शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पवित्र भूमी रायरेश्वर !!

आपल्याला इतिहास कळाला तो शालेय पाठ्यपुस्तकातून. शिवाजी महाराज नाव उच्चारलं तरी, चटकन डोळ्यांसमोर चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावरील शिवाजी महाराजांचं चित्र येतं. हिरकणीची कविता आठवते. शाहिस्तेखानाची केलेली फजिती, अफझल खानच्या वधाचा पराक्रमही आठवतो.

याचसोबत आणखी एक गोष्ट म्हणजे बालशिवाजीने आपल्या सवंगड्यांच्या सोबत घेतलेली स्वराज्याची शपथ. 

शिवशंभूच्या मंदिरात २६ एप्रिल १६४५ या दिवशी अवघ्या १६ वर्षाच्या बाल शिवरायांनी बारा मावळातील आपल्या सवंगड्यासह हिंदवी स्वराज्याची आण घेतली. काही जण म्हणतात की ही शपथ महाराजांनी रोहीडा किल्ल्यावर घेतली मात्र इतिहास तज्ञांच म्हणण आहे की ते ठिकाण म्हणजे रायरेश्वर गड.

“काय कमी रायरेश्वरा तव असल्यावर आधार

उचलतो म्हणुनी बेलभांडार !”

समुद्रसपाटीपासून तब्बल १४०० मीटर उंचीवर रायरेश्वर किल्ला वसलेला आहे.

पाचगणीच्या टेबललॅन्ड पेक्षाही मोठ्ठ आणि उंच टेबललॅन्ड म्हणजे रायेश्वराचं पठार. कोरलेपासून अस्वलखिंडीपर्यंत पूर्व-पश्चिम पहुडलेल्या या रायरेश्वर पठाराची लांबी ६ किमी सहज भरेल. सर्व बाजूंनी ताठ, खोल कडे असल्यामुळे रायरेश्वर-डोंगराला निसर्गसिद्ध दुर्गमता लाभली आहे. डोंगराच्या अवाढव्यतेमुळे चढण्यासाठी एकूण सहा वाटा आहेत. या सर्व वाटा दुर्गम आहेत.

शिवरायांनी ज्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतल्याचं सांगितलं जातं त्या शंभूमहादेवाच्या मंदिराव्यतिरिक्त पठारावर बघण्यासारखं काहीच नाही. पण मंदिरातील शांत वातावरण आणि सभोवतालचा निसर्ग मनाला प्रसन्न करतात. शिवाय पठारावरून दिसणारा खालचा परिसर नयनरम्य असतो. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.

958ba462 7367 11e7 a55a ab3ca1304be3

घडलेला इतिहास सिनेमाच्या स्क्रीनवर जितका सुंदर दिसतो त्याहून अधिक सुंदर प्रत्यक्ष घडलेल्या ठिकाणी गेल्यावर दिसतो आणि अनुभवायला देखील मिळतो.

पुण्याहून रायरेश्वराला जायचं असेल तर आधी भोरला यावं. मग तिथून १२ किमीवर असणाऱ्या आंबवडे गावातून जाणे इष्ट ठरते. इथच नागेश्वराच सुंदर मंदिर आहे. वाटेत पंतचिव शंकराजी नारायणजी यांची समाधी आहे. ज्या कारी गावातून पठारावर जाता येत तिथे कान्होजी जेधे यांचा भव्य वाडा होता. पण तो आता इतिहासजमा झाला आहे.

पण तिथे असलेल्या पूर्वीच्या काळातील सुबक मूर्ती गतवैभव दाखवितात. येलबूर्ग्याच्या लढाईत हुसेनखानाविरुद्ध लढताना कारीचा एक तरणाबांड तारा निखळला होता. त्यांचं नाव नागोजी जेधे. त्यांची वीरपत्नी कारीला सती गेली. तिचे वृंदांवन आजही तेथे दृष्टीस पडते.

कारीची अशी कितीतरी स्फुल्लिंगे हिंदवी स्वराज्याच्या कामी आली असतील की ज्यांच्या समाध्या उपलब्ध नाहीत. असे हे कारी आणि त्याच्या पाठीशी उभा भव्य रायरेश्वर.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. DATTA BHOSALE says

    Nice information 👌👌👌👍😊

Leave A Reply

Your email address will not be published.