किट बॅगेत जॅमची बॉटल घेऊन फिरणारा राहुल स्टार बनल्यावरही वडिलांच्या कंपनीला विसरला नाही

राहुल शरद द्रविड म्हणजे भारताची वॉल. या भिंतीला भेदणे जगभरात कोणत्याही बॉलरला शक्य व्हायचं नाही. बाकीचे बॅट्समन फोरसिक्सरची बरसात करू देत अथवा झटपट आपल्या विकेट्स गमावू देत,

राहुल द्रविड क्रिझवर नांगर टाकून ठाम उभा राहायचा आणि देशाला ती मॅच जिंकून द्यायचा.

स्वतःच्या वैयक्तिक कामगिरी पेक्षा भारतीय टीमचा विजय यालाच त्याने कायम महत्व दिले. जेव्हा कोणी तयार नव्हत तेव्हा त्याने देशाचं कर्णधारपद स्वीकारलं, त्याच निस्पृहपणे सोडून दिलं, संघासाठी ओपनिंग केली आणि तसच ७ नंबरला सुद्धा बॅटिंग केली.

टीमला एक एक्स्ट्रा बॅट्समन खेळवता यावा म्हणून राहुल द्रविड विकेट किपर देखील बनला.

निस्वार्थीपणाचे आणि देशभक्तीचे दुसरे नाव म्हणजे राहुल द्रविड .

राहुल द्रविडला हेट करणारे भारतातच नाही तर संपूर्ण जगात कोणी नसेल. त्याच्या बद्दल असला तर फक्त आणि फक्त आदरच क्रिकेटिंग सर्कलमध्ये पाहावयास मिळतो.

अशा या राहुल द्रविडला देखील एक टोपण नाव होतं, ते म्हणजे जॅमी.

राहुल द्रविड मूळचा महाराष्ट्रीयन. त्याचा जन्म इंदौरला झाला. त्याचे वडील आणि काका दोघेही क्रिकेट खेळायचे. वडिलांना क्रिकेटचा प्रचंड शौक होता पण घरच्या जबाबदारीमुळे ते विद्यापीठाच्या पुढे क्रिकेट खेळू शकले नाहीत. पुढे नोकरीच्या निमित्ताने ते कर्नाटकातील बेंगलोरला आले.

इथे त्यांनी नोकरी पकडली ती जॅम बनवणाऱ्या किसान कंपनीत. 

राहुलच्या आई पुष्पा या बंगलोरच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. थोरला राहुल आणि धाकटा विजय असं त्यांचं हे चौकोनी मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंब. शरद द्रविड रोज आपल्या स्कुटरवरून किसान कंपनीत नोकरीला जायचे. त्यांचं राहुलच्या बाबतीत स्वप्न मात्र तो क्रिकेटर व्हावा असंच होतं. आपल्या मध्यमवर्गीय अपेक्षा त्यांनी कधीच राहुल वर लादल्या नाहीत. तो शाळेत हुशार होता पण अभ्यासाचा लोड त्याच्यावर कधी दिला गेला नाही.

बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर जेव्हा कधी मॅच असायची तेव्हा शरद द्रविड आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिथे हजर व्हायचे. त्यांचं क्रिकेटचं प्रेम राहुलमध्ये उतरणे साहजिक होते. शालेय स्तरापासून तो आपल्या बॅटिंगच्या जोरावर चमकू लागला.

टेनिस बॉल क्रिकेट मग सिझन बॉल क्रिकेट अशा अनेक स्पर्धांमधून त्याने आपल्या शाळेचं नाव गाजवलं. लवकरच त्याची निवड कर्नाटकच्या अंडर १६ टीममध्ये झाली. इतक्या कमी वयात पुस्तकाप्रमाणे तंत्रशुद्ध व प्रचंड संयमी फलन्दजी करणारा बॅटर पाहून अनेकांना त्याच कौतुक व आश्चर्य वाटायच. 

बेंगलोरच्या एनसीएवर असाच एक क्रिकेट कोचिंग कॅम्प लागला होता. कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातील मुले या कॅम्पमध्ये सामील झाली होती. सगळी समवयस्क मुले असल्यामुळे खेळासोबतच त्यांची दंगा मस्ती देखील चालायची. 

यातच होता जवागल श्रीनाथ. उंचापुरा जवागल श्रीनाथ हा वेगवान बॉलर होता. त्याच्या स्पीडमुळे अगदी भलेभले फलन्दाज देखील घायाळ व्हायचे. एकदा सरावानंतर विश्रांती सुरु असताना त्याला सहज दिसलं की राहुलच्या किट बॅगमध्ये कसली तरी बॉटल आहे. त्याने उत्सुकतेने ती बॉटल बाहेर काढली तर ती होती किसान फ्रुटजॅम ची बॉटल. श्रीनाथला खूप गंमत वाटली. राहुल रोज आपल्या क्रिकेटसाहित्याच्या किट सोबत हि जॅम ची बॉटल घेऊन फिरायचा. 

त्याला कारण विचारल्यावर कळलं कि राहुलचे वडील किसान कंपनीत असल्यामुळे त्यांच्या घरात जॅमच्या भरमसाठ बॉटल असायच्या. शरद द्रविड यांनी राहुलच्या आईला बजावून सांगितलेलं कि तो कुठेही जाऊ दे त्याला भूक लागली तर खाण्यासाठी म्हणून जॅमची बॉटल आणि ब्रेड सोबत हमखास द्यायचं.

क्रिकेट ग्राउंडवर प्रचंड मेहनत करणाऱ्या राहुलला या किसान जॅमची सवय लागली. सरावाच्या सेशन नंतर ब्रेड जॅमचा एनर्जी बूस्टर त्याला दुप्पट ताकद देऊन जायचा. त्याला दिवसभर बॉलिंग करून करून वैतागलेल्या श्रीनाथला त्या डीव्हासी राहुलच्या एनर्जीचं सिक्रेट कळलं. तेव्हापासून त्याने राहुलला जॅमी म्हणून चिडवण्यास सुरवात केली.

हळूहळू हे नाव राहुल द्रविडला चिकटलं. कर्नाटक रणजी टीम मध्ये तो त्याच नावाने फेमस झाला. पुढे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली. १९९६ साली इंग्लंड विरुद्धच्या अवघड दौऱ्यात सौरव गांगुली सोबत त्याने पदार्पण केलं. या दोघांचा पहिलाच सामना लॉर्ड्स वर रंगला. दोघांनीही धमाकेदार फलंदाजी केली. 

गांगुलीला आपल्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकता आलं पण राहुल या विक्रमापासून फक्त ५ धावांनी मागे राहिला. मात्र दोघांचीही हवा अगदी भारतात देखील झाली. देशाला नवीन स्टार मिळाले आहेत याची भविष्यवाणी क्रिकेट पंडितांनी करूनही टाकली.

या भारत इंग्लंड सिरीज मध्ये राहुलचा दोस्त ज्वागल श्रीनाथ देखील हजर होता. त्याने भारतीय ड्रेसिंग रूममधील सर्वाना राहुलचं जॅमी हे टोपण नाव सांगून टाकलं. तेव्हा पासून अगदी रिटायरमेंट पर्यंत राहुल द्रविड हा जगासाठी द वॉल असेल पण भारतीय क्रिकेट टीमसाठी जॅमीच राहिला.

पुढे त्याला मोठमोठ्या जाहिराती मिळू लागल्या. पेप्सी पासून जागतिक ब्रॅण्डचा तो ब्रँड अँबेसेडर झाला. कोट्यवधींचे करार त्याच्या दाराशी उभे होते. पण ते करत असताना त्याने पैशांचा विचार न करता वडिलांच्या कंपनीसाठी म्हणजेच किसान साठी जॅमची जाहिरात केली.

 

चेन्नईच्या कडक उन्हात आजारी असतानाही राहुलने त्या जाहिरातीच शूटिंग केलं. प्रचंड उलट्या होत होत्या पण राहुलने फक्त वडिलांसाठी आणि किसान साठी शूटिंग थांबवलं नाही. आजही राहुलची ती जॅम जॅम जॅमी ही जुनी जाहिरात पाहिली की त्याचं डेडिकेशन आणि किसान जॅमचा गोडवा आठवत राहतो.

हे ही वाच भिडू.

     

Leave A Reply

Your email address will not be published.