ज्यांची भेट घेतल्यामुळे राहुल गांधींवर टीकेची झोड उठलीये ते धर्मगुरू जॉर्ज पोन्नैया कोण आहेत?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु होऊन २-३ दिवस होत नाही की वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात राहुल गांधी सापडल्याचं दिसत आहे. आधी त्यांनी यात्रेदरम्यान घातलेल्या टी-शर्ट वरून वाद सुरु झाला. राहुल यांनी परिधान केलेलं शर्ट ४१ हजारांपेक्षा जास्त रुपयांचं असल्याचं भाजपने त्यांच्या ट्विटरवरून सांगितलं आणि इतकं महाग शर्ट घालणाऱ्यांना काय सामान्य लोकांच्या व्यथा कळणार? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर घुमू लागले.

हा विषय शांत होत नाही की दुसरी टीका राहुल गांधींवर होत आहे. याचं कारण ठरलंय राहुल गांधींनी तामिळ धर्मगुरू जॉर्ज पोन्नैया यांची घेतलेली भेट. या भेटीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी धर्मगुरू जॉर्ज यांना विचारताना दिसतात की ‘येशू ख्रिस्त हे देवाचे रूप आहे ना?’ यावर पोन्नय्या उत्तर देतात की..

“येशू ख्रिस्त हेच खरे देव आहेत. देव माणसाच्या स्वरूपात प्रगट होतात. शक्ती किंवा इतर देवतांप्रमाणे नाही” 

धर्मगुरू जॉर्ज यांनी हिंदू देवतांवर केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल यांनी त्यांची भेट का घेतली? म्हणत टीकेची झोड विरोधकांनी उठवली आहे. याला एक कारण जॉर्ज यांचा इतिहास देखील आहे. कारण अशा प्रकारे वादाचे वक्तव्य जॉर्ज यांनी अनेकदा केलेले आहेत. एकदा तर हिंदू धर्माविरुद्ध द्वेषयुक्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना जेलवारी देखील झाली आहे. 

म्हणून नक्की कोण आहेत हे जॉर्ज पोन्नैया बघुयात…

जॉर्ज पोन्नैया हे एक धर्मोपदेशक आहेत. ते जननयागा ख्रिस्थवा पेरवईचे सदस्य आहेत. ही तामिळनाडू बेस्ड स्वयंसेवी संस्था आहे. 

जॉर्ज पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील वादग्रस्त भाषण केलं होतं. 

१८ जुलै २०२१ रोजी तामिळनाडूच्या अरुमनाई इथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाषण केलं होतं. तेव्हा जॉर्ज म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे शेवटचे दिवस दयनीय असतील हे मी लेखी देऊ शकतो. शिवाय “आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो तो देव जर अजूनही जिवंत असेल, तर आपण अमित शहा आणि मोदींना कुत्रे आणि किड्यांनी खाऊन टाकताना पाहू”, असंही जॉर्ज म्हणाले होते. 

याच भाषणात त्यांनी हिंदू समाजाच्या लोकांसाठी धमकीवाचक बोल उद्गारले होते. कन्याकुमारीमध्ये अल्पसंख्यांकांच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल बोलताना ते म्हणाले होते की..

“आपण म्हणजेच अल्पसंख्याक एकेकाळी ४२% होतो आणि आता आम्ही कन्याकुमारीमधील एकूण लोकसंख्येच्या ६२% आहोत. लवकरच आपली लोकसंख्या ७०% च्या पुढे जाईल. आपण आपली लोकसंख्या वाढवत राहू आणि कोणीही ते थांबवू शकत नाही. हिंदूंसाठी हा आमचा इशारा आहे. आम्ही भाजप किंवा आरएसएसला घाबरत नाही. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही” 

जॉर्ज यांच्या अशा चिथावणीखोर वक्तव्यांमुळे त्यावेळी तमिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्याविरोधात ३० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोन्नैया यांना मदुराईमधून अटक करण्यात आली होती. पुढे त्यांनी त्यांच्या शब्दांबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली होती. 

यापूर्वी त्यांनी भारतमातेचा अपमान होईल, असं वक्तव्य देखील केल्याचं दिसतं. 

“मी जेव्हा केव्हा बाहेर पडतो तेव्हा मी पायरी चप्पल नाही तर शूज घालतो. ही जमीन धोकादायक आहे, त्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. तेव्हा भारतमातेची घाण माझ्या पायाला लागू नये म्हणून मी असं करतो.” असं ते म्हणाले होते. 

तसंच त्यांनी तामिळनाडूमध्ये सत्तेत असलेल्या डीएमके सरकारला देखील हिंदू मतांवरून खडेबोल सुनावले होते. 

“डीएमके सरकार हिंदूंची मतं मिळवण्यासाठी मंदिरांच्या भेटी घेत आहेत, विवस्त्र पूजा करत आहेत. मात्र याचा काहीच फायदा होणार नाही. कारण डीएमके सरकार हिंदूंच्या नाही तर मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांच्या आधारावर सत्तेत आलं आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिमांना भीक मागून द्रमुक जिंकला आहे, द्रमुकने हे विसरता कामा नये. हिंदूंच्या मतांमुळे त्यांचं सरकार स्थापन झालेलं नाही.” असं जॉर्ज म्हणाले होते.

आता देखील असंच हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य जॉर्ज पोन्नैया यांनी केलं आहे. आणि त्यांच्या भेटीमुळे राहुल देखी अडचणीत आले असल्याचं दिसतंय. तेव्हा पुढे हा वाद कोणतं स्वरूप घेईल, हे बघणं गरजेचं ठरणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.