लोकसभा निवडणूकीच्या पराभवानंतर राहुल गांधी या १७ राज्यांकडे फिरकलेच नाहीत.

कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी. सध्या इटलीमध्ये आहेत. लवकरच परत येतील. मध्यंतरी शिमलामध्ये सुट्टीवर गेले होते. या दोन्हीवरुन प्रचंड चर्चा झाली. शेतकरी आंदोलन चालू असताना ते अशा सुट्टीवर गेल्याने शेतकरी संघटनांनी यावर प्रचंड अशी टिका केली.

यात ते राजकारण गांभीर्याने करत नाहीत इथपासून तर ते पुर्णवेळ राजकारणी नाहीत. अशा बऱ्याच टिका करुन झाल्या. यावर कॉंग्रेसने काही तरी सांगुन वेळ मारुन नेली पण ते सुट्टीवर गेले होते हे सत्यचं.

यावर ‘बोल भिडू’ने थोडा रिसर्च करायचं ठरवलं. विरोधी पक्ष म्हणतात तसं राहुल गांधी खरचं राजकारण गांभीर्याने घेतात की नाही यासाठी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जनाधार वाढवण्यासाठी त्यांनी किती आणि कोणत्या राज्यांचा दौरा केला याची माहिती शोधून काढली आणि ती आता तुमच्यासमोर मांडत आहेत.

तर २०१९ पासून म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकांनंतर आणि त्यातील पराभवानंतर ते जवळपास १७ राज्यांमध्ये गेलेच नाहीत. होय. राहुल गांधी यांच्या मागचा दीड वर्षातील अधिकृत दौऱ्यांचे विश्लेषण आम्ही तुम्हाला सांगत आहे.

देशातील २७ राज्यांमधील १७ राज्य वजा केल्यानंतर राहिली दहा राज्य. त्यातील पाच राज्यांमध्ये ते केवळ एकदा गेले. तर इतर पाच राज्यांमध्ये दोन वेळा गेले. केवळ केरळ हे एकमेव असं राज्य आहे जिथं ते ८ वेळा गेले. कारण त्यांचा वायनाड हा मतदारसंघ तिथला आहे.

ती १७ राज्य कोणती हे तुम्हाला सांगणारच आहे पण पहिल्यांदा आपण ती ५ राज्य बघूया जिथं ते दिड वर्षात केवळ एकदाच गेले होते.

यात १ जून २०१९ पासून राहुल गांधी यांनी महाराष्ट्र, पंजाब, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा केवळ एक वेळा दौरा केला आहे.

ऑक्टोंबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. डिसेंबर २०१९ मध्ये झारखंड विधानसभा निवडणुकांपुर्वी तिथला दौरा केला होता. तर त्याच महिन्यात छत्तीसगडमध्ये आदिवासी नृत्य महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले होते.

नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी २०२० मध्ये ते काँग्रेस पक्षात द्वारे आयोजित केलेल्या युवा आक्रोश रॅलीला संबोधित करण्यासाठी राजस्थान मध्ये गेले होते.

महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलो आहे. नुकतेच या सरकारने एक वर्ष देखील पूर्ण केलय. पण सरकारमध्ये असूनही कॉंग्रेसमधील पक्षांतर्गत राजकारण, सत्तेतील सहयोगी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील मतभेद हे वारंवार उघडकीस येतात. त्यानंतर देखील ते २०२० या अखंड वर्षात एकदाही महाराष्ट्रात आलेले नाहीत

२०२० वर्षातील त्यांचा शेवटचा अधिकृत दौरा होता ऑक्टोंबर २०२० मध्ये पंजाबचा. जिथे त्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात तीन दिवसीय ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभाग घेतला होता आणि एक प्रेस कॉन्फरन्स केली होती.

या पाच राज्यांचा दोनवेळा दौरा केला होता

या दीड वर्षाच्या काळात राहुल गांधी यांनी ज्या पाच राज्यांचा दौरा केला होता त्यात  हरियाणा, आसाम, उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या राज्यांमध्ये ते २ वेळा गेले होते.

त्यांनी हरियाणाचा पहिला दौरा केला तो विधानसभा निवडणुकांच्या आधी ऑक्टोबर २०१९ मध्ये. त्यानंतर बरोब्बर एका वर्षाने म्हणजे ऑक्टोबर २०२० मध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी तिथं गेले होते.

तर आसामचा पहिला दौरा त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात एकता दाखवण्यासाठी केला होता. त्यावेळी त्यांनी विरोध प्रदर्शनादरम्यान मारल्या गेलेल्या १७ वर्षीय सॅम स्टॅफर्ड यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

त्यानंतर ते पुन्हा आसाममध्ये गेले नोव्हेंबर २०२० मध्ये. त्यावेळी आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दौरा केला होता.

आसाममध्ये यावर्षी म्हणजे २०२१ मध्ये निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने २०२१ नंतर जवळपास तीन वेळा राज्यात सत्तेत होती. पण २०१६ मध्ये भाजप कडून काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता.

राहुल यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचा दौरा केला. पहिला जुलै २०१९ मध्ये आपला आधीचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये केला होता. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या निदर्शकांना भेटण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी अडवल्याने जावू शकले नव्हते.

पुढे ऑक्टोंबर २०२० मध्ये उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेनंतर पोलिसांचा विरोध असताना बहिण प्रियांका यांच्यासमवेत ते तिथं गेले होते.

गुजरातचा देखील गांधी यांनी दोन वेळा दौरा केला. पहिला होता २०१९ मधील ऑक्टोंबर महिन्यामध्ये. यादरम्यान ते कॉंग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना भेटले होते. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये दुसरा गुजरातचा दौरा केला. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी भरुच इथं ते आले होते.

२०१७ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेसने गुजरातमध्ये चांगली कामगिरी केली होती. भाजपला ९९ या दुहेरी आकड्यावर थांबवत स्वतः ७७ जागा जिंकल्या होत्या. पण लोकसभेच्या निवडणूकीत राज्यातील सर्व २६ जागांवर कॉंग्रसला पराभव पहायला लागला होता.

सरलेल्या वर्षातच बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या. पण इथं निवडणूक होवून देखील राहुल गांधी केवळ दोनच वेळा आले होते. एक जुलै २०१९ मध्ये मानहानीच्या प्रकरणातील सुनावणीसाठी पटना न्यायालयात आणि ऑक्टोंबर २०२० मध्ये राज्यातील प्रचारासाठी. त्यावेळी त्यांनी केवळ चार सभा घेतल्या होत्या.

निवडणूकीत पक्षाला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला होता. ७० पैकी केवळ १९ जागा पक्षाला जिंकता आल्या. सोबतच राजदच्या सत्तास्थापनेला लागणाऱ्या मॅजिक फिगर चुकवण्याच खापर देखील कॉंग्रेसवरच पडलं.

दिड वर्षात या १७ राज्यांत राहुल गांधी गेलेच नाहीत.

यामध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मणिपुर, नागालँड, मेघालयं, मिजोराम, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, तेलंगाना, मध्य प्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा, हिमाचल प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांचा नंबर लागतो.

यापैकी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये यावर्षी म्हणजे २०२१ मध्ये निवडणूका होणार आहेत. तामिळनाडूमध्ये १९६७ सालापासून तर पश्चिम बंगालमध्ये १९७१ पासून कॉंग्रेसने सत्ता अनुभवलेली नाही.

आंध्र प्रदेशमध्ये देखील कॉंग्रेसने २००४ ते २०१४ पर्यंत सलग १० वर्ष सत्ता केली. पण राज्याच्या विभाजनानंतर आणि तेलंगणाच्या निर्मीतीनंतर आपल्या प्रदर्शनाला ते कायम ठेवू शकले नाहीत.

आता राहिला प्रश्न केंद्र शासित प्रदेशांचा

तर जम्मु – काश्मिर वगळता एकाही केंद्रशासित प्रदेशात ते गेले नाहीत. ऑगस्ट २०१९ मध्ये ३७० मोडित काढल्यानंतर श्रीनगरमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले होते. पण या व्यतिरीक्त ते लडाख, अंदमान आणि निकोबार बेट समूह, लक्षद्वीप, पॉंडिचेरी, दादरा आणि नगर हवेली आणि दमन- दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेले नाहीत.

आता भिडूंनों यावरुन तुम्हीच ठरवा. विरोधक आरोप करतात तसं राहुल गांधी खरचं राजकारण गंभीर घेतात की घेत नाहीत. पण दिड वर्षामध्ये ते जवळपास अर्ध्याहून अधिक देशात आणि १७ राज्यात गेलेलेच नाहीत हे देखील सुर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.