राहुल गांधींनी एक स्कीम लढवली अन सरकारची नजर चुकवून ट्रॅक्टर संसदेत घुसवला.

दिल्लीमध्ये सर्वच भागात कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आवाज थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्ष आणि नेते कृषी कायद्यांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारवर सततपणे टीका करतांना दिसत आहेत.

मात्र काल-परवा कॉंग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांनी तर थेट संसद भवनातच ट्रॅक्टर घेऊन एंट्री मारली होती. ते स्वतः ट्रॅक्टर चालवत होते पण ते जो ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले, त्यावर एक बॅनर लावण्यात आला होता, त्यावर असं लिहिलं होतं.

‘शेतकरी विरोधी तीन काळा कृषी कायदे मागे घ्या, मागे घ्या’

ते कॉंग्रेसचे राज्यसभेचे के.टी एस तुलसी यांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानापासून ट्रॅक्टर चालवत विजय चौकात पोहचले. ट्रॅक्टरवर त्यांच्यासमवेत पंजाबचे खासदार प्रतापसिंग बाजवा, रणदीप सुरजेवाला, बीव्ही श्रीनिवास आणि दीपेंद्र हुड्डा, रवानित सिंग बिट्टू यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेते होते, या दरम्यान सुरजेवाला आणि श्रीनिवास यांना ताब्यात घेण्यात आले होते.

पण प्रश्न हा निर्माण झाला होता कि, पण इतक्या अति संवेदनशील एरियात राहुल गांधींकडे हे ट्रॅक्टर आले कसे काय ? आत मध्ये येईपर्यंत कोणत्याच पोलिसांची नजर राहुल गांधींच्या ट्रॅक्टरवर का पडली नसावी ?

राहुल गांधी हा ट्रॅक्टर चालवत संसद भवनाच्या परिसरात गेल्याचा व्हिडिओ काल दिवसभर मध्यामांवर  राजकीय वादळ घेऊन आला होता.

ट्रॅक्टर संदर्भात दिल्ली पोलिसांना बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यानंतर कारवाईच्या मार्गाने दिल्ली पोलीस लागलेत, त्यांनी संसद भवनात आणलेल्या या ट्रॅक्टरच्या मालकाचा शोध लावला, एवढेच नव्हे तर ज्या कंटेनरमध्ये हे ट्रॅक्टर आणले होते त्या मालकाबद्दलही पोलिसांना माहिती मिळाली आहे. दोघांनाही चौकशीसाठी बोलवले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

या ट्रॅक्टरला संसद भवनच्या परिसरात आणण्यासाठीच्या शिफारशीसाठी एका खासदाराची चिट्ठीचा वापर करण्यात आला होता.

कोरोना काळात आणि त्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानच्या इतके कडक निर्बंध असून देखील, तसेच हाय सेक्युरिटी एरियात हा ट्रॅक्टर नेण्याबाबत दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेस नेते आणि ट्रॅक्टर मालकांवर इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासदाराच्या पत्रामध्ये असे लिहिले होते की, आमच्या घरासाठी लागणाऱ्या घरघुती वस्तू, सामान या कंटेनरमध्ये येतील, परंतु त्या कंटेनरमध्ये तर लपून ट्रॅक्टर आणण्यात आला होता. तपासात या दोन्ही वाहनांचे मालक सोनीपतचे रहिवासी आहेत. ट्रॅक्टरचा मालक सोनीपतच्या बिंद्राउलीचा रहिवासी आहे. ज्या कंटेनरमध्ये ट्रॅक्टर आला त्या सोनीपतच्या बडखलसा भागातील एका व्यक्तीच्या नावे नोंदविलेला आहे.

हा कंटेनर दिल्लीत आणण्यासाठी शिफारशीसाठी एका खासदाराच्या पत्राचा वापर करण्यात आला होता. या पत्रात खासदारांनी आपल्या घरातील वस्तू कंटेनरमध्ये आणण्याविषयी बोलले होते, पण यात तर घरघुती सामानाच्या नावाखाली एक ट्रॅक्टर आणले गेले होते.

आणि याचा थांगपत्ता सुद्धा दिल्ली पोलिसांना नव्हता.

विशेष म्हणजे सोमवारी राहुल गांधी ट्रॅक्टरमधून संसद भवनात पोहोचले होते. ट्रॅक्टरवर अनेक कॉंग्रेसचे खासदारही त्यांच्या सोबत होते. ट्रॅक्टरवर बसलेले लोक कृषी विषयक कायदे मागे घ्यावेत  या मागणीचे  फलक लावले होते, तर राहुल गांधी स्वत: ट्रॅक्टर चालवत होते.

दिल्ली पोलिसांनी या सर्वांवर प्रकरणी मोटार वाहन अधिनियम, महामारी कायद्यासह इतरही अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

परवानगी न घेता हाय सिक्युरिटी झोनमध्ये पोलिसांची नजरेखालून हा ट्रॅक्टर आणून दाखवल्यामुळे आता मात्र दिल्ली पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

मात्र राहुल गांधींच्या या कृती मुळे शेतकरी आंदोलनाला नवसंजीवनी मिळाली हे मात्र नक्कीच,

कारण ट्रॅक्टर आत मध्ये नेऊन एक प्रकारचे आंदोलनच केल्याची त्यांनी पत्रकारांना बोलतांना सांगितले आहे, ते म्हणतात कि, “सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज बंद करू पाहतंय, मात्र आम्ही असं मुळीच होऊ देणार नाही. आम्ही शेतकऱ्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचवण्यासाठी हि कृती केली”.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.