साधा कारकून वाटणारा चेहरा होता पण पडद्यावर त्याच्यापेक्षा खतरनाक व्हिलन कधी झाला नाही…

बॉलिवूड आज ज्या प्रकारे साऊथचे सिनेमे ढापुन त्याचे रिमेक बनवतय त्याला काय तोडचं नाही. साऊथ म्हणजे टॉलिवूडमध्ये डेंजर डेंजर व्हिलन बघायला मिळतात आणि मनमोहक दृश्य सुद्धा बघायला मिळतात. हिरोची हाणामारी आणि सुंदर सुंदर गाणीसुद्धा बघायला मिळतात.

आज ज्या उंचीवर साऊथ मुव्हीज आहेत त्याआधी तितक्या मोठ्या आणि एचडी प्रकारात या स्टोरी नव्हत्या. हा तो काळ होता जेव्हा रजनीकांत,नाझर, कमल हसन, चिरंजीवी ही मंडळी पूर्णपणे हिरोगीरी करण्याच्या मूडमध्ये होते मात्र व्हिलन ज्यावेळी कोणी साकारत नव्हतं अशा वेळी एक नाव पुढे येतं ते म्हणजे

रघुवरन.

आता रघुवरन म्हणल्यावर तुम्हाला चेहरा आठवणार नाही पण आपल्या नागर्जूनचा मेरी जंग : वन मॅन आर्मी हा सिनेमा तर तुम्ही बघितलाच असेल त्यात सत्या हा व्हिलन दाखवलाय आणि शत्रूचा बाप साकारलाय ना तो आहे रघुवरन.

लाल डोळे, कमालीचे एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावर दिसणारा राग ,आवाजातला खुनशीपणा हे सगळं रघुवरनने बॉलीवूडला थंड डोक्याचा व्हिलन काय असतो हे दाखवून दिलं. रघुवरन हा साऊथचा टॉपचा व्हिलन होता. हिरो बनायला आलेला रघुवरन व्हिलन कसा झाला आणि तेही टॉपचा व्हिलन कसा झाला तेही बघूया.

सुरवातीला सिनेमाचा नाद रघुवरनला भोवला होता आणि त्यामुळे त्याचं ग्रॅज्युएशन झालं नव्हतं. काही काही सिनेमांमध्ये त्याम बरेच कामं केले आणि क्रेडिट मध्ये त्याचं नावही दिलं जात नव्हतं. 1979 ते 1983 पर्यंत नाटकाशी रघुवरन संलग्न राहिले त्यामुळे त्यांचा अभिनय बहरत गेला.

1983 साली रघुवरनला लीड सिनेमा मिळाल तो म्हणजे इजवंतू मनिथन या सिनेमामध्ये. सिल्क सिल्क सिल्क या सिनेमात मुख्य व्हिलन म्हणून रघुवरनची एन्ट्री झाली.

या सिनेमांमुळे रघुवरनची चर्चा सुरू झाली आणि जास्तीत जास्त व्हिलनचे रोलच रघुवरनला मिळाले. 80 च्या दशकात व्हिलन साकारायला जास्त लोकं राजी व्हायची तेव्हा रघुवरन हा दिसायला देखणा गडी होता. मानेवर रुळणारे केस, चांगली पर्सनॅलिटी आणि डोळ्यावर गॉगल कुणालाही हा माणूस हिरोच वाटेल इतका रघुवरन दिसायला भारी होता.

त्यावेळी हिरोला टक्कर देऊ शकणारा व्हिलन फक्त रघुवरन होता. सुरवातीला भले व्हीलनच काम रघुवरनने केलं पण टाईप कास्ट होऊ नये म्हणून हिरोची कामसुद्धा त्याला मिळाली. शिवाजी द बॉस, मेरी जंग वन मॅन आर्मी या दोन सिनेमांमधून रघुवरन भारताला माहिती झाला होता.

रघुवरन हा असा अभिनेता होता जेव्हा त्याला लीड हिरो म्हणून लोकांची पसंती असतानाही त्याने व्हिलन आणि साईड रोल केले होते यामुळे तो फक्त व्हिलन म्हणून ओळखला गेला नाही. हिंदुस्थान टाइम्सने तेव्हा रघूवरन बद्दल छापलं होतं की रघुवरनने व्हिलन कसा असतो याचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.

बऱ्याच सिनेमांमध्ये रघुवरन हा रजनीकांतच्या विरुद्ध व्हिलन म्हणून असायचा याला कारण होतं रजनीकांत हा रघुवरनचा भयंकर फॅन होता. फक्त रजनीकांतचं नाहितर कमल हसन, नागर्जून आणि आताची बरीच मंडळी रघुवरनची फॅन आहेत.

व्हर्सटाईल असलेला रघुवरन हा फक्त तामिळच नाही तर कन्नड, मल्याळम, तेलगू आणि हिंदीमध्ये सुद्धा झळकला. लाल बादशहा, रक्षक आणि शिवा आणि अजून 5-6 हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. हिंदी प्रेक्षक अजूनही रघुवरनचे फॅन आहेत. 2000 सालापर्यंत रघुवरन 200हुन अधिक सिनेमे करून साऊथचा मोस्ट पॉप्युलर व्हिलन होता. रघुवरन अजूनही बॉलिवूड आणि टॉलीवुडवर राज्य करू शकला असता पण हे सगळं सुख त्याच्या भाग्यात नव्हतं.

जितक्या वेगाने रघुवरन स्टार बनत चालला होता तितकाच तो व्यसनी सुद्धा बनत चालला होता. दारूचा त्याला जबर नाद लागला होता. पण अति दारू पिल्याने ऑर्गन फेल झाले आणि रघुवरन 2008 साली सिनेसृष्टीतून निखळला.

2018 साली रजनीकांतने रघुवरनच्या स्मरणार्थ एक म्युझिक अलबम लॉन्च केला होता. कारण रघुवरन हा संगीत शौकीन होता, गिटार आणि पियानो तो सहज वाजवायचा. खुद्द इलायराजाने त्याला म्युझिकच प्रशिक्षण दिलं होतं. आजही सत्याचा बाप बघताना अंगावर काटा येतो तीच रघुवरनच्या अभिनयाची पावती आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.