९७ वर्षांपूर्वी इंग्रजांनी पुणे स्टेशन उभं केलं आणि शहराच्या प्रगतीला फुल स्पीड मिळाला !

पुणे म्हणजे फक्त मध्यमवर्गीय पेठा एवढीच व्याख्या करून त्याबद्दल भरपूर बोललं गेलं, लिहिलं गेलं.

पण त्यापलीकडेही पुणे आहे जिथे एक विशिष्ठ संस्कृती नांदते, मात्र याकडे सगळेच दुर्लक्ष करतात.

पुणे हा फक्त इथल्या पुणेकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मंडळीचा देखील तितकाच  जिव्हाळ्याचा विषय आहे. पुण्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं तर हा इतिहास पुण्याबाहेरच्या लोकांना देखील माहिती आहे. अगदी लहानपणापासूनच इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला पुणे भेटत आलं आहे.

कारण पुणे जिल्ह्याचा परिसर म्हणजे शिवाजी महाराजांची जन्मभूमी- कर्मभूमी.

पुण्यात आणखी एक वास्तू जी संपूर्ण देशाशी पुण्याला जोडली जाते ती म्हणजे पुण्यातलं रेल्वे स्टेशन. याच पुणे रेल्वे स्टेशनला आज ९७ वर्ष पूर्ण झाली आहेत. हेरिटेज स्ट्रक्चरचा दर्जा मिळालेल्या स्टेशनला देखील काही इतिहास आहे कारण हे रेल्वे स्टेशन बांधलंय इंग्रजांनी !

असं म्हणलं जातं, पुण्याच्या विकासाची सुरुवात साधारणपणे १६१० ते १६६० या काळात झाली आहे. मात्र या नंतर कित्येक वर्षांनी पुण्यात रेल्वे आली, आणि येथी रेल्वे स्थानक उभा राहिलं ते ब्रिटीशांमुळेच! मुंबई-ठाण्याखालोखाल पुणे स्टेशन हे राज्यातील सर्वात जुने स्टेशन मानलं जातं.

ब्रिटीशांनी भारतात रेल्वे आणली मात्र त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे, कापसाची वाहतूक.

इंग्रज भारतात आले आणि त्यांच्यासाठीच म्हणून त्यांनी इथे काही आधुनिक सोई-सुविधेची पाळेमुळे रोवायला सुरुवात केली. इंग्रजांनी येथील एक-एक करून सगळ्या बाजारपेठा काबीज करायला सुरुवात केली.  यासाठी त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतूकीसाठीचे पर्याय उभे करायचे होते.

मुंबई, जळगाव सारखीच पुणे देखील एक मोक्याची बाजारपेठ आहे हे इंग्रजांनी हेरलं.

कापूस व्यापार हा ब्रिटीश राजवटीसाठी सर्वात जास्त पैसा मिळवून देणारा होता आणि याचा फायदा घ्यायचा असेल तर भारतात रेल्वे आणली पाहिजे जेणेकरून या कापसाची वाहतूक करता येईल. कारण मुंबईमार्गे रस्त्याने वाहतूक करणे व्यावहारिक तर नव्हतं आणि सोपंही नव्हते.

याला एकच उपाय होता तो म्हणजे रेल्वे वाहतुकीसाठी पर्याय उभा करणे.

आणि मग त्यांनी इथे पुण्यात बस्तान बसवलं आणि रेल्वेसाठी देखील प्रयत्न चालू केले. इंग्रजांच्या प्रयत्नामुळे ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीद्वारे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या रेल्वे मार्गावर भारतातील पहिली प्रवासी गाडी धावली.

एक साधारणसं पुणे रेल्वे स्थानक १८५८ मध्येच उघडलं होतं. पळसदारी खंडाळ्याला जोडणारा भोर घाट मार्ग १८६२ मध्ये पूर्ण झाला ज्यामुळे मुंबई व पुणे जोडले गेले. आणि वाहतूक वाढायला लागली, प्रवासी वाढायला लागले.

आणि मग इंग्रजांनी सध्याची जी पुणे रेल्वे स्टेशनची इमारत आहे ती १९२५ साली बांधली.

सर्वप्रथम ब्रिटिशांनी १९१५ मध्ये रेल्वे स्थानकाचा आराखडा तयार केला. त्यासाठी वास्तुविशारद पी. विल्सन यांना कामाला लावले गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९२५ मध्ये पुणे रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले. आणि याच्या उद्घाटनाला मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांना बोलावण्यात आलं होतं. त्याकाळात या स्थानकाच्या उभारणीसाठी ५ लाख ७९ हजार रुपये खर्च आला होता.

भारतातात रेल्वे आणणं आणि त्यात पुण्यात स्थानक उभारणं हे ब्रिटिश राजवटीची हि एक मोठी कामगिरीच म्हणावी लागेल.

आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस सुरु झाली याच स्थानकात तसेच व पुणे- मुंबई लोहमार्गाचे विद्युतीकरण ही देखील याच स्टेशनची देणगी आहे.

इंग्रजांनी बांधलेल्या या पुणे स्टेशनचा काळानुसार विस्तार होत गेला. मात्र जागेची कमतरता असल्यामुळे स्टेशनच्या विस्तारीकरणाला मर्यादा येत आहेत. याला पर्याय म्हणून आता हडपसर रेल्वे स्थानक विकसित करण्यात येत आहे.

२० वर्षांपूर्वीच या पुणे स्टेशनला, मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविण्यात आले होते.

आज या या रेल्वे स्टेशनवरून रोजच्या २२५ गाड्या धावतात, तसंच दररोज दोन लाखांच्या पेक्षा अधिक लोकांची ये-जा असते. मात्र मागील दीड वर्षापासून हे स्थानक ओस पडले आह, कडक निर्बंधाच्या  काळात देखील प्रवासी रेल्वे वाहतुकीचा चा मार्ग अवलंबवतांना दिसून आले आहेत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.