हि तांडव गणपतीची मूर्ती ज्याच्या कुणाच्या हाती आली त्याचे कधीच भले झाले नाही.

भिडू लोक आजकाल प्रश्न विचारायचं कमी केलंय की काय असं म्हणत होतो तेवढ्यात काल एक मेसेज दिसला. आपले  एक भिडू वेलिंग नाडकर्णी यांनी प्रश्न विचारला होता की,

“पेशवेकालीन तांडव गणपतीची माहिती मिळू शकेल का ? “

आता भिडू लोकांचा प्रश्न म्हणजे आपल्यासाठी आदेशच. आम्ही लगेच या तांडव गणपती बद्दल माहिती गोळा करायला चालू केली. विषय जरा वाढीवचं होता. पण म्हणतात ना शोधलं की सगळ सापडत.

तांडव गणपती हि एक पेशवेकालीन गणेशमूर्ती होती. असे म्हणतात की, तिच्यामुळे पेशवे घराण्याचा वाईट काळ सुरु झाला. या तांडव गणपतीच्या माहितीचा शोध घेत असतांना श्री प्रमोद ओक यांनी लिहिलेल्या “पेशवे घराण्याचा इतिहास” या पुस्तकात त्याचा संदर्भ आढळून आला.

त्यात सांगितले आहे की,

“हि तांडव गणपतीची मूर्ती ज्याच्या कुणाच्या हाती आली त्याचे कधीच भले झाले नाही.”

भगवान शिवशंकर नृत्य करतात त्याला तांडव नृत्य म्हणतात. त्यांचे चिरंजीव भगवान गणेश यांची तांडव करणाऱ्या रूपातली पंचधातुतली दीड फुट उंचीची मूर्ती श्रीमंत रघुनाथराव दादासाहेब पेशवे यांच्याकडे होती. ती गणपतीची मूर्ती त्यांच्याकडे कशी आली? कुठून आली? याचे काही ठोस पुरावे मिळत नाहीत.

काही जण असंही म्हणतात की खूप वर्षापूर्वी उत्तर स्वारीच्या वेळी रघुनाथरावाला ही मूर्ती मिळाली असावी. कोणी म्हणत की कर्नाटकात मधील म्हैसूर प्रांतातील कोणी कोत्रकर नावाचे गृहस्थ अघोरी विद्येच्या बाबतीत रघुनाथ रावांचे गुरु होते. त्यांनी हि तांडव गणपतीची मूर्ती रघुनाथ रावांना उपसानापुर्वक अनुष्ठान करण्यासाठी खास कर्नाटक मधून आणून दिली होती.

काही का असेना पण साधारण १७६५च्या नंतर ही मूर्ती राघोबा दादाच्या देवघरात दिसू लागली

त्याकाळात थोरले माधवराव पेशवे कसल्यातरी आजाराने ग्रस्त होते. या आजारपणात त्यांचे दुखणे कमी न होता अधिकच वाढत चालले होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यांची, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याबाद्दलची आशाही मावळत चालली होती.

त्यामुळे राघोबादादांना हाव वाढून त्यांना पेशवाईचे स्वप्न पडू लागले होते. ही लालसा पूर्ण व्हावी म्हणून रघुनाथ राव अघोरी मांत्रिकांच्या व काळ्या जादूमध्ये पारंगत असलेल्या लोकांच्या मदतीने स्वतःजवळील तांडव नृत्य करणाऱ्या उग्र गणपतीची कडक उपासना करू लागले.

पुढे १७७३ मध्ये निजामावर स्वारी करण्याचे निमित्त सांगून रघुनाथ रावांनी पुण्यातून पळ काढला होता. त्यावेळी त्यांच्या शेडणीकर नावाच्या एका आश्रीताने ती तांडव गणपतीची मूर्ती शनिवार वाड्यातून पळवली आणि शेडणी गावात नेऊन एका पिंपळाच्या झाडाखाली तिची स्थापना केली.

पण काही दिवसातच ती मूर्ती तिथून गायब झाली. कोणी म्हणत ती चिंचवड गेली आणि तिथून साताऱ्यातील वाई मधल्या एका ब्राह्मणाच्या घरी आढळून आली. पण त्यालाही या अघोरी मूर्तीच्या करणीचा फटका बसला. वैतागून त्या गरीब ब्राह्मणाने जुन्या पडक्या विहिरीत मूर्तीचे विसर्जन केले.

10659146 698395140244169 8431345250137835279 n

या गोष्टीला ५०-६० वर्षे उलटून गेल्यानंतर साताऱ्यामधील प्रसिद्ध संन्यासी गोडबोले शास्त्री (नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद) यांच्या स्वप्नात ती मूर्ती आली. स्वामींनी आपले शिष्य श्री वामनराव कामत यांना मूर्तीचा शोध घेण्याची आज्ञा दिली. चौकशी अंती कामत यांना मूर्तीचा कृप्रसिध्द इतिहास समजला. त्यामुळे ते गुरुजींची आज्ञा पाळण्यास टाळाटाळ करू लागले.

इकडे गोडबोले शास्त्रींना वारंवार दृष्टांत होऊ लागले होते. अखेर नाईलाजाने कामतांनी मूर्ती बाहेर काढली. आपल्याच देवघरात तिची स्थापना करून कामात तिची पूजा अर्चना करू लागले. यानंतर ८-१० वर्षातच कामात कुटुंबातील मंडळी एक-एक करून वारली. यामुळे निसंतान झालेले कामात सुद्धा हाय खाऊन १९३८ च्या सुमार्यास वारले.

पुढे १९४३ च्या सुमारास ती मूर्ती मुंबईचे एक डॉक्टर मोघे यांच्याकडे कामतांच्या गुरुभगिनी यांच्या मार्फत पोहचली. ती आणायला त्यांचे मित्र सोनटक्के साताऱ्याला गेले असता मूर्ती घेऊन परतत असताना ते पुण्यात थांबले होते. रात्रीचा प्रवास टाळण्यासाठी ते मूर्ती घेऊन गेले आणि त्याच रात्री त्यांच्या पत्नी पोटदुखीने हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी वेदना असह्य झाल्या होत्या. सोनटक्के मूर्ती घेऊन मुंबईला निघाले. ती मूर्ती जशी दूर गेली तशी सोनटक्के यांच्या पत्नीची पोटदुखी एकदम थांबली.

यानंतर २-३ वर्षे मूर्ती मूंबईला डॉ. मोघ्यांच्या घरी राहिली. पुढे डॉ. मोघ्यांना मुलगा झाला पण तो वेडसर निपजला. तसेच डॉ. मोघे व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे त्रासून मोघ्यांनी प्रॅक्टीस बंद करून मुंबई सोडली. मोघ्यांच्या घरी विद्यार्जनासाठी विद्यार्थी ठेवण्याची जुनी पद्धत होती. तशा विद्यार्थ्यांपैकी केशवराम अय्यंगार हा कर्मठ ब्राम्हण विद्यार्थी एक होता. मुंबई सोडतांना डॉ मोघ्यांनी गणेशाची मूर्ती इतर संग्रहासह, सर्व इतिहास सांगून अय्यंगारला दिली.

कालांतराने अय्यंगारने म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तीकाराकडून मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती तयार करवून आणली. दोन्ही मूर्ती कांचीपूरमचे शंकराचार्यांना अर्पण करण्याचे ठरविले. स्वामींनी परवानगी देताच, गरोदर पत्नीची नाजूक अवस्थाही नजरेआड करून अय्यंगार दोन्ही मुर्ती घेऊन कांचीपूरमला गेले. स्वामींनी मूर्तीकडे क्षणभरच दृष्टीक्षेप टाकला व प्रतिकृती ठेवून घेतली व अघोरी मूर्ती परत केली. निराश मनाने अय्यंगार मूर्तीसह मद्रासला परतले. तोच त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीची बातमी समजली. पण मुलगा वेडसर निपजला.

अय्यंगारांची अवस्था ऐकून त्यांचे स्नेही मद्रासच्या गणेश बुक एजन्सीचे मालक श्री. सुबय्या यांनी श्री अय्यंगार नको म्हणत असतानाही मूर्ती स्वतःजवळ ठेवली. पुढे सुबय्यानी ही मूर्ती मद्रासच्या लंबूचेट्टी स्ट्रीटवरील शंकरमठाला अर्पण केली. यानंतर वर्षभरातच श्री सुबय्या कैलासवासी झाले. तर सध्या ती मूर्ती शंकरमठातच आहे असे समजते.

अशा अनेक दंतकथा, आख्यायिका या तांडव गणेशाच्या मूर्तीशी जोडल्या गेलेल्या आहेत. याच मूर्तीमुळे पेशवाई बुडली असे म्हणतात. या पाठमागची अंधश्रद्धा सोडली तर एक अर्थे ते खरेच आहे. राघोबा दादा सत्तेच्या हव्यासापोटी अघोरी प्रयोग करणाऱ्याच्या नादी लागून राजकारण केलं नसत, जर नारायणरावाचा खून त्यांनी केला नसता तर पुण्यातली पेशवाईचे पुढे झालेले अधःपतन टळले असते हे नक्की.

हे ही वाच भिडू.

3 Comments
 1. Aditya says

  चित्तोढगढ च्या स्रिया अग्नीकांड नंतरचा गडावरील गढाचा ईतिहास सांगु शकाल का ?

 2. किरण पाटील says

  खान्देशात जशी कानबाई ची पूजा करतात
  तसेच भालदेव पूजा असते त्या बद्दल काही माहिती भेटलं का

 3. प्रजाक सुके says

  नमस्कार
  बोल भिडू वर अनेक गोष्टींची खुप छान माहिती वाचायला मिळते.
  छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले, बांधले तसेच अनेक ठिकाणी जलसंधारण बंधारे सुद्धा बांधले . पण जशी गड किल्ल्यांची माहिती इतिहासात मिळते तशी शिवकालीन बंधार्यां संदर्भात माहिती मिळत नाही . बोल भिडूच्या माध्यमातून या बाबत माहिती मिळाली तर वाचायला आवडेल.

Leave A Reply

Your email address will not be published.