राहुल गांधी यांना बोलण्यातील आक्रमकपणा पक्षात देखील आणण्याची गरज आहे…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल सोशल मीडिया सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यात संवादामध्ये ते प्रचंड आक्रमक दिसून आले. सोबतच त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांवर आणि भाजपवर टिका देखील केली. कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले,

ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचं स्वागत आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते.

यानंतर देखील राहुल गांधी यांची आक्रमकता कमी झालेली दिसली नाही. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपकडून येणाऱ्या फेक न्यूजमुळे घाबरून जाऊ नका असा देखील सल्ला दिला. सोबतच कोरोना काळात चांगलं काम केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असतील तर त्यांच्यावर हसा, चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर त्यांच्यावरही हसा, असं देखील गांधींनी सांगितले…

एकूणच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काल राहुल गांधी यांचा रुद्रावतार बघायला मिळाला होता. पण सध्या काँग्रेस पक्ष ज्या अडचणी आणि आव्हानांमधून जात आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सध्या आपल्या बोलण्यातील आक्रमकपणा पक्षात आणण्याची गरज आहे असचं म्हणावं लागेल. कारण अधिवेशन आणि महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत.

कोणकोणत्या आव्हानातून सध्या काँग्रेस पक्ष जात आहे?

१. पक्षाला आद्यप अध्यक्ष नाही :

काँग्रेस पक्षाला मागच्या २ वर्षांपासून पूर्णवेळ अध्यक्ष नाही. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षांची शोधमोहीम सुरु झाली. पण त्यात पक्षाला आणि विशेषतः काँग्रेसच्या वर्किंग कमिटीला यश आलं नव्हतं. परिणामी पुन्हा एकदा या पदासाठी सोनिया गांधी यांनाच या पदावर हंगामी स्वरूपात आणण्यात आलं.

मात्र सोनिया गांधी या सध्या आजारपण आणि तब्येतीच्या कारणास्तव सार्वजनिक व्यासपीठांपासून दूरच आहेत. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ५ विधानसभा निवडणुकांमधील प्रचार मोहिमांमध्ये देखील सहभाग घेतला नव्हता. पक्षाचा अध्यक्ष प्रत्यक्ष प्रचारात नसणं ही कदाचित क्वचितच घडणारी गोष्ट असावी. त्यामुळेच पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष द्यावा यासाठी पक्षातून अनेकदा मागणी करण्यात आली आहे.

२. पंजाब निवडणूक तोंडावर आणि वाद :

पुढच्या वर्षी पंजाबसह, उत्तरप्रदेश, गुजरात, उत्तराखंड अशा काही महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र त्याचवेळी पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू या काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे.

नवज्योतसिंह सिद्धू यांच्या गटाने कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. त्यावरुन पंजाबचा हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी मागच्या बरेच दिवसांपासून प्रयत्न चालू आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना अमरिंदर सिंग यांच्याशी बोलण्यासाठी जबाबदारी देखील देण्यात आली होती.

त्यानंतर यावर उपाय म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद कायम ठेवून नवज्योत सिंग सिद्धूंकडे पंबाज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र सिद्धूंकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यापूर्वी पंजाब काँग्रेस दोन गटात विभाजित होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. अजूनही वर्चस्वाचा हा वाद सुरूच आहे.

३. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी?

महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या जोरात चर्चा चालू आहेत. याला कारण ठरलं आहे ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस पक्ष. कारण महाविकास आघाडीमध्ये असून देखील नाना पटोले सातत्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरच टिका करताना दिसून येत आहेत.

सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आगामी काळात महाविकास आघाडीमध्येच निवडणूक लढवणार असल्याचं सांगत आहेत. पण त्याचवेळी काँग्रेस आणि नाना पटोले मात्र सातत्यानं स्वबळाची नारा देत आहेत. यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जाहीर भाष्य देखील केलं होतं. सोबतच या दोन्ही नेत्यांनी नाना पटोले यांना समज देण्यासाठी दिल्लीकडे तक्रार सुद्धा केली होती. 

त्याचवेळी महाविकास आघाडीमधील या दुफळीचा भाजप फायदा घेणार का? असं चित्र निर्माण झालं होतं. कारण याच काळात शिवसेना – भाजप पुन्हा जवळ येणार असल्याच्या चर्चा मधल्या काळात सुरु होत्या. त्यामुळे जर पुन्हा या दोन पक्षाची युती झाली तर काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

राजस्थानमधील वर्चस्ववादाची लढाई अजूनही सुरुच आहे.. 

मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पक्षावर चांगलाच दबाव वाढवला आहे. पायलट यांनी त्यांच्या समर्थक ७ ते ८ आमदारांना मंत्रिपद देण्यात यावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी अक्षरशः आकाशपाताळ एक केलं आहे. यात अगदी राजस्थान दौऱ्यापासून बंडखोरीच्या चर्चांचा देखील समावेश होता.

याच सगळ्यात मुख्यमंत्री गेहलोत आणि पायलट यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सोबतच आता पायलट स्वतः पुन्हा मंत्रिमंडळात परतण्यासाठी इच्छुक नसल्याचं समजत आहे. त्यामुळे पक्ष त्यांना दिल्लीत एखादी मोठी जबाबदारी देऊ शकते असा अंदाज वर्तवला जातं आहे. मात्र यामुळे गेहलोत गटात सध्या चिंतेचं वातावरण असल्याचं सांगितलं जात आहे.

५. नेते पक्ष सोडून चालले आहेत..

अंतर्गत कलहासोबतच काँग्रेसला नेत्यांचं नुकसान देखील सहन करावं लागत आहे. यात मागच्या काही काळात शत्रुघ्न सिन्हा, कृपाशंकर सिंग, जितन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया अशा अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. ही यादी बरीच मोठी आहे. हे सगळे नेते आपल्या आपल्या राज्यांमधील दिग्गज नेते होते.

म्हणून आगामी काळात पक्षाला पुन्हा नवे नेते आणि नेतृत्व उभं करावं लागणार आहे.  

त्यामुळेच राहुल गांधी ज्या आक्रमक पद्धतीने काल बोलले तेवढीच आक्रमक धोरणे पक्षात देखील राबवण्याची गरज आहे. अन्यथा संसदेचं आगामी अधिवेशन, पुढच्या वर्षीच्या उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमधील निवडणुका यामध्ये पुन्हा काही तरी चित्र बदलेल ही अपेक्षा फोल झाल्यास काँग्रेसच्या कार्यकर्ते, नेते यांना आश्चर्य वाटायला नको.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.