोर इंग्लंडला निघून गेले. दरम्यानच्या काळात ज्यावेळी दोघांच्या नात्याबद्दल अन्नपूर्णा यांच्या कुटुंबीयांना समजलं त्यावेळी लग्नाच्या बोलणीसाठी रवींद्रनाथांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला. परंतु अन्नपूर्णा या रवींद्रनाथांपेक्षा ३ वर्षे मोठ्या असल्याचे कारण देत रवींद्रनाथांच्या कुटुंबाकडून या लग्नास विरोध झाला आणि पुढे हे नातं टिकू शकलं नाही.

नोव्हेंबर १९८० मध्ये अन्नपूर्णा यांचा विवाह बडोदा हायस्कूलचे उप-प्राचार्य हॅरोल्ड लिटलडेल यांच्याशी पार पडला आणि त्या स्कॉटलंडला जाऊन स्थायिक झाल्या. दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नसलं तरी ते केवळ आकर्षण या पातळीवर नव्हतं याची कल्पना आपल्याला यावरून येते की लग्नानंतर देखील अन्नपूर्णा या स्वतःसाठी ‘नलिनी’ हेच नांव वापरात होत्या.

रवींद्रनाथ टागोरांच्या देखील अनेक काव्यांमध्ये ‘नलिनी’ हा उल्लेख बघायला मिळतो. शिवाय रवींद्रनाथ टागोरांनी १८८४ साली ‘नलिनी’ नावाचं नाटक देखील लिहिलं होतं, ज्याची स्मरणिका त्यांनी कोरीच ठेवली होती. बहुतेक हे पुस्तक त्यांना अन्नपूर्णा यांना समर्पित करायचं असावं असं मानण्यात येतं.

‘नलिनी’ हा सिनेमा याच प्रेमकथेवर आधारित असणार आहे. साहेब भट्टाचार्जी हा बंगाली अभिनेता या चित्रपटात किशोरवयीन रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेत दिसेल तर मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी ही अन्नपूर्णा तर्खडकर यांची भूमिका साकारणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक उज्ज्वल चॅटर्जी हे हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.

हे ही वाचा.

 

 

2 Comments
  1. Pradeep M says

    1980 मध्ये नलिनी मॅडम चे लग्न झाले असे लिहिले आहे ते 1980 नसून 1880 असे असेल

  2. मुकुंद वसंत खुपेरकर says

    चुकून एका ठिकाणी 1980 चा उल्लेख झाला आहे ,कृपया सुधारणा होणे गरजेचं….

Leave A Reply

Your email address will not be published.