लता मंगेशकरांचा स्पेशल फ्रेंड!!

असं म्हणतात की लता मंगेशकर ही एक चमत्कार आहे. सुरांच्या दुनियेतील चमत्कार. त्यांच्या सारखं दुसर कोणी झालच नाही. त्यांच्या स्वभावात गुणदोष असतील, कोणाशी त्यांचे वाद असतील पण त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की लता मंगेशकर यांनी भारताच्या संगीतक्षेत्रावर राज्य केलं. साधसुध नाही  जवळपास पंचाहत्तर वर्ष त्या साम्राज्ञी म्हणून वावरल्या. आजही त्याचं ते स्थान कोणी हलवू शकलेल नाही.

खूप लहान वयात असताना त्यांना हे यश मिळालं. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबप्रमुखाची जागा घेऊन त्यांनी घर संभाळल. आपल्या चारही भावंडांची काळजी घेतली. त्यांना आपल्या पावलावर उभ केलं. हे करताना त्यांना स्वतःसाठी कधी वेळच देता आला नाही. प्रत्येकवेळी कुटुंबियांना महत्व दिल. यातूनच त्यांनी कधी लग्न केलं नाही. 

फिल्मइंडस्ट्री सारख्या बदनाम जगात वावरूनही त्यांच्याविषयी कधी काही दबक्या आवाजातल्या अफवा पसरल्या नाहीत. कधी गॉसिपगप्पांमध्ये त्यांचे लिंकअप्स जोडले गेले असं कधी दिसल नाही.

याचा अर्थ लता दीदींच्या मनात कधी लग्नाचा विचार आलाच नाही असं नाही. असं म्हणतात की एक व्यक्ती होती ज्यांच्याशी त्यांची मैत्री एवढी घट्ट होती की त्यानी कधी लग्न केलं असत तर त्यांच्या सोबतच केलं असत.

त्याचं नाव राजसिंग डुंगरपूर!!

राजस्थानचं डुंगरपूर संस्थानचे हे राजकुमार. मेवाडच्या बाप्पा रावळच्या राजपूत घराण्याचे वारसदार. लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. फास्टर बॉलर म्हणून त्यांनी चांगलच नाव कमावल होतं. राजस्तानकडून त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटही खेळले. जवळपास ८६ मचेस मध्ये दोनशेच्या वर विकेट्स घेतल्या.

वकिलीच्या शिक्षणासाठी म्हणून ते मुंबईला आले होते. तेव्हा क्रिकेटची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती. फेमस क्रिकेटर दिलीप सरदेसाई यांच्या भावाने त्यांची ओळख वाळकेश्वरमधल्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांशी करून दिली. यातच होता बाळ उर्फ हृदयनाथ मंगेशकर. लता दीदींचा लाडका भाऊ. राजसिंह सुद्धा आपल्या बहिणीकडे राहायचे. ते रोज हृद्यनाथ यांच्याकडे खेळायला जाऊ लागले. 

टेनिस बॉलवर खेळल्या जाणाऱ्या त्या क्रिकेटसामन्यातून दोघांची दोस्ती एकदम घट्ट झाली. हृदयनाथकडून राज यांचं सारखं नाव ऐकू येऊ लागल्यावर लता दिदींनी त्यांना सांगितलं की,

“तुझ्या मित्राला एक दिवस चहा साठी तरी घरी बोलव.”

राजसिंह एका मुलाखतीमध्ये सांगतात की ते पावसाळ्यातले दिवस होते. जेव्हा हृदयनाथच्या घरीवाळकेश्वरच्या एका चाळीत गेले तेव्हा तिथे त्यांची लता मंगेशकरशी पहिली भेट झाली. लता त्याही काळात खूप बिझी असायच्या. रेकोर्डिंग, गाणी यातच त्यांचा दिवस संपायचा, पण हृदयनाथचा मित्र येणार म्हणून त्या घरीच थांबल्या होत्या.

लता दीदींना क्रिकेट खूप आवडत. राजसिंह यांच्याकडे सांगायला क्रिकेटचे खूप किस्से होते. अख्खं मंगेशकर कुटुंब क्रिकेटसाठी वेड आहे.त्या सगळ्यांना गप्पा मारताना हा सुसंस्कृत तरुण खूप आवडला. राजनां सोडायला म्हणून लतादीदी खाली आल्या. तेव्हा पाऊस सुरु होता. पावसात घरी कस जाणार म्हणून त्यांनी राजना आपली कार दिली.

परत थोड्याच दिवसात राजसिंह आणि त्याच्या भावाला नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने घरी जेवायला बोलवलं. यानंतर राज याचं त्यांच्या घरी येणंजाणं सुरु झालं. मंगेशकर कुटुंबाचे एक अविभाज्य घटक बनून गेले

हृदयनाथ सोबतच समवयस्क असल्यामुळे लता मंगेशकरशीदेखील त्यांचं मित्रत्वाच नात निर्मान झालं. राजसिंह नेहमी कबूल करायचे की,

 “आमची फ्रेंडशिप खूप घट्ट निर्माण झाली होती. मला लता आवडायची आणि तिलाही मी आवडत असेन. फक्त मैत्रीची बंधने तोडून लग्नही आम्ही केलं असत. पण आम्ही दोघेही आपल्या कुटुंबीयाच्या खूप जवळचे होते. हे सगळे पाश सोडून येणे आम्हाला दोघानाही जमले नाही.” 

असं म्हणतात की राजसिंह यांच्या घरच्यांनी त्यांना अट घातली होती की लग्न केलं तर फक्त राजघराण्यातल्या मुलीशी करायचं. लताच्या घरची परिस्थिती अशी होती की तीच घर तिच्याच कमाईवर सुरु होतं. घरच्यांच्या इच्छेबाहेर जाऊन लग्न करणे त्यांना जमलं नाही. पण आयुष्यभर ते खास मित्र राहिले. दोघांनीही कधी कोणाशीच लग्न केलं नाही. ते सिंगलच राहिले.

राजसिंह पुढे जाऊन बीसीसीआयच्या निवडसमितीचे अध्यक्ष झाले. त्यांनीच सोळा वर्षाच्या सचिन तेंडूलकरला पाकिस्तानला जाणाऱ्या भारतीय टीममध्ये निवडून एका वादळाला पहिला चान्स दिला होता.

ते काही काळ भारतीय टीमचे मॅनेजर देखील होते. पुढे तर बीसीसीआयचे अध्यक्षदेखील झाले.भारतीय क्रिकेट मॅनेजमेंटमधील त्यांचं स्थान खूप मोठ आहे. एवढ असूनही ते गाण्याच्या बाबतीत औरंगजेब म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना गाण समजायचं नाही पण कायम गाडीमध्ये खिशातल्या वॉकमनमध्ये लताची गाणी वाजत असायची, त्यात खंड नव्हता.

बऱ्याचदा लंडनमध्ये असताना वगैरे त्यांची आणि लता मंगेशकर यांची भेट व्हायची. एकदा दोघे फिरायला गेले होते. घरी परतले तोवर खूप उशीर झाला. रात्रीचे साडे अकरा वाजले असतील. लता दीदींनी अपार्टमेंटच दार उघडल तोवर फोनची रिंग वाजत होती. त्यांनी फोन उचलला. लाडकी भाची रचना होती. तिने काही तरी सांगितलं लतादिदींच्या तोंडून एकच उद्गार निघाला,

“वा !!”

राजसिंहनी त्यांना विचारल की काय झालं? त्यावर लतादीदी म्हणाल्या,

 “रचना म्हणतीय मला भारतरत्न जाहीर झालाय.”

राजसिंह चाट पडले. एकदम सहज साधेपणाने त्या ही मोठी बातमी सांगत होत्या. रात्रभर अभिनंदनासाठीचे फोन खणखणत होते. दुसऱ्या दिवशी राजसिंहनी दोघांना चहा बनवला. चहा पिता पिता त्यांनी लता दीदींना विचारल की भारतरत्न बनल्यावर कस वाटतय?

तेव्हा त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या,

“हे तुम्ही आता विचारताय होय? खूप मस्त वाटत आहे.”

पुढे काहीच वर्षांत वयोमानाने राजसिंह याचं निधन झालं. पण अखेरच्या क्षणापर्यंत दोघांनी मित्रत्वाच नात अबाधीत ठेवलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.