पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये राहुल द्रविड स्कॉटलंडकडून खेळला होता.

राहुल द्रविड म्हणजे भारताची वॉल. या भिंतीला भेदणे जगभरात कोणत्याही बॉलरला शक्य व्हायचं नाही. बाकीचे बॅट्समन फोरसिक्सरची बरसात करू देत अथवा झटपट आपल्या विकेट्स गमावू देत,

राहुल द्रविड क्रिझवर नांगर टाकून ठाम उभा राहायचा आणि देशाला ती मॅच जिंकून द्यायचा.

स्वतःच्या वैयक्तिक कामगिरी पेक्षा भारतीय टीमचा विजय यालाच त्याने कायम महत्व दिले. जेव्हा कोणी तयार नव्हत तेव्हा त्याने देशाचं कर्णधारपद स्वीकारलं, त्याच निस्पृहपणे सोडून दिलं, संघासाठी ओपनिंग केली आणि तसच ७ नंबरला सुद्धा बॅटिंग केली.

टीमला एक एक्स्ट्रा बॅट्समन खेळवता यावा म्हणून राहुल द्रविड विकेट किपर देखील बनला.

निस्वार्थीपणाचे आणि देशभक्तीचे दुसरे नाव म्हणजे राहुल द्रविड .

मात्र याच राहुल द्रविडने स्कॉटलंडच्या राष्ट्रीय टीमकडून काही सामने खेळले होते हे तुम्हाला ठाऊक आहे काय?

स्कॉटलंड हा अजूनही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला देश. इथेही क्रिकेट पूर्वापार खेळली जाते. मात्र त्यांना स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवायला जमलं नव्हतं. कौंटी क्रिकेट आणि कधी कधी दौऱ्यावर आलेल्या पाहुण्या टीमसोबत फर्स्ट क्लास मॅच एवढच क्रिकेट स्कॉटलंडमध्ये खेळलं जायचं.

१९९४ पासून स्कॉटलंडने स्वतःची स्वतंत्र क्रिकेट टीम आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरवली. १९९९ च्या वर्ल्डकपसाठी क्वालिफाय सुद्धा झाले. पण तिथे एकही मॅच जिंकता आले नाही. पुढच्या २००३ सालच्या वर्ल्डकपला ते पात्र सुद्धा ठरले नाहीत.

वारंवार होणाऱ्या पराभवामुळे स्कॉटलंडचे मनोधैर्य खचले होते.

खेळाडूंना ट्रेनिंगसाठी आणि मार्गदर्शनासाठी एखादा वर्ल्डक्लास प्लेअर स्कॉटलंडला आणावा अस तिथल्या क्रिकेट बोर्डने ठरवलं.

भारतीय क्रिकेट टीम तेव्हा जबरदस्त फॉर्ममध्ये होती. गांगुलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया, इंग्लंडना त्यांनी त्यांच्या भूमीवर हरवलं होत. भारताचा बॅटिंग अटॅक जगातला सर्वोत्कृष्ट समजला जात होता.

स्कॉटलंडक्रिकेटचे सीईओ गेव्हीन जोन्स यांनी भारताचे तेव्हाचे कोच जॉन राईट यांच्याशी संपर्क केला आणि

भारताच्या एखाद्या स्टार खेळाडूला तीन महिन्यासाठी स्कॉटलंडला पाठवून देण्याची मागणी केली.

त्यांची सचिन तेंडुलकरला स्कॉटलंडला नेण्याची त्यांची इच्छा होती पण जॉन राईट त्यांना म्हणाला की,

तुम्हाला ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्ड सगळ्यात जास्त मदत होईल असा खेळाडू एकच आहे, तो म्हणजे राहुल द्रविड

तो तेव्हा भारताचा उपकर्णधार होता. २००३ हे वर्ष त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या खूपच प्रेशर असणारं ठरलं होतं तरी राहुल द्रविड तयार झाला.

त्याचं लग्न होऊन अगदी काही दिवस झाले होते. राहुल आणि विजेता हे दाम्पत्य तीन महिन्यांसाठी स्कॉटलंडला रवाना झाले.

राहुल या काळात नॅशनल क्रिकेट लीगचे ११ सामने आणि पाकिस्तान सोबतची एक फर्स्ट क्लास मॅच स्कॉटलंड कडून खेळला.

स्कॉटलंडची क्रिकेट टीम अतिशय कच्ची असल्यामुळे त्यांनी या बारा पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला.

पण पहिल्यांदाच भारत सोडून दुसऱ्या देशाची जर्सी घालून खेळणाऱ्या राहुल द्रविडने अतिशय चमकदार कामगिरी करत 66च्या एव्हरेजने 600 धावा ठोकल्या.

फक्त पाकिस्तानविरुद्धच्या मॅच मध्ये मात्र द्रविड पहिल्याच बॉलला डकवर आउट झाला होता.

स्कॉटलंडची टीम क्रिकेट ग्राउंडवर खूप काही कमाल करू शकली नाही

पण द्रविडच्या एक्सपेरियन्सचा त्यांना प्रचंड फायदा झाला. वर्ल्ड क्लास बॅट्समन खेळताना कसा विचार करतात, त्यांचा अप्रोच कसा असतो हे तरुण स्कॉटिश खेळाडूंना शिकायला मिळालं.

२००७ च्या विश्वचषकासाठी त्यांची निवड झाली. तो पर्यंत राहुल भारताचा कप्तान बनला होता. त्याच्यासोबत खेळलेले अनेक खेळाडू वर्ल्ड कप खेळताना पाहून द्रविडला विशेष आनंद झाला होता.

आजही राहुल द्रविड जेव्हा कधी इंग्लंडला जातो तेव्हा त्याची एक व्हिजिट स्कॉटलंडला ठरलेली असते.

क्रिकेटच्या काळात तिथे त्याच्या अनेक ओळखी झाल्या. अनेकांशी मैत्री झाली. नवीन लग्न होऊन आलेले दाम्पत्य असल्यामुळे तिथल्या भारतीयांनी राहुल आणि विजेताची खास काळजी घेतली होती.

म्हणूनच या दोघांच्याही काही खास आठवणी या देशाशी जोडल्या गेलेल्या आहेत. भारत, कर्नाटक नंतर स्कॉटलंड क्रिकेट टीम ही राहुलसाठी होम टीम बनली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.