द्रविड इतका सभ्य का आहे? कारण त्याला गुंडाप्पा विश्वनाथ बनायचं होतं…

१९८० चा फेब्रुवारी महिना , इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती. एकच कसोटी सामना खेळवला जाणार होता. बीसीसीआयला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून मुंबईमध्ये आयोजित केलेल्या या खास सामन्याला  ज्युबली कसोटी असे नाव देण्यात आले होते.

इंग्लंडची टीम दिग्गज होती. ग्रॅहम गुच, इयान बॉथम, डेव्हिड गोव्हर,डेरेक अंडरवूड सारखे मोठे खेळाडू होते. माईक ब्रियरली त्यांचा कप्तान होता. भारताच्या टीममध्ये सुनील गावस्कर, कपिल देव, वेंगसरकर, संदीप पाटील असे चांगले खेळाडू होते. पण तुलनेने आपली टीम इतकी अनुभवी नव्हती. भारताचा कप्तान होता गुंडाप्पा विश्वनाथ.

आपण टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. किरमाणी आणि गावस्कर यांच्या बॅटिंगच्या जीवावर भारताने २४२ धावा बनवल्या. याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या टीमची सुरवात अतिशय खराब झाली. कर्सन घावरी आणि कपिल देव च्या स्विंग बॉलिंगने इंग्रज खेळाडूंना जखडून ठेवलं होतं.

एक वेळ अशी आली की इंग्लंडचे ५८ धावांवर ५ बाद झाले होते. सर्व प्रमुख फलन्दाज स्वस्तात आउट झाले होते. आता क्रीझवर इयान बोथम आणि बॉब टेलर हे दोघेही ऑल राऊंडर होते. म्हणजेच त्यांच्याकडून खूप मोठ्या स्कोअरची अपेक्षा नव्हती. भारताचे वेगवान गोलंदाज त्यांना सहज गुंडाळतील असच वाटत होतं.

आणि झालंही तसंच. कपिलच्या एका जबरदस्त तेजतर्रार बॉलचा बॉब टेलरला अंदाजच आला नाही. त्याने बॅट फिरवली, आवाज आला आणि विकेटच्या मागे असलेल्या सय्यद किरमाणीने सहज कॅच पकडला. कपिलने जोरदार अपील केली. किरमाणी आणि इतर स्लिपमधील खेळाडू सुद्धा त्याला जॉईन झाले.

अंपायरने टेलरला आउट दिलं. मान हलवत तो पॅव्हेलियनला जाण्यासाठी निघाला एवढ्यात भारतीय कॅप्टन गुंडाप्पा विश्वनाथने त्याला अडवलं. त्याने टेलरला विचारलं कि

बॉल तुझ्या बॅटला लागलेला का ?

टेलरने नाही म्हणून सांगितलं. लगेच विश्वनाथने अंपायरला आम्ही अपील मागे घेतोय टेलरला परत बोलवा असं सांगितलं.

अंपायर हनुमंतराव यांनी भारतीय कप्तानच्या सांगण्यावरून त्याला परत बोलावलं. बॉब टेलर परत आला आणि त्याने इयान बॉथम बरोबर १७४ धावांची पार्टनरशिप केली. भारत ती मॅच १० विकेट्सनी हरला. याला जबाबदार जी.विश्वनाथ याच्या सज्जनपणाला धरण्यात आलं.

तो तसाच होता. आयुष्यभर सज्जनपणाबद्दल बायकोच्या शिव्या खाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय माणसासारखा. आजही भारतातल्याच नाही तर जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांची यादी काढली जी विश्वनाथ याच नाव सर्वात आघाडीवर घ्यावं लागेल पण दुर्दैव म्हणजे आजकालच्या कित्येकांना जी विश्वनाथ हे नाव देखील ठाऊक नसते.

द्रविड प्रमाणे मूळचा कर्नाटकचा असलेला जी.विश्वनाथ आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याचे मनगटी शॉट विशेषतः लेट कट जगभरात गाजले होते. अगदी वेस्ट इंडिजच्या मृत्यूदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजतर्रार बॉलिंगला तो सहज सामोरा जायचा. भारतासाठी त्याने गावस्करच्या सोबतीने कित्येक कसोटी सामने वाचवले.

राहुल द्रविड सारख्या अनेक खेळाडूंचा आदर्श गुंडाप्पा विश्वनाथ आहे. त्याचे वडील विश्वनाथचे फॅन होते. त्यांनी सांगितलेल्या असंख्य किस्से आणि स्टोरीमधून प्रभावित झालेल्या राहुलला मोठेपणी गुंडाप्पा विश्वनाथ बनायचं होतं. हेच स्वप्न घेऊन राहुल क्रिकेट खेळू लागला. पुढे तर त्याला विश्वनाथ यांच्या कोचिंग खाली शिकण्याची संधी देखील मिळाली.

रणजी मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाखाली राहुलवर पैलू पडले. विश्वनाथ यांच्याप्रमाणे सभ्यपणा द्रविडमध्ये देखील मुरला. कधीही विरुद्ध टीमला स्लेजिंग करायचं नाही. आपल्या टीकाकारांना उत्तर बॅटने द्यायचं ही विश्वनाथ यांची शिकवण द्रविडने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही विसरला नाही.

मैदानात आणि मैदानाबाहेर तो विश्वनाथ यांनी दाखवलेल्या मार्गावरच चालत राहिला.

फक्त स्वभाव आणि बॅटिंग स्टाईल एवढं नाही तर विश्वनाथ आणि द्रविडमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. दोघांचीही कारकिर्द टीममधल्या सुपरस्टार खेळाडूमुळे झाकोळली गेली. ज्याप्रमाणे सचिनच्या महानतेच्या सावलीमुळे द्रविडच्या बॅटिंगकडे रसिकांचे आणि समीक्षकांचे दुर्लक्ष झाले तसेच विश्वनाथच्या बॅटिंगला सुनील गावस्करमुळे कधीच उचित न्याय मिळाला नाही.

राहुल प्रमाणेच विश्वनाथ निवड समितीने केलेल्या अन्यायामुळे आणखी काही दिवस खेळण्याची क्षमता असूनही लवकर रिटायर झाला.

गावस्कर हा टिपिकल मुंबईचा खडूस खेळाडू होता. त्याने मैदानंतर गाजवले पण आपल्या भोवतीचे फेम प्रोफेशनल अटेन्शन व्यवस्थित सांभाळले. गावस्कर स्वतः मात्र विश्वनाथचा प्रचंड मोठा चाहता होता. दोघे एकत्र ओपनर म्हणून भारताच्या इनिंगला सुरवात करायचे. गावस्कर सांगतो

वेस्ट इंडिजमध्ये खेळताना तिथल्या फास्टर बॉलर्सचे अवघड बॉल विशी किती सहज खेळतो हे बघून मला नेहमी दडपण यायचं.

गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ हे खऱ्या आयुष्यात देखील चांगले मित्र होते. इतकंच काय तर गावस्करच्या सख्ख्या बहिणीचे विश्वनाथ बरोबर लग्न झालं होत. गावस्करने त्याच्या मुलाचं नाव गुंडाप्पा विश्वनाथ, रोहन कन्हई आणि विक्रम जयसिंघे या तीन आवडत्या फलंदाजावरून ठेवलंय.  

“रोहन जयविश्वा”  

खेळात असतानाही विश्वनाथ कधी प्रसिद्धीच्या झोतात आला नाही. रिटायर झाल्यावरही कॉमेंटेटर किंवा बीसीसीआयचे मॅनेजमेंट सारख्या वलय व पैसा असणारे क्षेत्रात तो गेला नाही.  या ऐवजी शांतपणे कोचिंग मधून नवीन पिढी घडवण्याकडे त्याने लक्ष दिले. राहुल द्रविड देखील याच मार्गाने चालला आहे.

विश्वनाथ यांनी निवृत्ती नंतर मॅच रेफ्री म्हणून देखील काम पाहिलं, काही काळ राष्ट्रीय निवड समितीमध्ये देखील होते. बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकादमीची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. ते खेळत असताना भारत सरकारने अर्जुन अवॉर्ड दिला होता तसेच काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च समजला जात असणारा सीके नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने त्यांचा सन्मान केलाय.

आजही भारतीय क्रिकेटमध्ये विश्वनाथ यांच्या शब्दाला मान आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात फेअरप्लेला समानार्थी शब्द म्हणून गुंडाप्पा विश्वनाथ यांना ओळखलं जातं.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.