राहुल द्रविडची टिपिकल मिडलक्लास मराठी लव्हस्टोरी.

४ मे २००३. बेंगलोरच्या आउटसाईड एरियामध्ये असणाऱ्या बीएसएफ ट्रेनिंग सेंटर जवळील एका मंदिराबाहेर मिडियाने भरपूर गर्दी केली होती. पण तगड्या सिक्युरिटी मुळे कोणालाही आत शिरता येत नव्हतं. तिथल्या लोकांना कळत नव्हत नेमकं काय चाललय.

निळ्या रंगाची शालू घातलेली नवरी आणि पांढऱ्या कुर्ता पायजमा मधला खळी पाडून हसणाऱ्या नवरदेवाचं आगमन झालं. तेव्हा कळाल सुपरस्टार क्रिकेटर राहुल द्रविडच लग्न होतंय.

साध टिपिकल मराठी लग्न होत. राहुलच्या आईच्या इच्छेखातर तिच्या माहेरी इंदुरहून भटजी आले होते. जेवणाचा बेतसुद्धा पुरणपोळी जिलेबी गुलाबजाम असा शाकाहारी पारंपारिक मराठी मेनू होता. या लग्नासाठी फक्त खास लोकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. क्रिकेटर्समध्येही बेंगलोरमधले द्रविडचे खास मित्र लग्नाला हजर होते. यात कुंबळे,श्रीनाथ,प्रसाद यांचा समावेश होता.

दुपारी शुभ मंगल सावधान झालं. जेवणावळी उठल्या तरी वधूवराचा फोटो काढायची संधी मिडीयाला मिळाली नाही. दंगा झाला. अखेर संध्याकाळी बेंगलोरच्या ताज हॉटेल मध्ये असलेल्या रिसेप्शनच्यावेळी काही क्षणासाठी द्रविड आणि त्याची बायको मिडियासमोर आले. दुसऱ्या दिवशीच्या फोटोची सोय झाली.

अजूनही लोकांना माहित नव्हत की अखंड तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्र द्रविडची भिंत भेदून त्याच्या आयुष्यात पवेश करणारी ही मुलगी आहे तरी कोण? या दोघांची भेट कधी झाली? कशी झाली? त्याचं लग्न लव्ह की अरेंज असे हजारो प्रश्न विचारले जाऊ लागले.

काही लोक तर छातीठोक पणे सांगत होते की द्रविडच लग्न म्हणजे अरेंजच असणार.. 

नंतर हळूहळू एक एक माहिती बाहेर येत गेली. नाव विजेता पेंढारकर. राहणार नागपूरची मराठी मुलगी. वडील एअरफोर्समध्ये नोकरीला होते त्यामुळे देशभर फिरतीला. तिचे वडील काही वर्ष बेंगलोरमध्ये होते. याच काळात त्यांची द्रविड फॅमिलीशी ओळख झाली.

परक्या भाषेच्या राज्यात मराठी बोलणारे कुटुंब म्हणून हे एकत्रही आले. पेंढारकरांच द्रविडांच्या घरी येणं जाणं वाढल.

जाम बनवणाऱ्या किसान कंपनीत काम करणारे शरद द्रविड आणि आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्राध्यापिका असणारी पुष्पा द्रविड यांना दोन मूल मोठा राहुल आणि धाकटा विजय. तर पेंढारकरांना तीन मुले. सगळ्यात धाकटी विजेता. ही सगळी मुले खेळायला कायम एकत्र.  राहुलची आणि विजेताची चांगली गट्टी जमली.

शाळकरी वयातली दोस्ती. पण पुढे पेंढारकरांची परत बदली झाल्यामुळे तुटली. पण द्रविडांनी पेंढारकरांशी संपर्क तोडला नव्हता. पत्र फोनाफोनी सुरूच राहिली. इकडे मुले मोठी होत होती. द्रविडांचा राहुल अगदी तिसरी चौथीला असल्यापासून शाळेत क्रिकेट भारी खेळतो म्हणून गाजत होता. पुढे कॉलेज, विद्यापीठ गाजवत कर्नाटकच्या रणजी टीममध्ये गेला.  अगदी भारताच्या इंग्लंडला गेलेल्या टीममध्येही त्याचा समावेश झाला.

आणि विजेता? तिच्या बाबांच्या रिटायरमेंटनंतर ते आपल्या मुळगावी नागपूरला आले.

ती शाळेत हुशार होतीच. नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये तिनेप्रवेश मिळवला. डॉक्टर झाली. इकडे कधी दौऱ्याच्या निमित्ताने, रणजी मचच्या निमित्ताने द्रविड सारखा नागपूरला यायचा. कधी कधी काही ना काही कारण काढून तिकडे जायचा. मित्रमंडळीनां कूणकूण लागलीच. काही तरी खिचडी पकतीय.

घरच्यांनासुद्धा अंदाज आला होता. कोणाचाच नकार नव्हता. मिया बीबी राजी होते, आईच्या लाडोबा असणाऱ्या राहुलची चॉईस त्याच्या घरच्यांना ही पसंद होती. तरी चहापोहेचा कार्यक्रम झाला. दोघांच लग्न करायचं ठरवलं. सुशिक्षित मध्यमवर्गीय घराप्रमाणे सगळ नीट आखीव रेखीव आयुष्य, आखीव रेखीव नियोजन.

फक्त एकच अडथळा होता. २००३चा वर्ल्डकप.

या वर्ल्डकपमध्ये द्रविडला विकेटकीपिंगची एक्स्ट्रा जबाबदारी होती, शिवाय टीमचा तो उपकर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी भारताला जिंकण्याचे खूप चान्स होते. टीम भारी होती. तयारी जोरात चालू होती. द्रविडने ठरवलेलं की आधी लगीन वर्ल्डकपच मगच आपलं.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताची टीम फायनलला गेली पण विश्वचषक हाती लागला नाही. पण शेवटच्या पायरीपर्यंत गेल्यामुळे आपणही आज ना उद्या जिंकू शकतो हा आत्मविश्वास टीमला मिळाला होता. वर्ल्डकप झाल्यावर मग द्रविडने लग्नाची तयारी सुरु केली आणि ४ मेला लग्न झालं.

आज इतकी वर्ष झाली पण हे द्रविड कुटुंब टिपिकल मराठी मध्यमवर्गीयच राहिलं आहे. राहुल आपल्या मुलांच्या शाळेतल्या कार्यक्रमात ओळीत उभा असलेला दिसतो. त्याच्या रिटायरमेंटवेळी विजेताने एक मुलाखत दिली होती. त्यात ती म्हणाली,

“आमच्या लग्नावेळी राहुल म्हणाला होता की आणखी तीन चार वर्षे मी क्रिकेट खेळेन असं वाटत. पण या काळात आणि त्यानंतरही मला तुझी साथ हवी. प्रत्यक्षात नऊ वर्षांनी तो निवृत्त झाला. क्रिकेट हेच त्याच कुटुंब होतं. आता तो संपूर्णपणे माझा  झालाय. आता त्याच्या हातचा सकाळचा पहिला चहा आम्हाला मिळेल.” 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.