मुंबईत फिरू देणार नाही.. सेनेच्या धमकीला उत्तर देणारा एकमेव माणूस म्हणजे ‘राहूल गांधी’

राज्यात सध्या एकच मुद्दा गाजतोय, तो म्हणजे नवनीत आणि रवी राणा यांनी मुंबईत केलेलं आंदोलन आणि शिवसेनेनं त्यांना दिलेलं आव्हान. मातोश्रीमध्ये येऊन हनुमान चालिसा पठण करू असं म्हणणाऱ्या राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घराबाहेर शिवसैनिक ठिय्या देऊन होते.

दोन दिवस हा मुद्दा प्रचंड तापल्यानंतर राणा दाम्पत्यानं, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्यानं, त्यांच्या दौऱ्यात अडथळा यायला नको म्हणून आम्ही अमरावतीला परत जात आहोत,’ असं सांगितलं.

यावर वरुण सरदेसाई आणि शिवसैनिकांनी यांनी, ‘बिसलेरीची अर्धी बाटली, बंटी बबलीची फुलऑन फाटली.’ अशी घोषणाबाजीही केली.

थोडक्यात मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याला माघार घ्यावी लागली. मात्र शिवसेना आणि शिवसैनिकांनी आखलेली व्यूहरचना फोडण्याचं आणि सेनेच्या आव्हानाला प्रत्त्युत्तर देण्याचं काम एका माणसानं केलं होतं, ते म्हणजे राहूल गांधी.

फेब्रुवारी २०१० मध्ये राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा वादळी ठरला होता.

महाराष्ट्रात जरी काँग्रेसचं सरकार असलं तरी मुबंईत बाळासाहेब ठाकरे यांचाचं अंमल होता. शिवसेनाचा या दौऱ्याला विरोध होता तरी ही राहुल गांधी मुंबईमध्ये उतरले होते.

‘ भारत सर्व भारतीयांचा आहे आणि 26/11 च्या वेळी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कमांडो मुंबई वाचवण्यासाठी लढले.’ असे वक्तव्य राहुल गांधींनी बिहारमध्ये केले होते.

या वक्तव्यांचा बाळासाहेब ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखांमधून खरपूस समाचार घेतला होता.

आता राहुल गांधी मुंबईमध्ये येतील तेव्हा या ‘इटलीच्या युवराजाचा’ काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा आदेश शिवसैनिकांपर्यंत पोहचला होता. 

आता शिवसैनिक आणि ते पण मुंबईमध्ये म्हटल्यावर राज्यात सरकार असूनही काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा दौरा ठरलेल्या नियोजांनुसारच होणार असं राहुल गांधीनी ठासून सांगितलं होतं . त्यामुळं राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

५ फेब्रुवारी २०१० सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी विलेपार्ले मधील भाईदास हॉलमधील कार्यक्रमाने राहुल गांधींच्या दौऱ्याची सुरवात झाली. जुहू पासून हेलिकॉप्टरने राहुल गांधी कार्यक्रमस्थळी पोहचले.  कार्यक्रमामध्ये युवकांना संबोधित करताना त्यांना राजकारणात येण्याचं आव्हान केलं.

आता राहुल गांधींचा नेक्ट थांबा होता घाटकोपरमधील रमाबाई नगर. विलेपार्लेतून घाटकोपरला जाण्यासाठी राहुल गांधींसाठी हेलिकॉप्टर बाहेर उभंच होतं. मात्र त्यांनतर काँग्रेसच्या ‘राजकुमाराने’ जे केलं त्याचा कोणीच विचार केला नव्हता.  कार्यक्रमस्थळापासून हेलिपॅडपर्यंत उभे 500 ​पोलीस,  रुग्णवाहिका, बॉम्ब निकामी पथक यांना फाटा देत  राहुल गांधी थेट पोहचले अंधेरी रेल्वे स्टेशनवर.

मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलने त्यांनी इथून पुढील प्रवास करण्याचं ठरवलं होतं. 

१२.५० ला अंधेरी रेल्वेस्टेशनवर पोहचल्यानंतर राहुल गांधींनी आजून एक सिम्बॉलिक मूव्ह केली. ते तडक एटीएममध्ये घुसले. रेल्वेच्या तिकीटासाठी पैसे काढल्यानंतर राहुल गांधी तडक पोहचले तिकीट काउंटरला. तिकिटाच्या रांगेत उभे असलेल्या राहुल गांधींना पाहून मुंबईकरांना त्यांच्या डोळयांवर विश्वास बसत नव्हता. 

अंधेरीवरून १२.५८ ची लोकल पकडून राहुल गांधींची स्वारी आता निघाली होती थेट वाघाच्या गुहेत म्हणजेच  शिवसेनेचा गढ असलेल्या दादरला. 

फर्स्ट क्लासमधून प्रवास करताना राहुल गांधी सामान्य मुंबईकरांशी संवाद साधत होते. त्यांचे प्रश्न जाणून घेत होते.   

राहुल गांधींच्या या गनिमी काव्यामुळे शिवसैनिक चांगलेच गांगरून गेले होते. राहुल गांधींच्या ठरलेल्या कार्यक्रमाचा अंदाज घेऊन शिवसैनिक काळे झेंडे दाखवण्यासाठी ठिकठिकाणी जमा झाले होते.

मात्र राहूल गांधींनी ऐनवेळेला केलेल्या बदलामुळं शिवसैनिकांची तारंबळ उडाली होती.

जिथं जिथं थोडेफार शिवसैनिक जमा होत होते त्यांना लगेच पोलीस उचलत होते.

दादरला आल्यानंतर प्लॅटफॉर्म बदलून राहुल गांधींनी घाटकोपरकडे जाणारी लोकल पकडली. आता मात्र राहुल गांधीनी धक्के देण्याची सिमाच पार केली होती.

राहुल गांधी थेट घुसले गर्दीने गचागच भरलेला लोकलच्या जनरल डब्यामध्ये.

गर्दीचे धक्के रोज खाणारा मुंबईकर आता मात्र या आश्चर्याच्या धक्क्याने भारावून गेला होता. घाटकोपरला उतरल्यानंतर राहुल गांधी थेट गाडयांच्या काफिल्यात रमाबाई नगरला पोहचले.

राहुल गांधींच्या दौऱ्याची देशभर चर्चा झाली होती. शिवसैनिकांच्या आंदोलनाचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नव्हता.  मात्र सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये मिसळणं, एटीएममधनं पैसे काढणं, लोकलनं प्रवास करणं हे राहुल गांधींचं शिवसेननं त्यांच्यावर केलेल्या ‘इटलीचा युवराज’ या टीकेला कृतीतून उत्तर दिलं  होतं असं राजकीय जाणकार सांगतात.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आंदोलनाचा मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेनेला फायदा होणार की राणा दाम्पत्याची सरशी होणार, हे आता पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.