भाजप म्हणतंय राहुल गांधींच्या हातात पक्षाची कमान द्या, आम्हाला फायदा आहे

कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेना म्हणून जिकडेतिकडे चर्चा चालू होती. तेवढ्यात एक बैठक झाली  आणि या बैठकीत सोनिया गांधी यांनी सद्या तरी मीच कॉंग्रेसचे नेतृत्व सांभाळत आहे.  सोनिया गांधींनी पक्षाच्या G-२३  नेत्यांना स्पष्ट संदेश दिलाय की, त्याच पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षा आहेत. सर्वांना वाटत होत कि, राहुल गांधी हेच पक्षाचे नेतृत्व म्हणून समोर येतील. पण असं झालं नाही. मग वाटलं प्रियांका गांधी ह्या पक्षाचं नेतृत्व करतील पण त्या अजून राजकारणात ‘मुरायच्या’ बाकी आहेत.

पण गेल्या काही काळापासून त्या अतिशय योग्य मुद्दे घेऊन भाजपवर निशाना साधत असल्याचं वारंवार आपण पाहत आलो आहोत. प्रियांका गांधी या सतत मोदींवर या न त्या कारणाने टीका करत असतात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रियंका गांधींना थेट उत्तर देण्यास टाळाटाळ करत असतात.  अलीकडेच लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणात प्रियांका गांधी यांनी मोदींवर टीका केलेली मात्र तेव्हाही मोदी शांत राहिले.

एकीकडे मोदिजी प्रियांका गांधी यांना उत्तर देत नाहीत मात्र ते राहुल गांधींना उत्तर द्यायला विसरत नाहीत. असं का ? मोदी जाणूनबुजून प्रियांका गांधींना उत्तर देऊन जनतेच्या दृष्टीक्षेपात आणत नाहीत.गांधी कुटुंबातील प्रियांका एकमेव अशा सदस्य आहेत ज्यांच्या टीकेला उत्तर देत नाहीत.

याचं कारण खूप स्पष्ट आणि तितकंच राजकीय आहे.

मोदींना प्रियांका गांधींना उत्तर देऊन ‘नेता’ बनवायचं नाही.

हो अशीच चर्चा सद्या राजकीय वर्तुळात चालू आहे. मागेच भाजपच्या एका खासदार नेत्याला माध्यमांनी विचारले कि, मोदिजी प्रियांका गांधी यांच्या टीकेला उत्तर का देत नाहीत. तर त्यांनी उत्तर असं दिलेलं कि, “मोदीजींनी प्रियंका गांधींना उत्तर देऊन त्यांना ते नेता का बनवतील ?” असो, त्यांच्या या उत्तराने भाजपाच्या आणि त्यातल्या त्यात मोदींच्या रणनीतीचा अंदाज आला कि, मोदींना प्रियंकावर शाब्दिक हल्ला करून त्यांचे राजकीय वजन वाढवायचे नाही.

आता दोघे बहिण भाऊ राजकारणात सक्रीय असल्यावर त्यांची तुलना तर होणारच ! 

काँग्रेसमध्ये आपल्या कुटुंबाचे वर्चस्व गाजवताना राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी या अधिक प्रभावशाली वाटतात असं सगळेच म्हणतात. पण प्रियांका याचं नेतृत्व पाहता भाजपला त्या जड जाऊ शकतात आणि म्हणूनच मोदींना राहुल गांधी हेच प्रतिस्पर्धी असावेत असं वाटतं.  मुख्य आव्हान म्हणून राहुल गांधी हेच उदयास यावेत अशी भाजपची इच्छा आहे. कारण त्यांना प्रियांका गांधी  परवडणार नाहीत असंही काही नेते म्हणत असतात.

पण राहुल गांधी हे नेतृत्व असणे भाजपसाठी कसं काय फायद्याचं असणार आहे ?

अलीकडेच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठक झाली आणि सोनिया यांनी G -२३ नेत्यांना दिलेल्या स्पष्ट संदेशात असं म्हणलं आहे कि, मीच सद्या कॉंग्रेस अध्यक्ष असणार आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या पुढील सप्टेंबरमध्ये जी अध्यक्ष पदाची निवडणूक होईल त्यासाठी काँग्रेस अध्यक्षपदावर परतण्याचा मार्ग मोकळा केला.

तुम्हाला हे लॉजिकच विचित्र वाटेल पण भाजपला राहुल गांधीच कॉंग्रेस चे नेतृत्व असावेत अशी मनोमन इच्छा आहे. २०१० पासून जेंव्हा मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची चर्चा सुरू झाली तेंव्हापासून निवडणूकीचे निकाल आणि याबाबतचे सर्व सर्वेक्षण असे सुचवतात की जेंव्हा राहुल गांधी मोदींच्या विरोधात मैदानात उतरतात, तेंव्हा मोदींना निवडणूक लढवणे सोपे जाते.

सारांश असा आहे की गेल्या दशकातील पुढील पंतप्रधान कोण ? या सर्वेक्षणांमध्ये लोकांच्या निवडीमध्ये राहुल गांधी मोदींच्याही मागे आहेत.

राहुल गांधी जेंव्हा पक्षाची कमान सांभाळतील तेंव्हा काय घडेल?

काही राजकीय तज्ञांच्या ,मते राहुल यांना पुढील काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडण्याच्या निर्णयाला त्यांच्या भाजपशी लढण्याच्या संदर्भातून पाहिले जाऊ नये. काँग्रेस पक्ष हा गांधी घराण्याच्या मुकुटातला एक हिरा आहे. आणि त्यांनी तो निर्विवादपणे ताब्यात ठेवला आहे, तर गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक सारख्या नेत्यांनी देखील पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हात टेकले आहेत.

आता पुढे काय होईल?

मे महिन्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी पाच सदस्यीय पॅनेलची स्थापना केली होती. गेल्या शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वजण त्या पुनरावलोकन अहवालाची वाट पाहत होते, विशेषत: राहुल यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये लढलेल्या निवडणूक अहवालाची.

पण तो अहवाल काय आलाच नाही. असो, त्याऐवजी, आता ज्या पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत त्या पक्षाच्या प्रभारींनी पक्षाच्या जिंकून येण्याची पुसटशी शक्यता वर्तवली आहे.  तृणमूल काँग्रेस मणिपूर आणि गोव्यात कॉंग्रेस पक्षाला नुकसान पोहोचवू शकते, असे त्यांचे आकलन होते. ममता बॅनर्जी कदाचित भरभराटीला येणार नाहीत, गेल्या काही आठवड्यांत या राज्यांमध्ये तृणमूल ज्या गतीने सक्रीय झाली आहे त्यामुळे पक्षाला आपण जिंकून येऊ काय अशी शंका आहे.

आता उत्तर प्रदेशचं बोलायचं झालं तर, पक्षाच्या प्रभारी प्रियंका यांनी कबूल केले की राज्यात पक्षाची जिंकून येण्याची संभावना खूप कमी आहे तरी सुद्धा त्या प्रयत्न करत आहेत, तसेच या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील असंही त्या म्हणत असतात. गेल्या २००७ पासून उत्तर प्रदेश ची कमान राहुल गांधीच्या हातात होती, आणि २०१९ पासून हीच कमान त्यांनी प्रियांका गांधीच्या हातात सोपवली आहे. पण तेंव्हा पक्ष विखुरलेल्या अवस्थेत होता. आधीच झालेले नुकसान भरून काढणे किती कठीण आहे हे फक्त आता प्रियांका गांधीच सांगू शकतात.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.