राहुल गांधी ४८ ! शिवसेना ५२ !

१९ जून. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपला बाळ महाराष्ट्राला देत आहे असं सांगितलं त्याला ५२ वर्ष झाली. याच दिवशी राजीव आणि सोनिया गांधी यांचं बाळ आता ४८ वर्षाचं झालंय. बाळासाहेब आपल्यात नाहीत. शिवसेना आहे. सेनेच्या वागण्यावरून विरोधी पक्षात आहे का सत्तेत आहे कळत नाही. राहुल गांधी विरोधकाची भूमिका एकनिष्ठपणे बजावताना दिसतात. त्यांनाही खूप काळ लागला आपण आता विरोधक आहोत हे कळायला. राहुल गांधींच वय सेनेपेक्षा छोटं आहे. पण ते राष्ट्रीय नेते आहेत. खरंतर कुठल्याही राज्यात राहुल गांधी एकहाती सत्ता आणू शकतील अशी स्थिती आजतरी नाही. पण तरीही ते घराणेशाहीच्या बळावर राष्ट्रीय नेते आहेत. शिवसेना राज्यात एकहाती सत्ता आणायच्या वल्गना करत असली तरी त्यांना ते शक्य नाही. राहुल गांधी यांच्याकडे एक पूर्णपणे लयास गेलेला, उर्जाहीन कॉंग्रेस पक्ष आला. उद्धव ठाकरे यांच्याकडे एक आक्रमक सेना आली होती. हळूहळू सेनेतली आक्रमक माणसं बाहेर पडू लागली. सगळे आक्रमक नेते बाळासाहेब असताना बाहेर पडले होते. पण त्यातल्या कुणीही आपण बाळासाहेबांमुळे बाहेर पडतोय असं सांगितलं नाही. प्रत्येकाने बोट दाखवलं ते उद्धव ठाकरे आणि त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे. राहुल गांधी यांच्या काळात खूप लोक कॉंग्रेस सोडून जाताहेत. पण त्यापेक्षा जास्त लोकांना स्वतः राहुल गांधी यांनीच विश्रांती द्यायचा निर्णय घेतलाय.

अठ्ठेचाळीसव्या वर्षी राहुल गांधी देशपातळीवरचे नेते आहेत. बावन्न वर्षाची शिवसेना केवळ नावाला राष्ट्रीय पक्ष आहे. राज्यात सुद्धा सेनेला एकहाती सत्ता आणता आली नाही. बाकी राज्यात लढलेल्या निवडणुकीत नामुष्कीच पदरी पडली. खरंतर भारतीय जनता पक्षाच्या आधी शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. गर्वसे कहो हम हिंदू है ही घोषणा सेनेच्या व्यासपिठावर दिली गेली. विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या रमेश प्रभू यांचा प्रचार करताना बाळासाहेबांनी थेट हिंदुत्वाच्या नावाने प्रचार केला. मतं मागितली. गंमत म्हणजे त्यावेळी सगळे पक्ष एकीकडे आणी सेना एकीकडे असं चित्र होतं. भारतीय जनता पक्षाने उघड हिंदुत्व स्वीकारलं नव्हतं. विलेपार्ले निवडणूक सेना जिंकली. कोर्टात केस झाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली म्हणून प्रभूंची निवड रद्द झाली. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार रद्द केला गेला. आज तरुण पिढीचा विश्वास बसणार नाही पण बाळासाहेबांना त्याकाळात मत मागण्याचा अधिकार होता पण मत देण्याचा अधिकार नव्हता. हिंदुत्वाच्या मुद्द्यात ताकद आहे ही गोष्ट भारतीय जनता पक्षाने हेरली आणी अडवाणी आणखी आक्रमक बनले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष दोन खासदारावरून ८० च्या पुढे गेला. थेट सत्तेत आला. शिवसेना आजही मराठी माणूस का हिंदुत्व या विषयात घुटमळत बसलीय. 

बाळासाहेब, अडवाणी आणी वाजपेयी यांच्यापेक्षा जास्त आक्रमक आणि लोकप्रिय होते. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असणारे एकमेव नेते होते. पाकिस्तानी खेळाडू असो किंवा जनता असो त्यांना बाळासाहेब जास्त मोठे वाटायचे. जगात हिंदूंचा नेता म्हणजे बाळासाहेब असं समीकरण होतं. पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचं की नाही या विषयवार देशात बाळासाहेबांच मत जास्त महत्वाचं होतं. राष्ट्रीय राजकारणात शिरायला अजून काय पाहिजे असतं? पण आज सेनेचं मत कुठल्या विषयावर घेतलं जातं? गेली काही वर्ष सेनेचं मत फक्त राष्ट्रपतीपदासाठी घेतलं जाऊ लागलं. ज्या पदाला आधीही फार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आता तर मुळीच  नाही.

देशाच्या राजकारणात दबदबा असलेला पक्ष आज महापालिकेत अडकून पडलाय. प्रत्येक पावसात मुंबई महापालिकेची नाचक्की होते. औरंगाबाद महापालिकेत भारतीय जनता पक्षासोबत युती असूनही कचरा प्रश्नावर सर्वात जास्त बदनाम झाली ती सेना. बावन्न वर्षात शिवसेनेला चांगली प्रचारयंत्रणा राबवता आली नाही. भारतीय जनता पक्ष राज्यातल्या समस्येला सेना कशी जवाबदार आहे हे चित्र निर्माण करण्यात यशस्वी होतोय. राजीनामे प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने सेनेचं हसं करण्याची एकही संधी सोडली नाही.

याउलट राहुल गांधी मात्र भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडियावरील प्रचाराला, ट्रोलला आता समर्थपणे तोंड देताना दिसताहेत. भारतीय जनता पक्षाची सोशल मीडियाची खेळी मधल्या काही प्रकरणात त्यांच्याच अंगावर उलटवण्यात राहुल गांधी यशस्वी झाले. खरंतर कॉंग्रेसचं सरकार असताना बाबरी मशीद पाडली गेली. कॉंग्रेस काहीही म्हणत असली तरी नरसिंहराव सरकारमुळेच ते घडलं. आणि मग जवाबदारी घ्यायची वेळ आली तेंव्हा एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी जवाबदारी घेतली. जर मशीद सैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे असं बाळासाहेब म्हणाले. म्हणजे ज्यांची सत्ता असताना मशीद पडली ते आणि ज्यांनी जवाबदारी घेतली ते राहिले बाजूला आणि जवाबदारी न घेणारा पक्ष मात्र सत्तेत आहे.

केवळ ठिणगी लावणारा भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आला तरी अयोध्येचा विषय सुद्धा काढत नाही ही खरी गंमत आहे. उलट मशीद पाडण्याची जवाबदारी का होईना घेणारी सेना, त्यामुळे झालेल्या दंगलीत मुंबईत हिंदूंच्या बाजूने आक्रमकपणे उभी राहिलेली सेना या गोष्टीचा कुठलाही फायदा घेऊ शकली नाही. त्यानंतर झालेल्या गुजरात दंगलीने तर सगळी आक्रमक प्रतिमा मोदींची झाली. पुन्हा एकदा सेनेने तयार केलेल्या वाटेवर बीजेपीचा रथ धावत गेला. आज या रथाला अडवू शकेल असं नेतृत्व दिसत नाही. राहुल गांधी प्रयत्न करताना दिसताहेत. देशपातळीवर नेतृत्वाची केवढी मोठी पोकळी आहे. छोटे छोटे पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करताहेत. चंद्राबाबू नायडू, ममता, नितीश कुमार, मायावती यांचं महत्व किती वाढलंय. दिल्लीसारख्या छोट्या राज्यातून अरविंद केजरीवाल देशभर चर्चेचा विषय ठरतात.

पण ५२ वर्षांची शिवसेना मात्र अजूनही चाचपडताना दिसतेय. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार भारतीय जनता पक्षाला आपल्याला हवं तसं वापरतात आणी टाकून देतात. भारतीय जनता पक्ष निमुटपणे सहन करतो. अशी ताकद सेनेकडे होती. ती टिकवून ठेवता न येणे हे दुर्दैव आहे. त्याउलट पुन्हा शून्यातून पक्षबांधणीचा प्रयत्न करणारे राहुल गांधी निदान थेट विरोधात तरी ठाम उभे आहेत.

घराणेशाही कॉंग्रेसमध्ये आहे तशी सेनेत पण आहे. जेवढं गांधी हे आडनाव राहुल गांधीना उपयोगाचं आहे त्यापेक्षा जास्त ठाकरे हे आडनाव उद्धव ठाकरे यांना राज्यात तरी उपयोगाचं आहे. प्रश्न फक्त निणर्यक्षमतेचा आहे. सध्या तरी ४८ वर्षांच्या राहुल गांधींनी लढायचं ठरवलंय. स्वबळावर. जे येतील त्यांच्यासोबत. उद्धव ठाकरेंच मात्र काहीच ठरलेलं नाही. खिशातले राजीनामे या पावसात भिजून गेले नाही म्हणजे मिळवलं.  

                       .  

 

1 Comment
  1. Shiva Patil says

    काहीही म्हणा पण देशाच युवा नेतृत्व वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी लढायला शिकतोय
    वयाच्या 44 व्या वर्षापासून मॅच्युअर बोलतोय
    हेच आपले सर्वात मोठे दुर्दैवं

Leave A Reply

Your email address will not be published.