पुणेकरांनी भारताच्या उपराष्ट्रपतींना एका संस्थेच्या निवडणुकीत पाडण्याचा पराक्रम केला होता

भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. ते एक शिक्षक होते, लेखक होते, तत्वज्ञ होते पण राजकारणी नव्हते. जगभरात त्यांच्या ग्रंथांची ख्याती पसरली होती. स्वतः जवाहरलाल नेहरू त्यांचे चाहते होते. गांधीजींशी त्यांची मैत्री होती पण काँग्रेसच्या राजकारणाशी कोणताही संबन्ध त्यांचा आला नाही. अगदी  स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही.

एक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती आणि ते देशाचे पहिले काँग्रेस पक्षाबाहेरचे राष्ट्रपती ठरले. दोन्ही वेळी ते नेहरूंच्या मदतीने सहज निवडून आले होते.

राधाकृष्णन यांनी आयुष्यात स्वबळावर एकच निवडणूक लढवली आणि त्यातही ते पराभूत झाले. ती निवडणूक होती पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूटची.

भांडारकर प्राच्यविद्या ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे. डॉ.रामकृष्ण भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी भाषातज्ज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ञ व समाजसुधारक होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवले व लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. 

फक्त भारतातच नाही तर युरोपात देखील पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात. ब्रिटिशांनी त्यांना सर हि मानाची पदवी दिली होती. 

त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा १९१८ मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला.

जगभरातल्या प्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणारी संस्था म्हणून भांडारकर इन्स्टिट्यूट फेमस झाली.

या संस्थेच्या पहिल्याच वर्षी  १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला गेला . विष्णू सीताराम सुखटणकर यांनी प्रचंड मेहनत घेऊन प्राचीन महाभारताची आवृत्ती शोधून काढली.

डॉ.राधाकृष्णन यांचा या संस्थेशी विशेष जिव्हाळा होता. तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी वेदांताचा प्रचंड अभ्यास केला होता. अगदी गीतारहस्य लिहिताना लोकमान्य टिळक यांनी राधाकृष्णन यांच्या रेफरन्सचा काही प्रमाणात वापर केला होता व तसा उल्लेख आपल्या पुस्तकातही केला.

ऑक्सफर्ड विद्यापीठात मानद प्राध्यापक असतानाही व्याख्यानाच्या निम्मिताने व इतर अनेक कारणांनी त्यांचा पुणे दौरा व्हायचा तेव्हा भांडारकर इन्स्टिट्यूटला त्यांची आवर्जून फेरी व्हायची. तिथे काम करणारे अनेक अभ्यासक, संशोधक यांच्याशी त्यांच्या चर्चा व्हायच्या. तिथल्या कामावर त्यांचं बारीक लक्ष होतं.

हा जिव्हाळा लक्षात घेऊन १९४३ साली संस्थेच्या रौप्यमहोत्सवी समारंभाच्या कार्यक्रमाला डॉ.राधाकृष्णन हे पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं.पुढे स्वातंत्र्यानंतर राधाकृष्णन यांची भारताचा उपराष्ट्रपतीपदी नेमणूक झाली. देशाचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती देखील असतो. डॉ.राधाकृष्णन हे राजकारणाशी संबंधित नसतानाही त्यांच्या विद्ववत्तेमुळे त्यांना हे पद देण्यात आले होते.

या इतक्या मानाच्या पदावर असूनही राधाकृष्णन यांना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची निवडणूक लढवण्याचा मोह आवरला नाही.

लेखक, अभ्यासू संशोधक आणि वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले भांडारकर संस्थेचे उपाध्यक्ष हरी नरके आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात,

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा मात्र त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते.

उपराष्ट्रपती या पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याचाच नावे जमा आहे. पुणे कर विद्वानांचा राधाकृष्णन यांच्याबद्दल आदर होता मात्र निवडणूक म्हटल्यावर त्यांनी ती चुरशीने लढवली आणि राधाकृष्णन याना संस्थेपासून दूर रोखण्यात यश मिळवले.

एवढे असूनही डॉ.राधाकृष्णन यांनी या संस्थेबद्दल कधी आकस मनात धरला नाही. ते पुढे राष्ट्रपती झाल्यावर २२ सप्टेंबर १९६६ साली पुण्याला आले तेव्हा त्यांच्या हस्ते भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये महाभारताच्या सर्वखंडांचे प्रकाशन करण्यात आले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.