नखापेक्षा लहान आकाराची गोळी हरवली म्हणून अख्खं ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये आलंय…

एखाद्या साय-फाय पिक्चरला लाजवेल अशी परिस्थिती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये झालीये. म्हणजे, एक अगदी लहान म्हणजे आपल्या हाताच्या नखापेक्षाही लहान आकाराची एक कॅप्सूल हरवलीये आणि म्हणून अख्खं ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये आलंय.

आता, हे साय-फाय पिक्चर कितीही सीरियस असले तरीही आपण त्यांना फार सीरियसली घेत नाही कारण शेवटी असतात तर ते पिक्चरच!

पण या कॅप्सूलच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाने घेतलेलं टेन्शन हे स्वाभाविक आहे कारण, ही कॅप्सूल प्रचंड घातक ठरू शकते.

त्यात रेडियोअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप आहे ज्याचं नाव आहे कॅशियम-१३७ (Caesium-137), आणि हे आयसोटोप प्राणघातक असतं.

आधी तर ही कॅप्सूल इतकी घातक का आहे ते बघुया.

मुळात तर ही कॅप्सूल कशासाठी वापरली जाते? हा प्रश्न उपस्थित होतो. तर, ही कॅप्सूल लोह खनिज फीडची घनता मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणाचा भाग आहे. या कॅप्सूलमधला रेडियोअ‍ॅक्टिव्ह आयसोटो हा गॅमा आणि बेटा असे दोन्ही प्रकारचे किरण उत्सर्जित करतो. या कॅप्सूलच्या १ मीटर अंतरावर उभं राहणं हे एका तासाला १० क्ष किरणं म्हणजेच एक्सरेज शरीरावर झेलण्यासारखं असतं असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

याशिवाय कॅशियम-१३७ हा आयसोटोप त्या कॅप्सूलला स्पर्श करणाऱ्या प्रत्येकासाठी हानिकारक आहे.

हे कॅशियम-१३७ काय असतं हेही बघुया.

कॅशियम-१३७ हे कॅशियमचा सर्वात कॉमन रेडियोअ‍ॅक्टिव्ह फॉर्म आहे. हा कॅशियम-१३७ अणू चाचणी किंवा अण्वस्त्र चाचण्यांमधून बाहेर येणारा पदार्थ आहे. चंदेरी-सफेद रंगाची नरम आणि लवचीक अशी ही कॅप्सूल असते जी रूम टेंपरेचरला आल्यावर द्रव्यात रुपांतरित होतं.

बरं या कॅशियम-१३७ च्या संपर्कात आल्याने त्रास होतो… म्हणजे स्पर्श झाला तर त्वचा जळते, रेडियेशन्सचाही त्रास होतो. शिवाय, सगळ्यात धक्कादायक म्हणजे यामुळे कँसरचाही धोका वाढतो कारण यात हाय रेडिएशनचे गॅमा रेज असतात.

चुकून जर श्वसनातून किंवा खाण्यातून हे कॅशियम-१३७ शरीरात गेलं तर, शरीरातल्या टिशूजवर परिणाम होतो… बॉडीतल्या मसल्सवर परिणाम होऊन पुन्हा एकदा कँसरचाच धोका निर्माण होतो.

जास्त काळ या पदार्थाच्या संपर्कात राहिलं तर, थेट मृत्यू होण्याचाही धोका असतो.

ही कॅप्सूल कशी हरवली ते बघुया.

तर, ऑस्ट्रेलियातली एक कंपनी आहे रिओ टिंटो. ही कंपनी खाणकाम व्यवसायातली मोठी कंपनी आहे. या कंपनीकडे ही कॅप्सूल होती. का होती? म्हणायचं तर, ही कॅप्स्यूल लोह खनिज फीडची घनता मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणाचा भाग आहे. त्यामुळे या कंपनीकडे ही कॅप्सूल होती आणि त्यांच्याकडूनच ती हरवलीये.

ही कॅप्सूल एक खाणकामाच्या साईटवरून पर्थ या ऑस्ट्रेलियातल्या ठिकाणी रेडिएशन स्टोरेज फॅसिलिटीमध्ये नेण्यात येत होती. १२ जानेवारीला निघालेली ही कॅप्सूल १६ तारखेला त्या ठिकाणी पोहोचणार होती. ही कॅप्सूल हरवल्याचं लक्षात आलं ते मात्र, २५ जानेवारीला. २५ जानेवारीला त्या कंटेनरचं इंस्पेक्शन झालं आणि कॅप्सूल त्यामध्ये नसल्याचं लक्षात आलं.

ही कॅप्सूल हरवलीये ती न्यूमन या गावापासून ते पर्थ या शहरापर्यंतच्या मधल्या रस्त्यावर हरवली आहे. हा रस्ता जवळपास १,४०० किलोमीटरचा आहे आणि हा रस्ता वेस्टर्न ऑस्ट्रेलियन वाळवंटातून जातो.

२०१९ साली भारतात अशा प्रकारचा एक लहान कंटेनर हरवला होता.

भारतातल्या आंध्र प्रदेश राज्यात ही घटना झाली होती.  खरंतर या हरवलेल्या कंटेनरमध्येही कॅशियम-१३७ हा पदार्थ होता. ओएनजीसीच्या एका एक्प्लोरेशन म्हणजे उत्खननाच्या साईटवरून मशिन्स आणि इतर उपकरणं घेऊन जात असलेल्या ट्रकमधून हा कंटेनर हरवला होता.

त्यावेळी पोलीस प्रशासनासह ओएनजीसीचे अधिकारीही या कंटेनरला शोधण्याच्या मोहिमेत सामील झाले होते.

सर्वांची काळजी वाढवलेला हा कंटेनर अखेर एका भंगाराच्या दुकानात सापडला.

घातक असलेली ही कॅप्सूल ऑस्ट्रेलियातल्या वाळवंटी भागात हरवली असेल तर ती सहजासहजी सापडणं हे जरा कठीणच असल्याचं बोललं जातंय, पण सध्यातरी ही कॅप्सूल हरवल्यामुळे त्यांचं टेन्शन वाढलंय हे मात्र खरंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.