बाकीचे पीचवरुन राडे घालायचे, पण द्रविड गुरुजींनी पीच बनवणाऱ्यांना ३५ हजार दिलेत…
राहुल द्रविड म्हणजे अगदी जंटलमन माणूस. कधी मैदानावर राडे नाहीत, मैदानाबाहेर तर प्रश्नच नाही. त्याचं नाव ना कधी कुठल्या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं, ना कुठल्या झोलमध्ये अडकलं. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यानं इंडिया अंडर-१९ आणि इंडिया-ए टीमचा कोच म्हणून काम पाहिलं. मोठ्या संधी समोर होत्या, तेव्हा गडी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला. तिथं त्यांनी नव्या पोरांना ट्रेनिंग दिलं.
आपला मराठमोळा ऋतुराज गायकवाड असेल, कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल असेल किंवा वाढीव शुभमन गिल, या सगळ्यांना घडवण्यात द्रविडचा मोठा वाटा आहे. बरं यांना ट्रेन केल्याचा द्रविडला अभिमान असला, तरी गर्व नाहीये. त्याचे स्वतःचे पाय जमिनीवर आहेतच, पण त्याच्यामुळं यंगस्टर्सचेसुद्धा.
आता हा असा नाकासमोर चालणारा माणूस भारताचा कोच झालेलं कुणाला नाही आवडणार? तसे शास्त्री गुरुजी पण भारी होतेच, पण द्रविड गुरुजी कसं वांड पोरांना शिस्त लावण्यात एक नंबर. त्यामुळं भारतीय चाहते मजबूत खुश झाले. द्रविड आल्यापासून आपली टीमही चांगली खेळतीये आणि द्रविडचं नावही चांगलंच चर्चेत आहे.
पण कानपूर टेस्टनंतर द्रविडचं नाव एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आलंय, ते म्हणजे त्यांनी ग्राऊंड्समनला केलेली मदत.
सगळ्यात आधी ग्राऊंड्समन काय करतात हे सांगतो-
तर ज्या पीचवर मॅच होते, ते तयार करण्याचं काम पीच क्युरेटर आणि ग्राऊंड्समनच्या टीमकडे असतं. पीचवर किती गवत ठेवायचं, किती रोलिंग करायचं हे सगळं काम या टीमकडे असतं. यांच्या कामानुसार पीच कसे रंग दाखवणार हे ठरतं. म्हणजे बघा, फिरकीला साथ देणारं पीच बनवलं, की बॉल गपागप गरबा खेळायला लागतो. पीचमध्ये जान नसली की बॅटर्सचं राज्य असतं आणि स्कोअरबोर्डवरचे आकडे पळायला लागतात. पीचच्या राग रंगावर मॅचचा नूर कुठल्या दिशेला जाणार हे ठरतं.
कुठलाही देश आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना, आपल्या टीमला सोपं पडेल असंच पीच बनवायचं बघतो. म्हणजे बघा- इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळताना बॉल सामसूम करत कानापासून जाणार, केळ्याच्या आकारात खुंखार स्विंग होणार. भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानात पहिल्या दिवसापासून फिरकीचं राज्य असतं.
आता तुम्ही म्हणाल कुठल्याही देशानं आपल्याला हवं तसं पीच बनवण्यात चूक काय? पण तसं नसतंय भिडू. काय स्पिरीट ऑफ क्रिकेट आहे की नाही? या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड आपल्याकडं आलं तेव्हा, दोन दिवसात टेस्ट मॅच संपली. भले भारत जिंकला, पण अजिबात मजा आली नाय. कारण, टेस्ट मॅच कशी घासून झाली पाहिजे, जरा टेन्शन आलं पाहिजे, तर मजा येणार.
जेव्हा शास्त्री गुरुजींनी राडा केला होता…
या अशा वनसाईड मॅचचा फटका एकदा भारताला बसला होता. वानखेडेवर पाटा पीच होतं आणि साऊथ आफ्रिकेनं वनडे मॅचमध्येच आपल्याला ४३८ रन्स कुटले. मुंबईच्या गर्मीत भारताच्या क्रिकेटर्सचा चांगलाच घाम निघाला. मॅच झाल्यावर रवी शास्त्री आणि बॉलिंग कोच भारत अरुणनं ग्राऊंड्समनची चांगलीच शाळा घेतली.
दुसऱ्या बाजूला आहे द्रविड, कानपूर टेस्टमध्ये पीचनं बॉलर्स आणि बॅटर्स दोघांना साथ दिली. त्यामुळेच टेस्टचा निकाल पार शेवटच्या बॉलपर्यंत लागला नाही. हे असं समतोल साधणारं आणि स्पिरीट ऑफ क्रिकेट जपणारं पीच बनवलं म्हणून द्रविडनं ग्राऊंड्समनच्या टीमला ३५ हजार रुपये दिले.
अशी मदत करायचा हा द्रविडचा पाहिलाच किस्सा नाही भिडू
मागे भारतानं अंडर-१९ वर्ल्डकप जिंकला तेव्हा द्रविड कोच होता. बीसीसीआयनं द्रविडला ५० लाख आणि बाकी सपोर्ट स्टाफला २० लाखांचं बक्षीस जाहीर केला. द्रविडनं बीसीसीआयला सांगितलं, की द्यायचे तर सगळ्यांना सारखे पैसे द्या, नायतर असुद्या. द्रविडचा शब्द फायनल ठरला आणि बीसीसीआयनं सगळ्यांना २५ लाख रुपये देण्याचं नक्की केलं.
द्रविडची मैदानाबाहेरची वागणूक पाहिली की एक गोष्ट हमखास आठवते,
झाले बहु, होतील बहु, परी या सम हाच…
हे ही वाच भिडू:
- वडील हॉस्पिटलमध्ये होते आणि तिकडं राहुल द्रविडनं ॲलन डोनाल्डचा माज मोडला
- वांड पोरांचे नवे वस्ताद द्रविड गुरुजी! चालतंय का?
- विरुने राहुल द्रविडचा विश्वास जिंकण्यासाठी सेंच्युरी ठोकली