नगरच्या विखे पाटलांनी राजकारणाची सुरुवात केली ती कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा बिंदू चौकातून

कोल्हापूरचा बिंदू चौक म्हणजे हार्ट ऑफ द सिटी!

या चौकाच नावं घेतलं की डोळ्यासमोर आपोआप येणारी दृष्य म्हणजे घोषणा आणि आंदोलन. हा बिंदू चौक कोल्हापुरातीलच नाही तर अनेक बड्या राजकारण्यांचं हक्काचं व्यासपीठ आहे. तेथूनच प्रतिस्पर्ध्यांना आव्हानं प्रतिआव्हानं दिली जातात. या बिंदू चौकात आजवर अनेक ऐतिहासिक सभा झाल्या आहेत. अनेक सामजिक कार्यकर्ते आपल्या आंदोलनाची सुरुवात बिंदू चौकातूनच करतात.

याचं चौकात प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेविरोधात घोषणा देऊन आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती राधाकृष्ण विखे पाटील यांनी.

विखे-पाटील घराणं हे राजकारणातील बडं नाव. नगरच्या राजकारणावर मांड असलेलं हे घराणं. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढीही आता राजकारणात आहे. नगरच्या सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक.

या पाठीमागं विठ्ठलराव विखे पाटील यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची तपश्चर्या होती. जनतेत रहा त्यांच्याशी सतत संवाद साधा त्यांची काम करा हाच विठ्ठलराव विखे पाटलांचा कानमंत्र त्यांच्या कुटुंबीयांनी अहोरात्र पाळल्याने नगरच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचा दबदबा वाढला.

पण राधाकृष्ण विखे पाटलांसाठी राजकारणात लाल गालीचा अंथरला नव्हता. त्यांना त्यांचा मार्ग निवडायचा तर होताच पण तो तयार ही स्वतःच करायचा होता.

महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापूरला आले होते. त्यांच्या घरी शेतीचा वारसा असल्यानं साहजिकच कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यात आलं. आता घरची परिस्थिती चांगली म्हणून कॉलेजात काही मुभा मिळेल असं काही नव्हतं. विद्यार्थी दशेत मोटरसायकल किंवा गाडी राधाकृष्ण विखे पाटलांकडे नव्हती. वडिलांनी त्यांना सायकलच घेऊन दिली होती.

कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात या सायकली वरूनच ते संपूर्ण कोल्हापूरची भ्रमंती करायचे. तिथ शिक्षण घेत असताना नकळतच त्यांचा ओढा राजकारणाकडे वाढला. थोड्या थोडक्या अशा विद्यार्थी चळवळीत ते दिसायचे.

मात्र ऐतिहासिक बिंदू चौकातील एका विद्यार्थी आंदोलनाने त्यांची राजकिय जीवनाची पायाभरणी झाली.

तर झालं असं होतं की कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एक संप केला होता. त्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरात मोर्चा काढला. या संपात नेतृत्व करण्याची संधी राधाकृष्ण विखे-पाटील यांना मिळाली.

कोल्हापूरच्या प्रसिद्ध अशा बिंदू चौकात त्यांनी आपलं पहिलं वहिल राजकीय भाषण केलं. भाषण चांगलंच गाजलं. राधाकृष्ण विखे पाटलांना बाकीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं ते फक्त याचं भाषणाने.

पुढे विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या मात्र विद्यार्थी चळवळीतला त्यांच्या जीवनातला हा पहिला संघर्ष होता. त्यांच्या चळवळीची व संघर्षाची बीजे बहुदा कोल्हापुरातच ऐतिहासिक अशा बिंदू चौकात रोवली गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.