आचार्य अत्रेंचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम पलटणीचे नेतृत्व करत होते.

महाराष्ट्रातील जनतेने ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केले, ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनांत महत्वाचे स्थान दिले, ज्यांना आपल्या मनोमंदीरात अक्षरश: पुजले अश्या ज्या कांही व्यक्ती गेल्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आल्या, त्यामध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या महान व्यक्तिमत्वाचा क्रमांक बराच वरचा लागेल.

अत्रे महान साहित्यिक तर होतेच मात्र त्यांची वाणी देखील तितकीच धारधार होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी आपल्या वक्तृत्वाने प्रचंड गाजवली. शिवरायांचा महाराष्ट्र मराठी जनतेला मिळालाच पाहिजे हे ठणकावून सांगणारे यात्रेचं होते. शिवसेना स्थापन करण्याची पहिली कल्पना त्यांचीच. पुण्यात शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास जपला जावा म्हणून शिवाजीनगर स्थापन करणारे अत्रेचं होते.

अत्रेंच्या या शिवप्रेमामागे देखील मोठा इतिहास आहे. आचार्य अत्रेंचा जन्मच मुळात शिवाजी महाराजांच्या सैन्यात पराक्रम गाजवणाऱ्या घराण्यात झाला होता.

सासवड जवळील कोडीत हे प्रल्हाद केशव अत्रे यांचे जन्मगाव. जवळपास तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोडीत या गावचे कुलकर्णीपण अत्रेंचे पूर्वज राघो बल्लाळ यांच्याकडे सोपवले होते. ते वंश परंपरागत आचार्य अत्रेंच्या पर्यंत चालत आले होते. पण राघो बल्लाळ यांचा इतिहास तेवढ्या पुरता सीमित नाही.

त्यांनी शिवरायांच्या समवेत रणांगणात उतरून पराक्रम गाजवला होता.

शहाजी महाराजांनी आपले पुत्र शिवबा यांना पुण्याच्या जहागिरीचा स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून दिले तेव्हा त्यांच्या मदतीसाठी जी मंडळी पाठवून दिली होती त्यात दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर,कान्होजी जेधे नाईक यांच्या सोबत रघुनाथ बल्लाळ अत्रे हे देखील होते.

स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांनी पहिला हातभार लावला त्यात राघो बल्लाळ यांचा उल्लेख प्रकर्षाने केला जातो.

राघो बल्लाळ व त्यांचे चुलत भाऊ विठ्ठल शिवदेव, निलोरम शिवरायांच्या पदरी होते. राघो बल्लाळ हा कारकुनी मुत्सद्देगिरी सोबतच तलवारबाजी मध्ये वाकगबगार होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये तो सोबत असे. पुणे पन्हाळा राजापूर कल्याण वगैरे प्रांताचा सुभेदार बनवलं होतं.

जावळीच्या मोरेंच्या परिपत्यासाठी त्यांनी केलेली वकिली व मुत्सद्देगिरी महत्वाची ठरली होती.

पुढील काळात त्यांच्याकडे कोकणची जबाबदारी देण्यात आली.

कोकण त्या काळी ही दुर्गम प्रदेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच महत्व वेळीच जाणलं होतं.  आदिलशाही व मुघल सत्तेला तोंड देतांना सह्याद्रीची पाठ व कोकण यांचा उपयोग करून घेतल्यास पुष्कळ फायदा होईल हे त्यांनी थोड्याच दिवसांत ताडले. जावळीतून कोकणात उतरण्यासाठी महाराजांनी प्रतापगड बांधला होता. 

कोकण वर जंजिऱ्याच्या सिद्दीचं वर्चस्व होतं. या शिवाय पोर्तुगीज, इंग्रज हे टोपीकर देखील व्यापाराच्या निमित्ताने आपले आरमार घेऊन अरबी समुद्रात वावरत होते. या साऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे करण्याचा निर्णय घेतला.

त्याच्यासाठी आधी आपले सर्वात विश्वासू सुभेदार राघो बल्लाळ अत्रे यांना कोकणच्या मोहिमेवर धाडलं.  

सिद्दी हे मुळचे आफ्रिकेतील अॅबिसिनिया या प्रांतातील होते. ते धर्माने मुसलमान असून दर्यावर्दी जीवन जगत होते. अॅबिसिनीयन या शब्दावरूनच सिद्दी असे म्हटले जाऊ लागले. १५ व्या शतकात ते भारतामध्ये आले आणि निजामशाहीच्या राजवटीत दंडाराजपुरी या ठिकाणी सिद्दींनी आपले केंद्र प्रस्थापित केले.

शहाजहानने निजामशाही नष्ट केल्यानंतर दंडाराजपुरीच्या सिद्दींनी स्वतंत्रपणे वागण्यास सुरुवात केली. सिद्दींचे आरमारी सामर्थ्य जबरदस्त असल्यामुळे प्रथम आदिलशहाने नंतर मुघलांनीही आरमारप्रमुख म्हणून सिद्दींना मान्यता दिली. दंडाराजपुरीजवळ असलेला जंजि-याचा किल्ला सिद्दींनी राजधानीसाठी निवडला.

सिद्दीचे उपदव्याप वाढल्यानंतर त्याच्या बंदोबस्ता साठी राघो बल्लाळ अत्रे यांनी स्वराज्यातील पहिली मुस्लिम पलटण उभा केली.

कोकणातील कोळी,भंडारी तरुणांना देखील त्यांनी एकत्र  केले. त्यांच्या व या पठाणांच्या साहाय्याने राघो बल्लाळ यांनी दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली. बहुतेक कोकण हस्तगत केला. याच मुस्लिम पलटणी मधून आलेला दौलतखान पुढे स्वराज्याच्या आरमाराचा सेनापती बनला. 

रघुनाथ बल्लाळ यांनी १४ ऑगस्ट १६५७ रोजी जंजिऱ्याच्या जवळ दंडाराजापुरी वर वर्चस्व मिळवलं. छत्रपती शिवाजी महाराजानी इथे सामराजगड बांधून सिद्दीच्या हालचालींवर नियंत्रण आणले. मात्र राघो बल्लाळ यांनी प्रयत्न करूनही त्यांना जंजिरा जिंकता आला नाही.

तरीही त्यांनी कोकणातील मोक्याचे किल्ले घेऊन दंडाराजपुरीवर वर्चस्व निर्माण केले आणि तेथून जंजिऱ्याच्या किल्ल्यावर तोफांचा भडीमार सुरु केला. तेव्हा फत्तेखान सिद्दी शरण आला आणि त्याने रघुनाथ अत्रेंना घोडा वस्त्रे पाठवून तह केला. हा तह नेमका केव्हा झाला आणि तहाचा तपशील काय होता याची माहिती मिळू शकत नाही.

हा तह झाल्यावर काही काळ सिद्दीकडून मराठयांना कोणताच उपद्रव झाला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही काही काळ राघो बल्लाळ जिवंत होते. पुढे त्यांचा मृत्यू झाल्यामुळे कोकणातल्या प्रदेशावर मराठयांची पकड काही प्रमाणात सैल झाली. तेव्हा  छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः कोकणची मोहीम हाती घेऊन सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यावरचा जरब पुन्हा प्रस्थापित केला.

अशीही इतिहासाची जिवंत परंपरा अत्रेंच्या कुटुंबात चालत आलेली. या पराक्रमाचा वारसदार म्हणून आचार्य अत्रे यांनी शिवछञपतींचा इतिहास महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात कोरण्यासाठी प्रयत्न केले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.