“राहत इंदौरी बनने के लिए थोडा मुँह काला भी करना पडता है”

गुलाब, ख्वाब, दवा, जहर, जाम क्या क्या है
मै आ गया हु बता इंतजाम क्या क्या है

उर्दुतले प्रसिद्ध शायर, गझलकार राहत इंदौरी यांचा हा शेर. राहत इंदौरी यांच्या निधनाची बातमी ऐकताच मला खात्री आहे की ज्यांना राहत इंदौरी हा माणुस कोण आहे हे माहितीय, ते नक्कीच हळहळले असतील.

उर्दु भाषेवर, उर्दु गझलांवर प्रेम असणारी व्यक्ती राहत इंदौरी यांना ओळखत नाही, असं आढळणार नाही.

ज्यांना हा माणुस माहित नाहीय, त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं म्हणजे, अजुनही सोशल मिडीयावर ‘बुलाती है मगर जाने का नही’ यावर आधारीत विनोदी मीम्स शेयर होत असतात. तर ‘बुलाती है मगर जाने का नही’ हि मुळ गझल राहत इंदौरी यांची आहे. या ओळीचा पुढे आपापल्या परीने लोकांनी अर्थ लावला. या गझलमधले त्यांनी लिहिलेले काही शेर असे आहेत,

बुलाती है मगर जाने का नही
ये दुनिया है इधर जाने का नही
मेरे बेटे किसी से इश्क कर
मगर हद से गुजर जाने का नही

राहत इंदौरी यांच्या आयुष्यावर नजर टाकल्यास त्यांचं सुरुवातीचं जीवन काहीसं हलाखीत गेलं. १ जानेवारी १९५० रोजी इंदौर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल रफ्तुल्लाह कुरैशी मिलमध्ये कामगार होते. इंदौर येथील नुतन प्राथमिक शाळेत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. १९७३ साली इंदौर येथील इस्लामिया करीमिया काॅलेज मधुन त्यांनी पदवीशिक्षण पूर्ण केलं. पुढे १९७५ मध्ये भोपाळ येथील बरकत उल्लाह विश्वविद्यालयातुन उर्दु साहित्यात त्यांनी एम. ए. केलं.

साधारण काॅलेजच्या काळातच १९ वर्षापासुन त्यांनी शेरोशायरी सादर करणं सुरु केलं.

शेरोशायरी सादर करण्याची राहत इंदौरी यांची विशिष्ट स्टाईल होती. ती स्टाईल लोकांना खुप आवडायची. शेर किंवा गझल पेश करताना प्रत्येक शब्दावर जोर देणं. आवाजाचे विशिष्ट चढ-उतार उतार वापरुन प्रत्येक शब्दामागचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवणं.

काही ओळी पुन्हा पुन्हा उच्चारणं. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष ऐकलं असेल किंवा, त्यांचा कोणताही व्हिडीओ बघाल तर, राहत इंदौरी यांच्या अशा सादरीकरणाने गझलमधला प्रत्येक शब्द डोळ्यांसमोर जीवंत उभा राहतो. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्या एका शेरमधली ओळ अशी,

‘राज जो कुछ हो, इशारो मे बता देना’

हि एकच ओळ राहत इंदौरी ज्या पद्धतीने पेश करतात खरंच त्याला तोड नाही.

स्वतःच्या अशा खास सादरीकरणाबद्दल राहत इंदौरी यांची स्वतःची अशी मतं होती. ते म्हणायचे,

” मी म्हणत असलेल्या एखाद्या शेरला तुम्ही टाळ्या वाजवुन दाद देता. बहुत खुब, व्वाह असं म्हणता. अर्थात तो शेर सुद्धा चांगलाच असतो. पण जेव्हा तुमच्याकडुन कमी प्रतिसाद मिळतो. किंवा तुम्हाला तो शेर कळाला नसतो. अशावेळी समजुन जा मी शेरच्या माध्यमातुन फार मोठी गोष्ट बोलुन गेलो.”

त्यांनी एका कार्यक्रमात एक किस्सा याबाबतीत सांगीतला होता तो असा की, खुपदा उर्दु शेर मध्ये काही अवघड शब्द असतात. तेव्हा त्या शब्दांचा अर्थ समजावताना शायर हिंदीचा आधार घेतात. अशाच एका कार्यक्रमात राहत इंदौरी गझल सादर करत होते.

गझलमधल्या एका ओळीत ‘साहिब-ए-मस्लन’ हा शब्द होता.

त्याच कार्यक्रमात प्रसिद्ध कवी कुमार विश्वास निवेदन करत होते. राहत इंदौरी यांनी कुमार विश्वास यांना शब्दाचा अर्थ लोकांना सांगायला सांगितला. ‘साहिब-ए-मस्लन’ चा अर्थ कुमार विश्वास यांनी ‘सत्ताधीश’ असा सांगीतला.

सांगीतलेला अर्थ बरोबर होता परंतु काही विशिष्ट शब्दांमध्ये खोल अर्थ दडलेले असतात. तसा अर्थ ऐकणा-यापर्यंत पोहोचला पाहिजे.

ते म्हणायचे,

“आम्ही जे काही शेर किंवा गझल म्हणतो तेव्हा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही जे सांगतोय ते चांगलंच सांगतोय तुम्हाला, अशी तुम्ही मनाची खात्री करुन घ्या. शेर समजायचा किंवा त्यामागचा अर्थ जाणुन घ्यायचा प्रयत्न करु नका. तुम्ही फक्त सांगणा-यावर विश्वास ठेऊन तो जे काही म्हणतोय त्या शब्दांवर विश्वास ठेवा.”

राहत इंदौरी यांचा दारुवर एक शेर आहे,

दिन ढलगया रात गुझरने की आस मै
सुरज नदी मै डुब गया हम गिलास मे

हा शेर सांगण्याचा कारण असं की, राहत इंदौरी आणि प्रख्यात गझलकार जाॅन एलिया यांची गहिरी दोस्ती.

एकदा मुशाय-याच्या एका कार्यक्रमासाठी राहत इंदौरी पाकिस्तानला गेले होते. सकाळी हाॅटेलवर त्यांना जाॅन एलिया गाडी घेऊन घ्यायला आले. राहत इंदौरींनी जाॅनला विचारलं

“कितना टाईम लगेगा उस जगह पहुचने मे?”

या प्रश्नाचं उत्तर देताना जाॅन एलिया म्हणाले,

“जितना वक्त तीन पेग पिने मे लगता है उतना..”

जाॅनचं उत्तर ऐकुन राहत इंदौरी आणि जाॅन दोघेही खळखळुन हसले.

खुपदा अनेक युवा पिढी शेर सादर करण्याच्या त्यांच्या स्टाईलची नक्कल करताना दिसायचे. तेव्हा त्यांचं इतकंच म्हणणं असायचं,

“राहत इंदौरी बनने के लिए थोडा मुँह काला भी करना पडता है”

सध्या देशात जी काही महामारी आहे, जे काही राजकीय वातावरण आहे. या सर्व वातावरणाला समर्पक असा राहत इंदौरी यांनी एका कार्यक्रमात सादर केलेला शेर आठवतो. तो शेर असा…

बनके एक हादसा बाजार मे आ जाएगा
जो नही होगा वो अखबार मे आ जाएगा
चोर, उचक्को की करो कद्र
के मालुम नही,
कौन कब कौन सी सरकार मै आ जाएगा

मध्यंतरी राहत इंदौरी यांच्या एका गझलमधली ओळ सोशल मिडीयावर चांगलीच ट्रेंडिंग होती. ती ओळ होती, ‘किसी के बाप का हिन्दोस्तान थोडी है’. तो संपुर्ण शेर असा…

सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोडी है

जेव्हा एखादा कवी किंवा साहित्यिकाचं निधन होतं तेव्हा मागे उरतात त्याच्या लेखणीतुन निघालेले शब्द. आज राहत इंदौरी आपल्यातुन गेले असले तरी त्यांनी लिहिलेले गझल, शेर वाचुन यापुढच्या अनेक पिढ्यांना हा माणुस किती प्रतिभावंत शायर होता, याचा प्रत्यय येईल.

लेखाचा शेवट त्यांच्याच एका शेरने करावासा वाटतो. स्वतःचा मृत्यु झाल्यावर काय करावं, हे राहत इंदौरी यांनी या शेरमध्ये सांगीतले आहे,

मै जब मर जाऊ तो मेरी अलग पहचान लिख देना
लहु से मेरी पेशानी पे हिन्दोस्तान लिख देना

  • देवेंद्र जाधव

हे ही वाचा भिडू.

1 Comment
  1. श्रीनिवास says

    बोल भिडू चे आत्तापर्यंतचे जेवढे लेख आहेत त्यात सगळ्यात सुमार दर्जाचा लेख……
    लेख प्रकाशित करण्याची अति घाई, बेसिक research अजून वाढवता आला असता….
    2-3 youtube व्हिडिओ पाहून लिहल्यासारखे वाटते .

Leave A Reply

Your email address will not be published.