गेल्या शंभर वर्षात अस धरण बांधणं कुणाच्या बापाला जमलेलं नाही

पावसाळा सुरू झाला की कोल्हापुरात शेतीच्‍या कामांना वेग येतो तसाच मिरगी म्हाईचाही हंगाम सुरू होतो. गावोगावी बोकड, बकरी, कोंबड्यांचे बळी दिले जातात. पीकपाणी चांगलं होवू दे, असं ग्रामदैवताला गार्‍हाणं घातलं जातं. कोल्हापूर शहरात तर आषाढात गल्लोगल्ली टेंबलाईच्‍या नावानं बकरी पडतात. त्‍यांचे वाटे घालून घरोघरी पैपाहुण्‍यांना बोलावून झणझणीत कोल्हापुरी जेवणाचा बेत असतो. 

पावसाळा सुरू झाला की मग ठिकठिकाणच्‍या धबधब्‍यांनाही जोर चढतो. पंचगंगा गढुळाचं पाणी घेवून लगबगीनं कृष्णेला भेटाला निघते. 

आणि त्‍याचवेळी प्रत्‍येकाच्‍या तोंडी एकच प्रश्न असतो.

राधानगरी किती भरलं?

गल्लोगल्ली, चौकाचौकात किंवा गावच्‍या पारावर, पान टपरीवर असो. एकच सवाल लाखमोलाचा..! 

राधानगरी किती भरलं? त्‍याला जोडून उपप्रश्न असतो.

धरणाचं दरवाजं कधी पडतील?

मग त्‍याच चर्चेतला कुणी व्हाटसअप विद्यापीठाचा विद्यार्थी माहिती देतो, चार दिवसात दोन दरवाजं पडणार. 

आता धरणाचं दरवाजं पडणार असं कुणी दुसर्‍या कुठल्‍या गावात सांगितलं तर ऐकणार्‍याची तंतरेल. पण कोल्हापुरात तसं नाही होत. दरवाजं पडणार म्हणजे उघडणार. 

कोल्हापुरात पाउस बख्खळ. त्यामुळं धरण जेमतेम ऑगस्टच्या पहिल्‍या दुसर्‍या आठवड्यातच भरतं आणि स्वयंचलित दरवाजे उघडतात.

गतवर्षी तर महापुरानं कोल्हापूर आणि सांगलीचं कंबरडंच मोडलं. १०० वर्षात झाला नाही असा महापूर कोल्हापूरनं बघीतला. पाणी पार व्हीनस टॉकीज चौकातल्या छत्रपती राजाराम महाराजांच्‍या पूर्णाकृती पुतळ्याच्या पायाला लागलं. शेकडो कोटी रुपयांचं नुकसान झालं. अनेकांची घरंदारं उदध्वस्त झाली.  

असो. 

तर सगळ्यांचं लक्ष राधानगरी धरणाकडं !

एकदा राधानगरी भरलं की पाणची ददात नाही. कोल्हापूर शहराला पिण्याच्‍या पाण्‍याची आणि लाभक्षेत्रातील गावांना पिण्‍यासह शेतीसाठी. या धरणामुळं पंचगंगा कायम प्रवाही. 

राधानगरी धरण म्हणजे लक्ष्मी तलाव. कोल्हापूरच्‍या राजर्षि शाहू महाराजांनी तब्बल १०० वर्षापूर्वी बांधलेला. पण आजही एकेक चिरा सुस्थितीत. हे धरण मातीचं. त्‍या काळात अशा पद्धतीचं धरण बांधण्‍याचा विचार करणं ही कल्पनाच अचाट.

पण राजर्षिंनी हे स्वप्न पाहिलं. 

100 वर्षापूर्वी या राजानं सिंचनाचं महत्त्व जाणलं होतं. राजर्षिंनी पाणी मिळालं तर शेतकरी सुखी होईल म्हणून गावोगावी विहिरींची खुदाई, छोटे तलाव यांची बांधणी केली होतीच. त्‍यासाठी संस्थानचा खजिना रिकामा केला.

१९०७ साली महाराजांनी धरण बांधणची कल्पना मांडली. जागेचा शोध सुरू झाला. फेजिवडे गावाजवळ भोगावती नदीवर धरण बांधता येईल, असे महाराजांना सांगण्यात आले. जागेची पाहणी करण्यात आली. १९०८ साली फेजीवडेजवळ राधानगरी गाव वसवण्यात आले आणि पुढच्याच वर्षी धरणाच्‍या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली.  

९ वर्षात म्हणजे १९१८ पर्यंत धरणाची भिंत सुमारे ४० फूट बांधून पूर्ण झाली होती.  दरम्यानच्या काळात कोल्हापूर संस्थानवर काही आर्थिक अडचणी आल्या. निधीचा प्रश्न निर्माण झाला. दुर्देवानं महाराजांचेही निधन झाले. पण त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी अडीअडचणींची पर्वा न करता धरण पूर्ण केलं.

१९३८ साली धरणाचे उद्घाटन करण्यात आले. लक्ष्मी तलाव असं नामकरण करण्यात आलं.

पाणी साठवायला अगोदरच सुरूवात झाली होती. धरणावर सात स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले होते.

धरण भरलं की टप्प्याटप्प्यानं हे दरवाजे आपोआप उघडतात आणि बंदही होतात. अशा पद्धतीचं देशातील हे एकमेव धरण आहे. 

आणि विशेष म्हणजे आजही हे सर्वच दरवाजे आणि धरणही सुस्थितीत आहे. 

या धरणानं जिल्ह्यात सुबत्ता आणली. भोगावती आणि मग पंचगंगा खोऱ्यातल्या शेतकऱ्याच्या कष्टाला याच धरणाच्या पाण्यानं गोमटी फळं दिली. धरणाच्या पाण्यावर वीज निर्मीतीही करण्यात येते. कोल्हापूर शहराचीही वर्षानूवर्ष हेच धरण तहान भागवतं. 

त्यानंतर बांधलेल्या राधानगरी तालुक्यातल्याच काळम्मावाडी धरणाला सुरूवातीपासूनच गळती लागलेली आहे. ही गळती आजही निघालेली नाही. असं म्हणतात की, धरण कसं बांधू नये याचा अभ्यास करण्यासाठी काळम्मावाडी धरणाचा अभ्यास करावा…

आणि धरण कसं असावं हे बघायचं असेल तर राधानगरी धरण आहेच…

लेखक : शिवराज भोसले 

संपर्क : [email protected]mail.com

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.