रहमान म्हणाला,” ऑस्कर मिळाल्याशिवाय मायकल जॅक्सनला भेटणार नाही.”

नव्वदच्या दशकातला काळ. तामिळनाडू मध्ये एक सिनेमा धुमाकूळ घालत होता, नाव होत काधलन. पिक्चरपेक्षा त्यातली गाणी गाजत होती. रोजामधून जोरदार एंट्री करणाऱ्या रेहमानचं संगीत आहे हे कळल्यावर त्या गाण्यांच्या कॅसेट मुंबईमधल्या दुकानांत झळकू लागल्या. काही दिवसातच डब होऊन हा शंकर दिग्दर्शित सिनेमा “हम से मुकाबला ” या नावाने हिंदीमध्ये रिलीज झाला.  त्यातल एक गाण विशेष गाजलं होतं,

 “मुकाबला मुकाबला लैला”

 

काऊबॉय स्टाईलचं गूढ संगीत, ओले ओ ची आर्त साद. पडद्यावर दिसणारा काळा दाढीवाला काऊबॉय. हाच सिनेमाचा हिरोसुद्धा होता. मुंबईच्या इंग्लिश पिक्चर, अल्बम बघणाऱ्या पब्लिकला तो पर्यंत जगातला सर्वोत्तम डान्सर म्हणून अमेरिकेच्या मायकल जॅक्सनचं नाव माहित झालेलं होतं. या सिनेमाची पब्लिसिटी करण्यात आली,

“इंडियन मायकल जॅक्सन !!”

पिक्चरचा हिरो असणारा प्रभू देवा खरोखरचं इंडियन मायकल जॅक्सन होता. त्याने मायकलच्या सगळ्या डान्स मूव्ह या गाण्यात कॉपी केलेल्या होत्या. त्याने गाण्याचा रिदम बरोबर पकडला होता. गाण्याच्या शेवटच्या सीनमध्ये तर त्याला गोळ्या मारण्यात येतात. त्यावेळी आतली बॉडी गायब होते आणि पांढरा सूट, पांढरी टोपी घातलेली आकृती फ्लेक्सिबल डान्स करू लागते. इथे तर स्वतः मायकल जॅक्सन नाचतोय की काय असं वाटत होत.

मुकाबला मुकाबला गाण्यात इंडियन मायकल जॅक्सन उभा करण्यात जेवढा प्रभू देवाचा वाटा होता तितकाच किंबहुना त्याच्या पेक्षाही जास्त वाटा रहमानचा होता.

पहिल्यांदा जेव्हा रहमानने मायकल जॅक्सनला गाताना ऐकलं होतं अगदी तेव्हापासून तो त्याचा भक्त झाला होता. मायकलचा डान्स वगैरे नंतरची गोष्ट झाली पण म्युजिक हाच त्याचा आत्मा होता. अफाट संगीताने जगाला वेड लावणारा रॉकस्टार असलेल्या मायकल जॅक्सनच्या तोडीस तोड संगीत बनवणे हे रहमानचं मद्रास मध्ये असल्यापासूनच स्वप्न होतं.

पुढे तो दक्षिणेतून बॉलिवूडमध्ये आला. वेगवेगळे संगीतप्रकर हाताळले. अनके विक्रम केले. त्याच संगीत संगीत भारतात तर गाजलं पण पुढे तो जगभरात ओळखला जाऊ लागला. अक्षरशः हॉलीवूडमधून त्याला ऑफर येऊ लागल्या. पण परफेक्शनिस्ट असणारा रहमान फक्त मोजके सिनेमे स्वीकारायचा.

असाच एक हॉलीवूडचा सिनेमा त्याने केला तो म्हणजे स्लमडॉग मिलेनियर 

स्लमडॉग मिलिनियर हा सुप्रसिद्ध ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयलची निर्मिती होती. मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाची ती कथा होती. आपल्या खास दिग्दर्शनाची स्टाईल आणि जबरदस्त पटकथा यामुळे हा सिनेमा संपूर्ण जगभरात गाजला.

पिक्चरबरोबरच रहमानची गाणी देखील प्रचंड गाजली. जय हो ने तर अमेरिकेपासून भारतापर्यन्त सगळ्यांना वेड लागायची पाळी आणली होती. रहमानच कौतुक अंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागले. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. यात ऑस्कर साठीच नॉमिनेशन देखील होतं. 

२३ फेब्रुवारी २००९ रोजी अकॅडमी अवॉर्ड्सचा पुरस्कार समारंभ होणार होता. ए.आर रहमानसह सगळी स्लमडॉग मिलेनियरची टीम लॉस एंजलिस कॅलिफोर्नियाला लँड झाली. हीच ती हॉलिवूड भूमी. संपूर्ण जगभरात स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार राहायचे. ऑस्करसाठी अजून वेळ होता. मधल्या काळात सगळ्यां हॉलिवूड स्टार्सना भेटता येणार म्हणून भारतीय कलाकार खुश होते.

पण रहमानला वेध लागले होते एकाच कलाकाराला भेटायचे.

जगातला सगळ्यात मोठा सुपरस्टार मायकल जॅक्सन

अगदी तरुणपणापासून त्याच्या साठी देव राहिलेल्या मायकलला भेटता यावं त्याच्याबरोबर संगीतावर गप्पा माराव्या असं रहमानला वाटण साहजिक होतं. त्याने आपल्या हॉलिवूड मधल्या  सॅम नावाच्या मॅनेजरला सांगितलं की काहीही कर आणि माझी मायकल जॅक्सनशी भेट घालून दे.

सॅमचा एक मित्र मायकल जॅक्सनला ओळखत होता. त्याने त्याला सांगितलं की तू एक ईमेल पाठव मी पुढचं बघतो. सॅमने रहमानची भेट घालून देण्यासाठी मायकल जॅक्सनची अपॉइंटमेंटचा ईमेल पाठवला.

रहमान मायकल जॅक्सनच्या भेटीसाठी आतुर झाला होता  पण दुर्दैव म्हणजे कित्येक दिवस त्याच्या ईमेलला रिप्लायच आला नाही. ऑस्कर सोहळ्यासाठी शेवटचे दोन चार दिवस उरले होते. रहमानने मायकलला भेटण्याची आशा सोडून दिली होती. 

इतक्यात अचानक त्याला त्याच्या मॅनेजरचा फोन आला. मायकल जॅक्सनचा ईमेल आलाय. त्याने तुला भेटायला बोलावलंय. 

रहमानच्या आनंदाला पारावार उरला नाही. कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार होतं. पण अचानक त्याला आठवलं मायकलने बोलवलं त्या दिवशी रात्री ऑस्करमधल्या त्याच्या परफॉर्मन्सची रंगीत तालीम होती. एरव्ही मायकल जॅक्सनच्या भेटीसाठी रहमानने आकाश पातळ एक केलं असत पण त्या दिवशी त्याने मनाशी काही तरी ठरवलं आणि सॅमला म्हणाला, 

जर मी ऑस्कर जिंकलो तरच मी त्याला भेटेन नाही तर त्याला भेटणार नाही.

सॅमला देखील आश्चर्य वाटलं. भारतीय लोक थोडे जास्तच इमोशनल असतात असं म्हणत त्याने मायकल जॅक्सनला रहमान भेटायला येऊ शकणार नाही असा कळवलं. दुसऱ्या दिवशी ऑस्कर समारंभ पार पडला. रहमानने एक नाही तर चक्क दोन ऑस्कर जिंकले. त्या दिवशी संपूर्ण समारंभात स्लम डॉग मिलिनियरचा बोलबाला होता. रहमानच तर विशेष कौतुक होत होतं.

अवॉर्ड मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी तो मायकलला भेटायला त्याच्या घरी गेला.

रहमान सांगतो,

स्वतः मायकल जॅक्सनने घराचं दार उघडलं. त्याने हातात आपला फेमस ग्लोवज आणि डोळ्यावर गॉगल परिधान केला होता. मी त्याला प्रत्यक्ष पाहून अगदी थक्क झालो होतो. त्या दिवशी जवळपास दोन तास आम्ही गप्पा मारल्या. प्रेमापासून ते द्वेशापर्यंत अनेक विषय आमच्या चर्चेत येऊन गेले. त्यानंरतर जय हो बद्दल बोलणं झालं. मायकल म्हणाला कि त्याला माझं संगीत खूप आवडलं. एवढंच नाही तर चक्क तो अचानक उभा राहिला आणि त्याने माझ्या संगीतावर काही स्टेप्स देखील केल्या.

एखादी वीज कोसळावी तसा मी स्तब्ध होऊन ते पाहत होतो.

हे ही वाच भिडू.

 

  

Leave A Reply

Your email address will not be published.