भारताला शूटिंगमध्ये पहिल्यांदा एशियन गोल्ड मेडल कोल्हापूरच्या लेकीने मिळवून दिलंय….

भारत हा क्रिकेटवेडा देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे आपल्या देशातल्या जवळपास ७०% लोकांचा आवडता खेळ क्रिकेटचं आहे. ऑलम्पिक स्पर्धा, एशियन गेम, कॉमनवेल्थ अशा खेळांमध्ये जेव्हा आपल्या देशाला जास्त मेडल्स मिळत नाही तेव्हा आपण हळहळ व्यक्त करत बसतो. कारण आपला अर्धा देश जर क्रिकेटप्रेमी असेल तर आपण जास्त मेडलची अपेक्षा कशी ठेवू शकतो.

असो पण आजचा किस्सा आहे आपल्या महाराष्ट्राच्या लेकीचा. जिने केलेला पराक्रम जागतिक पातळीवर देशाची मान उंचावणारा ठरला होता. पहिल्यांदा अशी कामगिरी या कोल्हापूरच्या लेकीने केली होती आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं होतं. आज जाणून घेऊया या मराठी मुलीच्या पराक्रमाचा किस्सा. 

२००६ मध्ये शुटर तेजस्विनी सावंत मेलबोर्नच्या मैदानात झालेल्या कॉमनवेल्थ गेममधे २ सुवर्णपदकाची लूट करून भारतात आली. ज्यावेळी तेजस्विनी सावंत भारतात आली तेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या कोल्हपूरमध्ये जेव्हा ती आली तेव्हा कोल्हापूरकरांनी तिचं भव्य दिव्या स्वागत केलं. फटाके, फुलं आणि टाळ्यांनी तेजस्विनीचं कौतुक करण्यात आलं.

आपल्याच शहरात झालेल्या स्वागताने तेजस्विनी भारावून गेली होती. लहान लहान मुलांच्या तोंडी तेजस्विनी सावंतचं नाव होतं. या लहान मुलांमध्ये ८ विच्या वर्गात शिकणारी एक मुलगी होती. तेजस्विनी सावंतची कामगिरी बघून आपणही असं काहीतरी अचाट, अफाट करण्याचं ध्येय तिने बाळगलं होतं. ध्येय होतं देशासाठी शूटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणे. 

पुढे काही दिवसानंतर त्या मुलीने शूटिंग खेळाचे धडे गिरवायला सुरवात केली होती. दहावीची परीक्षा डोक्यावर होती पण घाबरत घाबरत का होईना तिने शूटिंग शिकायला सुरवात केली होती. घरच्यांना सुद्धा या बद्दल काहीच माहिती नव्हतं. दहावी पास झाल्यावर तिने तिच्या वडिलांना शुटिंगबद्दल सांगितलं. वडिलांची इच्छा होती कि मुलीने सायन्स क्षेत्र निवडावं पण मुलीची जिद्द बघून त्यांनी तिला परवानगी दिली.

कोल्हापूरच्या शूटिंग सेंटर मध्ये मुलीची गोल्ड मेडल जिंकण्याची तयारी सुरु झाली.

ती मुलगी होती राही सरनोबत

२०१८ मध्ये इंडोनेशियात झालेल्या १८ व्या एशियन गेम स्पर्धेत महिला कॅटेगिरीत २५ मीटर पिस्टल शूटिंग सुरु झालं. यात भारताचे दोन खेळाडू होते एक होती राही सरनोबत आणि दुसरी मनु भाकर.

क्वालिफायिंग राउंडमध्ये राही सरनोबत हि मनु भाकरच्या तुलनेत पिछाडीवर होती. पण फायनलमध्ये राहीने आपल्या युक्तीच्या जोरावर सगळ्यांना मागे टाकत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. यामुळे ती

एशियन नेमबाजी स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.

या अगोदरही राहीने अनेक मेडल्स जिंकलेले आहेत. २००८ मध्येच राहीने युथ कॉमनवेल्थ गेममधे सुवर्णपदक पटकावून बिगुल वाजवलं होतं.

पुढे दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थमध्ये २ गोल्ड सुद्धा तिने जिंकले होते. २०१४च्या एशियन गेम्समध्ये राहिला ब्रॉन्झवर समाधान मानावं लागलं. २०१५ मध्ये चॅन्गवॉंन मध्ये झालेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत २५ मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये तिने परत एकदा गोल्ड मेडल मिळवलं. 

एकदा दुखापतीमुळे ऑलम्पिक स्पर्धेत तिला सहभाग घेता आला नव्हता. वर्ष होतं २०१२. लंडनमध्ये झालेल्या ऑलम्पिक गेममधे राही भारताची सगळ्यात कमी वयाची शुटर होती. नवखी असल्याकारणाने तिला यश काही तिथे मिळालं नाही. रिओ स्पर्धेतसुद्धा तिला पदकाने हुलकावणी दिली. दुखापती खेळावर परिमाण करू लागल्या होत्या.

एशियन स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्यावर महाराष्ट्र सरकारने राहिला ५० लाख लाखाचा सन्मान देऊन तिचं अभिनंदन केलं होतं. तेजस्विनी सावंत आपला आदर्श असल्याचं राही सांगते. २०१९ मध्ये झालेल्या म्युनिच स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून राही २०२०च्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धेसाठी सिलेक्ट झाली होती. भारत सरकारकडून राही सरनोबतला मानाचा अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. 

नुकत्याच झालेल्या ISSF वर्ल्डकपमध्येही राहीने बाजी मारली आणि २५ मीटर शूटिंगमध्ये गोल्ड मिळवलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.