काल राग आला मुरलीधरनला, पण लोकांना आठवण झाली ‘चिडलेल्या’ राहुल द्रविडची

दोन नावं सांगतो, राहुल द्रविड आणि मुथय्या मुरलीधरन. दोघं डेंजर कार्यकर्ते. दोघांचा नाद कुणी करत नव्हतं.

राहुल द्रविड एकदा क्रीझवर टिकला की, समोरच्या टीमचा विषय संपवायचा. ओव्हर्स मागून ओव्हर्स जायच्या पण द्रविड नावाची भिंत तुटणं सोडा, पण हलायची देखील नाही. म्हणूनच द्रविडला टोपणनाव मिळालं, द वॉल.

दुसऱ्या बाजूला होता मुरली. श्रीलंकेचं ब्रह्मास्त्र. मुरलीचा बॉल इतका वळायचा की आपल्यासोबत काय झालंय हे समजायला बॅट्समनला काळ जावा लागायचा. मुरलीच्या नावाभोवती आणि बॉलिंगभोवती गूढतेचं वलय होतं. मुरली नेमकं काय टाकतो आणि टाकताना तोंड असं का करायचा? हे अजून न उलगडलेलं कोडं आहे.

आता यातला एक बॅट्समन आणि दुसरा बॉलर, मग यांची तुलना करायचा प्रश्न का येतो, असा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के पडला असेल.

या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, मुरली असो किंवा द्रविड यांना क्रिकेटच्या मैदानावर चिडलेलं पटकन आठवतच नाही. ‘Murlitharan Angry’ असं सर्च केलं तरी त्याचे हसरे फोटोच गुगलवर येतात. बाकी द्रविडबद्दल तर काय बोलावं?

क्रेडच्या जाहिरातीत तो चिडला आणि लोकांना कायतर चमत्कार बघितल्यासारखा आनंद झाला. यातच द्रविडचं साधूपण दिसून येतं.

पण आयपीएलनं ही किमया साधली, आयपीएलनं आधी द्रविडला आणि मग मुरलीला चिडायला लावलं. या दोन महारथींमध्ये ‘राग’ ही भावना आहे आणि ती ते जाहीरपणे दाखवू शकतात, हे जगाला कशामुळं दिसलं असेल, तर आयपीएल.

सगळ्यात आधी किस्सा मुरलीधरनचा,

लय आठवावं लागणार नाही, बुधवारची घटना आहे. मुरली सध्या सनरायझर्स हैदराबादचा कोच आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादच्या बॉलर्सनं खुंखार बॉलिंग केली होती. उमरान मलिकनं पाच विकेट्स खोलत, मॅचचा नूर ठरवला होता. पण तरीही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली.

शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकायला हवे होते २२ रन्स. साहजिकच मॅच होती हैदराबादच्या पारड्यात.

पण बॉलर मॅक्रो जन्सेननं पहिल्याच बॉलला छगा खाल्ला. तिसऱ्या बॉलला रशिद खाननं सिक्स मारला, पाचव्या बॉलवरही पुन्हा सिक्स बसला. या तीन सिक्सर्समुळं मॅच फिरली आणि शेवटच्या बॉलला सिक्स बसून मॅच संपलीही. उमरानची बॉलिंग, तेवातिया आणि राशिदची फटकेबाजी सगळ्या गोष्टी दुर्लक्षित राहिल्या.

कारण टीव्हीवर दिसलं, की मुरलीधरन चिडलाय. 

जन्सेननं फुलर टाकत राशिदच्या टप्प्यात बॉल दिले आणि हैदराबादचा कार्यक्रम गंडला. यामुळेच मुरलीधरन चिडला आणि त्यानं जन्सेनला रागात घातलेल्या शिव्या सगळ्या जगानं पाहिल्या.

आणि पहिल्यांदाच आपल्या डोळ्यांनी पाहिलं की मुरलीधरनला राग येतो.

दुसरा किस्सा राहुल द्रविडचा…

आयपीएल २०१४, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सची मॅच सुरू होती. द्रविड राजस्थानचा कोच होता. दोघांना प्लेऑफमध्ये जाण्याची अखेरची संधी होती. जर मुंबईला प्लेऑफमध्ये जायचं असेल, तर नुसतं जिंकून भागणार नव्हतं. तर, नेट रनरेटकडेही लक्ष द्यायचं होतं. १४ ओव्हर्समध्ये मुंबईनं १९४ रन्स चोपले होते, पण नेट रनरेटचं गणित एकदम घासून सुरू होतं.

परिस्थिती अशी झाली की मुंबईला या बॉलवर सिक्स किंवा फोर मारणं गरजेचं होतं, नायतर मॅच जिंकूनही काही फायदा नव्हता. जेम्स फॉकनरनं आदित्य तरेला फुल टॉस टाकला आणि त्यानं तो किरकोळीत बाऊंड्री बाहेर मारला. अगदी हाताशी आलेली राजस्थानची संधी फॉकनरच्या फुलटॉसमुळं हुकली.

कॅमेरा आधी सेलिब्रेशन करणाऱ्या मुंबई इंडियन्सवर गेला आणि नंतर फिरला राहुल द्रविडकडं.

 शांततेचा पुतळा असणारा द्रविड खुर्चीवरुन उठला, त्यानं आपल्या डोक्यावरची कॅप काढली ती जोरात भिरकावली आणि त्यानंतर ड्रेसिंग रुमकडे गेला. इतक्या रागातही पडलेली कॅप पुन्हा उचलायला द्रविड विसरला नाही, हे विशेष.

त्या दिवशी मुंबईनं अशक्य वाटणारा विजय मिळवला होता, कोरी अँडरसन, आदित्य तरे हिरो ठरले होते, पण लक्षात मात्र एकच गोष्ट राहिली ती म्हणजे चिडलेला द्रविड.

काही वर्षांनी गौरव कपूरसोबत बोलताना द्रविडनं हसतहसत सांगितलं, ‘मला समजत होतं की मी काय करतोय. जशी कॅप फेकायला लागलो तेव्हा माझं मन सांगत होतं की हे तू चुकीचं करतोय. पण ते घडलंच. ‘

द्रविडचा व्हिडीओही बघून घ्या…

थोडक्यात काय तर आयपीएल इतकी हाय व्होल्टेज होऊ शकते की, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या प्लेअर्सचं स्लेजिंग सहन करूनही न चिडणारा द्रविड इथं चिडतो. कुणी आपल्या बॉलिंगवर कॅच सोडला तरीही, आपली बॉलिंग समजली नाही म्हणून नो बॉल ठरवणाऱ्या लोकांवरही न चिडणारा मुरलीधरनही इथं चिडतो. 

एवढंच काय, कॅप्टन कूल असणाऱ्या धोनीलाही राग येतो, हे आयपीएलनंच दाखवून दिलंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.