राहुल त्यांना म्हणाला, ‘गप्प इतिहासाची पुस्तके लिही ; क्रिकेटचा शहाणपणा शिकवू नको. .

भारताच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात जा. भाषा कुठली पण असू दे पण तिथल्या पब्लिकमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे राजकारण सिनेमा आणि क्रिकेट या तीन गोष्टींबद्दल प्रेम. प्रत्येकाला वाटतंय या सगळ्यातला आपलाच अभ्यास सगळ्यात मोठा आहे. 

विशेषतः सोशल मीडियावर मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कस पाकिस्तानला दाबायला पाहिजे, तांडवची स्क्रिप्ट कशी गंडली, सदाशिवराव भाऊंनी पानिपतात कोणती स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे होती, पृथ्वी शॉच्या बॅट आणि पॅडमधून कसा हत्ती जाईल या सगळ्याचा उहापोह सारख्या तन्मयतेने करणारे अनेक भिडू आपण बघत आलोय.

यांचा अभ्यास कधी कधी ध्रुव राठीलासुद्धा लाज आणेल असा असतो. असो. पण असाच प्रकार जेष्ठ इतिहाससंशोधक रामचंद्र गुहा यांनी केला होता.

रामचंद्र गुहा हे भारतातील सुप्रसिद्ध इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकाचे लेखक आहेत. गांधीजी,नेहरू त्यांची धोरणे आणि त्यांचा भारतावर झालेला परिणाम, त्यांच्या निधनानंतर बदलत गेलेला भारतीय सामाजिक व राजकीय जीवन याविषयीचा त्यांचा अभ्यास प्रगाढ म्हणता येईल असा डीप आहे.

गांधी घराण्याने राजकरण सोडले तर भारताचे भले होईल अशी प्रखर मते मांडणारे राम गुहा फटकळ बोलण्यासाठी म्हणून जगात फेमस आहेत.

तुम्ही आम्ही असतोय तसे ते सुद्धा क्रिकेटचे फॅन आहेत, क्रिकेटच्या इतिहासाचे अभ्यासक, स्तंभलेखन त्यांनी केलंय. एवढंच काय तर भारतीय क्रिकेटचा कारभार सुधारण्यासाठी लोढा समितीने २०१७ साली बीसीसीआयचा प्रशासक म्हणून राम गुहा यांचीच निवड केली होती.

पण पुस्तकी ज्ञान आणि मैदानातील परिस्थिती वेगळी असते. दुर्दैवाने राम गुहा हे विसरले आणि यामुळे त्यांना एकदा थेट राहुल द्रविडला शहाणपणा सांगायचा प्रयत्न केला.

द्रविड आणि गुहा हे बेंगलोरचे असल्यामुळे एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे होते. गाववाला असल्यामुळे सहाजिकच गुहा यांचा द्रविड सगळ्यात आवडता खेळाडू होता. कधी एयरपोर्ट वर वगैरे त्यांची भेट झाली की दोघांच्या गप्पा व्हायच्या. एकदा तर गुहा यांनी विमानातल्या क्रू समोर द्रविडला निवड समिती कर्नाटकातील एका तरुण बॉलरवर कसा अन्याय करते यावरून लेक्चर झाडलेलं. सज्जनपणाने द्रविडने ते ऐकून देखील घेतलेलं.

गोष्ट आहे २००७ सालची.

राहुल द्रविड तेव्हा भारताचा कप्तान होता. आपली टीम तेव्हा इंग्लंडमध्ये वनडे सिरीज खेळत होती. भारतात धोनीचे आगमन झालेलं त्यामुळे वनडे विकेटकिपिंगची द्रविडची जबाबदारी कमी झाली होती. तस बघायला गेलं तर तो नेहमी स्लिपमध्ये उभा राहायचा. पण कप्तान झाल्यापासून तो फिल्डिंगसाठी मिड ऑफ वर उभा राहू लागला होता.

यामागचं प्रमुख कारण होत कि मिड ऑफ वर फिल्डिंगला उभं राहील तर बॉलरला काही सूचना द्यायच्या असतील तर ते करता येत. प्रत्येक बॉल नंतर चर्चा करता येते. ग्राऊंडच्या मधोमध असल्यामुळे फिल्ड सेटिंग वर लक्ष ठेवता येते, फिल्डिंग बदलता देखील येते.

पण यामुळे झालं असं की स्लिपवर नवख्या खेळाडूला उभे करण्यात आले आणि त्याने काही सोपे कॅच सोडले. द्रविड स्लिपमध्ये नसल्याचा टीमला मोठा फटका बसू लागला होता. राम गुहा यांनी हे ऑब्जर्व्ह केलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याला हि सूचना सांगणारं खरमरीत पत्र ईमेल वरून पाठवून दिलं.

प्रिय राहुल

बहुदा तू भारतातल्या सर्वात चांगल्या कसोटी फलंदाजापैकी एक आहेस पण याबाबतीत शंका नाही की तू भारताचा आजवरचा सर्वोत्कृष्ट स्लिप फिल्डर आहेस. त्यामुळे तू तेथेच फिल्डिंग करणे आवश्यक आहे. मला माहित आहे की आपल्या नवख्या गोलंदाजीमुळे मार्गदर्शन करण्यासाठी तू तिथे जवळ असणे आवश्यक आहे. पण, जरी या सर्व गोष्टी आपण मानल्या तरी मला वाटतं की तुझ्यासाठी आणि संघासाठी बेस्ट जागा ही स्लिप आहे. तू तिथे असतास तर सुरुवातीच्या षटकांत हे सर्व झेल खाली गेले नसते.

आपला विनम्र राम गुहा

रामचंद्र गुहा यांनी तो ईमेल पाठवला आणि विसरून देखील गेले. जवळपास दोन दिवसांनी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. राहुल द्रविडने त्यांना रिप्लाय केला होता.

उत्सुकतेने गुहा यांनी तो ईमेल उघडला. तर त्यात द्रविडने त्यांना मी तुमचे पुस्तक विकत घेतले आहे आणि त्यातली १८० पाने वाचली असल्याचं सांगितलं होतं. राम गुहा यांनी या पुस्तकात लिहिलेल्या प्रमाणे ‘भारताचा इतिहास गांधीजींच्या मृत्यूपाशी थांबलेला आहे आणि स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर जिथे आहोत तिथे आहे’ या वाक्याला सहमती दर्शवली होती.

शिवाय हे संपूर्ण पुस्तक वाचुन झाल्यावर आपल्याशी या पुस्तकाबद्दल गप्पा मारायला आवडेल असंही द्रविड गुहा यांना सांगत होता.

रामचंद्र गुहा सांगतात पण संपूर्ण ईमेलमध्ये मी दिलेल्या सजेशन बद्दल एक ओळ देखील लिहिलेली नव्हती. ज्या प्रमाणे तेजतर्रार शोएब अख्तर १५०च्या स्पीडने बाउन्सर मारतो आणि द्रविड सहज खाली वाकून सोडून देतो तेव्हा बॉलरला किती फ्रस्ट्रेशन आलं असतं असेल तेच फ्रस्ट्रेशन राम गुहा यांना आलं.

राहुलचा संयम कधी तूटला नव्हता,

त्या दिवशी राम गुहा यांना उत्तर त्याने उत्तर देणे सहज शक्य होतं. पण तो त्या विषयावर बोललाच नाही. राम गुहा म्हणतात राहुलने आपल्या कृतीतून दाखवून दिलं की,

तुम्ही क्रिकेटमध्ये चोंबडेपणा करू नका. इतिहासकार आहेत इतिहासाची पुस्तके लिहा.

एखाद्या क्रिकेट स्लेजिंगला उत्तर दिल्याप्रमाणे राहुलने हा विषय कायमचा संपवला. राम गुहा म्हणतात मी कप्तानाला शहाणपणा सांगायचा लुडबुड बंद करून गप्प पुस्तक लिहिण्याच्या मागे लागलो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.