ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राघोजी भांगरे यांच्या शौर्याचे पोवाडे आजही गायले जातात.

महाराष्ट्रातील महादेव कोळी म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारी जमात. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना गडकिल्ले संभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

स्वराज्यातील अनेक किल्ल्यांची शिलेदारी परंपरेने महादेव कोळी समाजातील वीरांनी सांभाळली होती.

१८१८ साली पेशवाई बुडाली आणि इंग्रजी सत्तेचा अंमल सुरू झाला. शिवरायांचे गडकिल्ले हे स्वातंत्र्यलढ्याचे स्फूर्तीस्थान ठरू शकतात हे ओळखून ब्रिटिशांनी तोफा लावून बुरुज तोडण्यास सुरवात केली.

याला विरोध करणाऱ्या कोळी समाजाचा गडांची शिलेदारी काढून घेतली. वतनदाऱ्या नष्ट केल्या. आपले परंपरागत अधिकार काढून घेतल्या मुळे महादेव कोळी समाजात प्रचंड असंतोषाचा आगडोंब धुमसू लागला.

या अन्यायाला वाचा फोडली आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेले देवगाव या खेड्यात राघोजींचा जन्म झाला. वडील रामजी ब्रिटिश सरकारच्या दरबारी सुभेदार म्हणून नोकरी करत होते.

कोकणातील एका दरोड्याचे खापर राघोजींच्या वडिलांच्या माथ्यावर मारण्यात आले. त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमानला धाडण्यात आलं.

यातून बाचाबाची होऊन रागाच्या भरात राघोजीनी अमृतराव कुलकर्णी या पोलिसाचा मुंडकं तोडून खून केला.

पोलिसांचा ससेमीरा चुकवण्यासाठी राघोजींनी बाडगी माचीच्या डोंगरदऱ्याचा आश्रय घेतला, तिथे इंग्रजी सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आपल्या सहकाऱ्यांसह क्रांतीची मशाल हाती घेतली.

इ. स. १८२८ ला इंग्रजांनी शेतकऱ्यांवरचा शेतसारा वाढवला होता.

या अन्यायी सारावसुलीमुळे गोर गरीबांवर भरमसाठ कर्जे येऊन बसली. ब्रिटिशांबरोबर सावकारी पाश शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळला गेला.

यामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध जुलमाविरुद्ध  तरुण पेटून उठले.

अकोले तालुक्यात बंड पुकारणाऱ्या रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरूंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटले होते. परंतु ते प्रत्यक्षात आले नाही.

उलट वणवा पेटला.

राघोजी भांगरे यांनी भिल्ल आदिवासी जमातीच्या टोळ्या उभ्या केल्या. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यातील अनेक पराक्रमी तरुण त्यांना सामील झाले.

इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात राघोजी भांगरे यांचं बंड उभारले.

ब्रिटिशांच्या बरोबरीने गोरगरिबांची लूट करणाऱ्या सावकारांना देखील धडा शिकवण्यास सुरवात केली.

राघोजींचा दरारा वाढला. अनेक सावकार आपला जीव वाचवण्यासाठी राजूर भागातून पळून गेले. या आदिवासी टोळ्यांवर हल्ला करून येणाऱ्या इंग्रज सैन्याला शिवरायांच्या गनिमी काव्याने पळवून लावले.

 ‘आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रजांचे वैरी आहोत’,

अशी भूमिका राघोजींनी जाहीर केली होती. कुटुंबातील समाजातील स्रियांबद्दल राघोजीनां अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन ते खपवून घेत नसत. शौर्य, प्रामाणिकपणा व नितिमत्ता याला त्यानी उच्चतम मानले.

नोव्हेंबर इ. स. १८४४ ते मार्च इ. स. १८४६ या काळात राघोजींचे बंड शिगेला पोहोचले होते.

त्यांच्यावर १० हजार रुपयांच बक्षीस लावण्यात आल होतं.

साताऱ्याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी राघोजींनी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालवले होते, अस सांगितलं जातं.

या निमित्ताने त्यांची छत्रपती प्रतापसिंह भोसले यांच्याशी भेट सुद्धा झाली होती. पैशांची जमवाजमव चालली होती. ब्रिटिशांना हाकलून छत्रपतींचे स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याचा हा प्रयत्न होता.

राघोजीचे बंड मोडून काढण्याची जबाबदारी घेतली कॅप्टन मँकिंटॉश याने.

हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घखट, रस्ते, जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळविली परंतु बंडखोर वरमले नाहीत. बंड तीव्र झाले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली, मार्ग रोखून धरले. ८० जणांना कैद केले. दहशतीमुळे लोक उलटले.

फितुरीमुळे राघोजीचा खंबीर साथीदार बापूजी भांगरे मारला गेला.

इ.स. १८४५ ला जुन्नरचा उठाव ठरला.

कॅप्टन मँकिंटॉशने २० हजाराची फौज घेऊन वेढा टाकला. यावेळी मोठी हार पत्कारावी लागली. भागोजी नाईक, खंडू साबळे आदी निष्ठावंत साथीदार धारातीर्थी पडले.

राघोजी भांगरे कसेबसे तेथून निसटले. गोसाव्याचे वेषांतर करून मावळ प्रांतात गावोगावी भटकू लागले. नव्याने आदिवासी तरुणांना गोळा करून बंड उभारायची त्यांनी तयारी केली होती.

याचसाठी राघोजी विठोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी पंढरपूरला आले.

चंद्रभागेत स्नान करत असताना त्यांना एका पोलीस शिपायाने ओळखले. त्याने कुमक बोलवून घेतली.

पंढरपूरच्या मंदिराला कॅप्टन गिलने वेढा घातला. विठुरायाच्या साक्षीने निशस्त्र असलेल्या राघोजी भांगरे यांना शेकडो सैनिकांनी पकडले.

त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला.

पण कुटील इंग्रजांनी त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी वकीलही मिळू दिला नाही. २ मे १८४८ रोजी ठाणे सेंंट्रल जेल येथे सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरें हसत हसत फाशीवर चढला.

धन्य धन्य राघोजी भांगरे वीर रणधीर ।
स्वातंत्र्याचा घातला पाया ज्यानं खंबीर ।
लोकांचा राजा न्यायी गुणगंभीर । राघोजीची कीर्ति,
दिगंतावरती, पवाडे गाती, कवी शाहीर ॥जी॥

आजही त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जातात. सरकार दरबारी मात्र उशिरा त्यांची दखल घेतली गेली.

यादिवशी १६६ व्या स्मृतीदिनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे सेंट्रल जेल व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मुख्य चौकास आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे असे नाव देण्यात आले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.