एका मुक्कामात राहूल गांधींनी काय साध्य केलं ?

बॅरिस्टर ए.आर. अंतुले तेव्हा राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे खासदार होते. नुकताच शरद पवारांनी पुलोदचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर राज्याच्या निवडणुका लागल्या. अंतुले दिल्लीच्या राजकारणात असल्याने त्यांना पाठबळ देखील मिळत होतं. आत्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं त्यांच स्वप्न होतं. 

निवडणुका जाहीर झाल्या. बॅरिस्टर अंतुले आणि प्रमिलाकाकी राज्याच्या संभावित उमेदवारांची यादी घेवून इंदिरा गांधींना भेटायला गेला. श्रीवर्धन मधून अंतुले यांच नाव यादीत असल्याचं इंदिरा गांधींना दिसलं. इंदिरांनी अंतुलेंना विचारलं तूम्ही तर राज्यसभेचे खासदार मग आमदार होण्यात काय इंटरेस्ट. आत्ता अंतुलेंना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलेलं हे इंदिरा गांधींना माहितीच होतं. तरिही इंदिरा गांधी म्हणाल्या, तूमचं नाव खोडा आणि तिथं तुमच्या पसंतीच्या उमेदवाराचं नाव टाका.

राज्याच्या निवडणुका झाल्या.अंतुले मुख्यमंत्री होणार नाहीत हा विश्वास प्रतिभा पाटील आणि वसंतदादा पाटील यांना मिळाला. कॉंग्रेस पक्ष बहुमतात आला आणि इंदिरा गांधींनी बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून केली.

आत्ता हा किस्सा सांगण्याचा संबध काय,

तर कालची राहूलभेट. राहूल गांधी काल महाराष्ट्रात आले. तसेही निवडणुकांचा मौसम सुरू झाल्यापासून राहूल गांधी फक्त चार पाच वेळाच महाराष्ट्रात आले आहेत. संपुर्ण भारतात मोदींची लाट रोखण्याच शिवधनुष्य उचलणारे राहूल गांधी आणि पर्यायाने कॉंग्रेस महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र यावेळी पुर्ण बॅकफुटवर राहिलेला आहे हे कोणिही सांगू शकते. कॉंग्रेसने महाराष्ट्रात दिलेली बाय ही नक्की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी आहे की भाजपसाठीच आहे हा प्रश्न पडावा इतपत राजकारण खेळण्यात आले. सनातन संस्थेची संबधित असणाऱ्या व्यक्तिस उमेदवारी, माझं कोण ऐकत नाही अशा आशयाचे अशोक चव्हाण यांचे वक्तव्य, एकनिष्ठता या एका निकषावर अगदी शेवटच्या क्षणी पुण्यातल्या जागेबद्दलचा निर्णय, कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजली जाणारी सांगलीची जागा सहज स्वाभिमानीसाठी मोकळी करणे असे कित्येक प्रकार पाहीले तर कॉंग्रेस नेमकं कुणाच्या फायद्याच राजकारण करणार आहे असाच प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागलेला. 

याच घडामोडीतला सर्वात मोठा भाग म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटलांमुळे कॉंग्रेस पक्षात कॉंग्रेसच काही चालत नाही हा थेट संदेश लोकांपर्यन्त पोहचला. विरोधी पक्षनेताच भाजपचा प्रचार करु लागल्यावर कॉंग्रेसकडून कोणत्या अपेक्षा ठेवायचा हा प्रश्न पडू लागला. 

हे झाले प्रश्न पण याचं नेमक उत्तर कोणालाच देता येत नव्हतं.

त्याच कारण हायकमांडच्या मनात नेमकं काय आहे याचा पहिला विचार कॉंग्रेस पक्षात केला जातो. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यापैकी नेमका आत्ता राज्याच्या राजकारणात कोण खेळणार आहे हेच स्पष्ट होतं नव्हतं. 

वरती जे उदाहरण दिलं ते हायकमांड आणि हायकमांड मार्फत वेगवेगळ्या राज्यातील नेतृत्व कशाप्रकारे हाताळलं जातं याबद्दल होतं. राज्यातली एकूण परिस्थिती बघितली तर सध्या महाराष्ट्रासारख्या राज्यात हायकमांडच्या समोरच मुख्य आव्हान हेच होतं. अशा वेळी राजकारणाचा वारसा घेवून जन्माला आलेल्या राहूल गांधीकडूनच अचूक सुचक आणि निवडक कार्यक्रम होणं अपेक्षित होतं. 

दिनांक २३ च्या अगोदर राहूल गांधी यांनी संमगनेरला सभा आयोजित केली असती तर त्याचा फायदा संग्राम जगताप यांना झाला असता, पण एका बाजूला शरद पवारांचा तिसऱ्या मोर्चावर वाढत जाणार प्रस्थ आणि दूसरीकडे भाजपचं आव्हान या लाटेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फायदा होवू न देण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं असावं अस वाटतं. त्याच वेळी विखे घराण्यासोबत आत्ता बास या धोरण लागू झालेलं त्यांना स्पष्टपणे दाखवून देखील द्याचं होतं, म्हणूनच विमानात तांत्रिक बिघाड असताना. मुक्कामाची कोणतिही व्यवस्था नसताना त्यांनी संगमनेरला जायचंच धोरण स्वीकारलं. 

आत्ता मुद्दा उरतो तो म्हणजे एकदा पराभवाचा रिझल्ट आल्यानंतर कॉंग्रेस हायकमांड महाराष्ट्रात कोणता निर्णय घेवू शकतो.

कालची भेट हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल असल्याची स्पष्ट कल्पना येते. एका दगडात दोन नेतृत्व निर्माण करण्याची स्किल राहूल गांधी यांनी कालच्या भेटीत साधलं. पहिले म्हणजे बाळासाहेब थोरात हे पुढे प्रदेशाध्यक्ष असतील, सत्ता आली तर मुख्यमंत्री असतील याहून अधिक त्यांच्याकडे धूरा जाईल. त्याचसोबत सत्यजित तांबे यांना या भेटीत देण्यात आलेला वेळ. 

आत्ता बाळासाहेब थोरातच का ? 

तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्लस पॉईन्ट आहे तो म्हणजे त्यांच्या राजकारणाची दिशा. संयत राजकारण हा एक प्रकार कॉंग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रात रुजवला. कॉंग्रेसी एकनिष्ठता साध्य करत असताना आपल्या वाट्यात जी पदे येतात त्यामध्ये खूष राहणं. व्यक्तिगत महत्वकांक्षा असताना देखील पक्षनेतृत्व, समांतर राजकारण न करण्याकडे अशा संयत राजकारणी लोकांचा भर राहिला आहे. त्यामध्ये सद्यस्थितीत बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नावे पुढे येतात. पृथ्वीराज चव्हाण यांचा मास बेस पाहता कधिही बाळासाहेब थोरात हेच नाव कॉंग्रेसला पूरक ठरणार आहे. 

दूसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्यजित तांबे का ? 

देशभर घराणेशाहीचा विरोधात राजकारण तापलेलं असताना महाराष्ट्रातील प्रस्थापित घराणेशाहीशी संबधित नसणारे नेतृत्व हे सत्यजित तांबे यांना पुढे घेवून जाणारं ठरू शकत. शरद पवार यांच्यानंतर सत्यजित तांबे यांनी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी थेट निवडणुकीचा सामना केला. निवडणुकीत पराभूत होवून देखील युवक कॉंग्रेस वाढवण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्याचेच फळ म्हणून ते आत्ता युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. 

देशभर मोदींना चोर म्हणण्या इतपत अॅग्रेसिव्ह राजकारण करण्याकडे राहूल गांधींनी भर दिलेला असताना महाराष्ट्र कॉंग्रेस शांतच होती अशा काळात मोदींच्या फोटोला काळे फासण्याचा आत्मघातकी ठरू शकणारा निर्णय सत्यजित तांबे यांनी घेतला. लोकांचा असंतोष पहाता त्यांचा हा निर्णय संयमित पण तितकच टोकदार राजकारण सत्यजित तांबे यांनी आखलं. मोदींच्या सभेला काळे झेंडे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दाखवण्यात आले.

हा झाला अॅग्रेसिव्ह पणा जो आज राहूल गांधींसाठी आवश्यक ठरणारा आहे पण त्याच सोबत पक्षासाठी असणार संयमित नेतृत्व दाखवत असताना सत्यजित तांबे यांनी ज्या उमेदवाराकडून पराभूत झालो अशा संग्राम जगताप यांनाच उघडपणे पाठिंबा व्यक्त केला. हा पाठिंबा वास्तविक त्यांचा राजकारणातला मॅच्युअरपणा दाखवणारा ठरला. शिवाय एकाच मामा-भाचे हे कौटुंबिक संबध असून देखील कोणतेही हेवेदावे निर्माण न होता, बाळासाहेब थोरात नेहमीच सत्यजित तांबे यांच्या पाठिमागे आपली संपुर्ण ताकद उभा करताना आजपर्यन्त दिसून आलेच आहेत.

साहजिक या गोष्टींच्या बळावर सत्यजित तांबे यांच्याइतका दूसरा चेहरा राहूल गांधींना जवळचा वाटणार देखील नाही. 

एका मुक्कामात राहूल गांधींनी नेमकं काय साध्य केलं ? 

आजवर कॉंग्रेस आणि गांधी घराणे व महाराष्ट्रातले राजकारणी हे संबध दिल्लीत गेल्यानंतर त्यांना मिळणारी प्रतिष्ठा इतपर्यन्तच मर्यादित होत्या. राहूल गांधी थेट घरी उतरतात. सत्यजित तांबे यांच्या पत्नीच्या वाढदिवस कार्यक्रमात सामिल होतात. त्यांच्या लहान मुलींसोबत गप्पा मारतात याप्रकारचे गांधी कुटूंब आणि महाराष्ट्रातल्या इतर राजकीय नेत्यांच्या कुटूंबाचे संबध कधीच पाहण्यात आले नाहीत. मात्र राहूल काल ज्याप्रमाणे थोरात-तांबे यांच्यासोबत त्यातून एक वेचक आणि निवडक राजकारणाच्या दिशेने महाराष्ट्र कॉंग्रेसला घेवून जावू इच्छितात हेच दिसून येते. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.