गोव्याच्या जनतेसाठी राहुल गांधी ‘आपला माणूस’ ठरणार का?

गोयनकारंचा हातत गोयचा फुदर, हे आहे काँग्रेसचं गोवा निवडणुकांसाठीचं घोषवाक्य. याचा अर्थ पण सांगतो, गोवेकरांच्या हातातच गोव्याचं भविष्य आहे. थोडक्यात गोव्यामध्ये काँग्रेस डायरेक्ट लोकांच्या भावनेला हात घालतंय. राहुल गांधींनी तर एका दिवसाच्या प्रचारातही गोवन जनतेला आवाहन केलं, ‘मला तुमच्याच कुटुंबातला एक समजा.’

गोव्यातली निवडणूक जवळपास पाच महिन्यांवर आलीये. भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस चौघेही जण यावेळी शर्यतीत आहेत. या सगळ्यात सर्वात जास्त प्रेशर कुणावर असेल तर काँग्रेसवर. कारण सध्याच्या विधानसभेत काँग्रेसचे फक्त चार आमदार आहेत.

राहुल गांधींच्या प्रचाराचा काय विषय ए?

काँग्रेसनं प्रचारात एकच मुद्दा लाऊन धरलाय, तो म्हणजे राहुल गांधी गोवेकरांसाठी ‘आपला माणूस’ आहेत. गोवा काँग्रेसच्या सोशल मीडियावरही अशाच पोस्टची हवा होऊ लागली. राहुल गांधींनी ३० ऑक्टोबरला गोव्याचा दौरा केला.

ते गोव्यात येण्याआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘राहुल गांधी येतायत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’ असं म्हणणाऱ्या मच्छीमारांचे व्हिडिओ पोस्ट केले. खाण कामगार आणि मच्छिमारांसोबत राहुल गांधींच्या संवादाचंही त्यांनी आयोजन केलं.

एका मच्छिमारानं रेल्वे रुळाच्या प्रस्तावित दुपदरीकरणामुळं आपल्याला व आपल्या शेजाऱ्यांना कसा त्रास होईल हे पाहण्यासाठी राहुल यांना घरी बोलवलं, विशेष म्हणजे राहुल यांनी त्याचं आमंत्रण लगेचच स्विकारलं. त्यासोबतच आणखी एक फोटो व्हायरल झाला, त्यात राहुल गांधी टू-व्हीलरवर हेल्मेट घालून मागं बसलेले दिसतात.

आता गोवा काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या, तर राहुल गांधी ननकडून गुलाब घेतायत. रस्त्याच्या कडेला थांबून भाजीविक्रेत्यांशी गप्पा मारतायत. एक मच्छीमार महिला त्यांना ‘बाबा माजिया’ म्हणजेच माझा भाऊ म्हणून आवाज देतीये. एक मच्छीमार त्यांना हँडसम म्हणतोय. सोबतच गोवा काँग्रेस असंही म्हणतंय की, ‘राहुल गांधी केवळ आपल्या नम्रतेनंच नव्हे, तर आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळंही गोव्यातल्या लोकांची मनं जिंकत आहेत.’

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे?

गोव्याच्या पर्यावरणाचं रक्षण करू. पर्यावरण आणि डेव्हलपमेंटचा समतोल साधू. आणि जर गोवन जनतेच्या हिताचा नसेल तर कोळसा प्रकल्प सुरू होऊ देणार नाही. स्वच्छ पर्यावरण हा जनतेचा हक्क आहे आणि त्याचं रक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य, या मुद्द्यांचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश आहे.

इतर पक्षांचा प्रचार कसा सुरु आहे?

बंगालमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर, ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी गोव्याच्या निवडणुकीत उतरले आहेत. ‘गोयनची नवी सकल’ म्हणजेच गोव्याची नवी सकाळ अशा टॅगलाईनसह प्रचार करणाऱ्या तृणमूलनं ममता बॅनर्जी लढवय्या आहेत अशी इमेज तयार करण्यावर भर दिला आहे.

दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आमचं सरकार आल्यास सर्वधर्मियांना तीर्थक्षेत्रांची सफर घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. 

त्यामुळं या सगळ्या भाऊगर्दीत राहुल गांधींचं ‘आपला माणूस’ असणं गोव्याच्या जनतेवर किती प्रभाव पाडतंय? काँग्रेसची नौका तरतेय का? याची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.