चिडलेल्या राहुल द्रविडनं आगाऊ पत्रकाराला ‘याला बाहेर काढा’ म्हणून सांगितलं होतं…

राहुल द्रविडचं टोपणनाव काय, तर द वॉल. द्रविड भिंतीसारखा खेळायचा नाही, पण एकदा क्रीझवर टिच्चून उभा राहिला की हलायचाच नाही. संघाला गरज असली की द्रविड संकटमोचक म्हणून धावून यायचा. संघाला विकेटकीपर हवा असला की द्रविड ग्लोव्ह्ज चढवायचा. त्यानं खोऱ्यानं रन्स केले, शतकं ठोकली, कॅचेस घेतले, संघ संकटात असताना नेतृत्व केलं.

रिटायरमेंटनंतर कुठल्या मोठ्या पदाची प्रसिद्धीची हाव न ठेवता, त्यानं भारताच्या अंडर-१९ आणि इंडिया ए संघाला प्रशिक्षण दिलं.

एवढ्या ग्लॅमरस करिअरमध्ये द्रविडची सगळ्यात जास्त लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्याचा स्वभाव. द्रविडला आक्रमक खेळताना हजारदा पाहिलं असेल, पण द्रविडला राग येतो हे पाहायला पार क्रेडची जाहिरात यायची वाट पाहावी लागली होती.

द्रविडचं वागणं म्हणजे एकदम गुणी बाळ टाईप होतं. त्याच्या वागण्याचा आदर्श घ्यावा असं आजही नव्या प्लेअर्सला सांगितलं जातं. सांगून पटणार नाही पण द्रविड एकदा लय घाण चिडला होता, तेही एका पत्रकारावर.

भारताची टीम पाकिस्तान दौऱ्यावर होती. सुरुवात झाली वनडे सिरीजनं. पहिलीच वनडे भारतानं जिंकली, जिंकण्याच्या आनंदात राहुल द्रविडची सेंच्युरी एका रननं हुकल्याचं दुःख होतं. दुसऱ्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं कडक सेंच्युरी मारली, पण त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही आणि मॅच हातातून गेली. तिसरी वनडे पाकिस्ताननं सहज जिंकली आणि सगळ्यांना वाटलं भारत आता सिरीज हरणार. पाकिस्तान घरच्या मैदानावर खेळत होतं, त्यांना प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा मिळत होता.

चौथ्या वनडेवेळी भारतावर प्रचंड प्रेशर होतं. पण त्याचवेळी एक सुखावणारी गोष्ट ही होती ती म्हणजे, लाहोरच्या स्टेडियममध्ये लहरणारा भारतीय तिरंगा. आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी अनेक भारतीयांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती.

टॉस जिंकून पाकिस्ताननं पहिली बॅटिंग घेतली आणि शाहिद आफ्रिदी लवकर आऊट झाला. मोहम्मद युसुफनंही त्याचीच वाट धरली. जरा कुठं जल्लोष सुरू झाला होताच, तेवढ्यात इंझमाम उल हकनं क्रीझवर नांगर ठोकला. त्याच्या बॅटमधून रन्स यायला सुरूवात झाली. बघता बघता इंझमामनं थाटात सेंच्युरी पूर्ण केली.

त्याच्या धावांच्या पाठबळामुळं पाकिस्तानच्या इतर बॅट्समन्सनंही छोट्या पण महत्त्वपूर्ण इनिंग खेळल्या आणि पाकिस्तानचा स्कोअर झाला, ५० ओव्हर्समध्ये २९३.

त्याकाळात तीनशेच्या जवळपास असलेल्या आव्हानाचा पाठलाग करणं अवघड मानलं जायचं. त्यात भारताला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं, आपली सुरुवात खराब झाली. ही मॅच हरणं म्हणजे सिरीज गमावणं होतं.

पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला शोएब अख्तरच्या खुंखार स्पीडमुळं सचिन गंडला आणि आऊट झाला. एकाच क्षणात भारतात कित्येक टीव्ही बंद झाले. काहीच वेळात सेहवाग, लक्ष्मण आणि गांगुली या भारताच्या बिग थ्रीनंही पॅव्हेलियनचा रस्ता पकडला. भारताचा स्कोअर होता १३ ओव्हरमध्ये ४ आऊट ९४. 

हातात भरपूर ओव्हर्स असल्या तरी अनुभवी बॅट्समनपैकी एकच जण क्रीझवर टिकून होता तो म्हणजे द्रविड. जिंकायला अजून २०० रन्स हवे होते.

द्रविडनं नवख्या युवराजला साथीला घेत पार्टनरशिप रचली. द्रविडनं युवराजच्या आक्रमणाला लगाम घातला होता. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६८ रन्सची पार्टनरशिप केली. तेवढ्यात युवराज गेला आणि लाहोरच्या मैदानावर पुन्हा एकदा शांतता पसरली.

द्रविडच्या खांद्यावर ओझं वाढलं होतं, साथीला होता तरणाताठा कैफ.

या जोडीनं पुन्हा संयमी बॅटिंग करत, टार्गेट टप्प्यात आणायला सुरुवात केली. अख्तर, सामी, रझाक, आफ्रिदी, मलिक अशी तगडी बॉलींग लाईनअप असूनही हे दोन कार्यकर्ते भिडत राहिले.

हातात भरपूर ओव्हर्स असल्या तरी, या जोडीनं स्कोरींग रेट वाढवला. ४५ व्या ओव्हरचा शेवटचा बॉल होता. कैफनं आफ्रिदीच्या बॉलिंगवर निवांत एक सिंगल काढली आणि भारतानं मॅच जिंकली. सगळं लाहोरचं स्टेडियम आनंदानं उसळलं. तिरंगे एकसाथ फिरू लागले.

भारतानं सिरीजमध्ये बरोबरी साधली. भारताचा वाईस कॅप्टन, विकेटकीपर आणि १४१ मिनिटं क्रीझवर थांबलेला राहुल द्रविड मॅन ऑफ मॅच ठरला. 

मॅच संपल्यावर खरा किस्सा झाला. 

मॅच फिक्सिंगचं वारं क्रिकेट विश्वावर घोंघावून गेलं होतं. सगळं तसं निवांत झालं होतं, पण प्रेस कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानच्या एका पत्रकाराला आगाऊपणा करण्याची हुक्की आली. त्यानं थेट द्रविडला विचारलं, “या सिरीजच्या निकालातून बुकींना फायदा व्हावा यासाठी मॅचचा रिझल्ट बदलण्यात आला का?”

जो प्लेअर प्रचंड तडफेनं खेळला होता, ज्यानं संघाला पराभवापासून वाचवलं होतं, त्यालाच असा प्रश्न विचारण्यात आला आणि द्रविड भडकला. 

तो रागानंच म्हणाला, ”कुणी या माणसाला बाहेर काढेल का? हा मूर्खपणा आहे. या सगळ्या गोष्टी खेळासाठी चुकीच्या आहेत.” 

तिथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी पत्रकाराला बाहेर काढलं.

द्रविडला राग येतो आणि तो भडकतो, हे त्या दिवशी पहिल्यांदा सगळ्या जगाला समजलं.

तो पत्रकार गडी मात्र वाढीव होता, त्यानं असाच प्रश्न इंझमामलाही विचारला. इंझमामही भडकला आणि त्यानं दोन शब्दांत उत्तर दिलं… ”शट अप!”

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.