पोलिसांनी त्या तरुणीची फोन हिस्ट्री चेक केली आणि राज बब्बर प्रकरणात अडकले…

स्मिता पाटील या अभिनेत्री विषयी मनात अपार आदर आणि प्रेम. ही अभिनेत्री जेव्हा बॉलिवुड गाजवत होती तेव्हा आमचा जन्म झाला नव्हता. परंतु कळत्या वयात स्मिता पाटील विषयी एक आत्मीयता वाटू लागली. अवघ्या ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने इतकं काम करून ठेवलं आहे, की त्याची गणतीच नाही. एक अभिनेत्री म्हणून तिने निवडलेले सिनेमे तिच्या स्पष्ट विचारांची ओळख करून देतात. स्मिता पाटीलने राज बब्बर बरोबर लग्न केलं. राज बब्बर यांनी अभिनेता म्हणून तसं बॉलिवुडमध्ये संमिश्र यश संपादन केलं.

स्मिता पाटीलने राज बब्बर यांना स्वतःचा लाईफ पार्टनर म्हणून निवडलं. त्यामुळे या माणसाविषयी सुद्धा मनात एक कुतूहल आहे.

कलाकार जेव्हा सिनेमात यशस्वी होतो, तेव्हा त्याचे असंख्य फॅन्स निर्माण होतात. कलाकारावर प्रेम करणारे हे चाहते अक्षरशः त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. राजेश खन्ना यांच्या फॅन्स विषयी असलेल्या दंतकथा आपण सर्वांनीच ऐकल्या आहेत. राज बब्बर सुद्धा जेव्हा बॉलिवुडमध्ये यशस्वी होते, तेव्हा त्यांना सुद्धा चाहत्यांचं प्रेम अनुभवायला मिळालं. परंतु एका फॅन मुळे राज बब्बर यांना तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली होती. जाणून घेऊ, नेमका काय होता हा किस्सा.

ही गोष्ट तेव्हाची जेव्हा राज बब्बर यांनी राजकारणात प्रवेश घेतला होता. १९८९ साली व्हि. पी. सिंग सरकारला पाठिंबा देण्यासाठी राज बब्बर राजकारणाच्या मैदानात उतरले होते. प्रचारसभांच्या निमित्ताने राज बब्बर यांचं अनेक ठिकाणी फिरणं व्हायचं. याच दरम्यान एके ठिकाणी राज बब्बर दौऱ्यावर असताना तिथे असणारी एक तरुणी राज बब्बर यांची मोठी चाहती होती. ती काही ना काही कारणं शोधून राज बब्बर यांच्याशी बोलायचा प्रयत्न करायची.

आसपास प्रेम करणारे चाहते असले, तर एखाद्या कलाकाराला समाधान वाटणारंच. राज बब्बर यांनाही तसा आनंद झाला.

राज बब्बर यांनी दौरा संपवून पुन्हा त्यांच्या रूटीनला सुरुवात केली. १९९० साली राज बब्बर राजकारण आणि अभिनय अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी करत होते.

हा काळ लॅंडलाईन फोनचा होता. एके दिवशी राज बब्बर यांचा लॅंडलाईन फोन खणाणला. त्यांनी फोन उचलला. तर पलीकडून राज बब्बर यांची मोठी फॅन असलेली तिच तरुणी होती. सुरुवातीला राज बब्बर यांना आश्चर्य वाटले. कारण तिने राज बब्बर यांचा लॅंडलाईन नंबर शोधून काढला होता. परंतु फॅन असल्यामुळे तिचं मन दुखावणं राज बब्बर यांना अयोग्य वाटलं. म्हणून थोडावेळ का होईना ते तिच्याशी फोनवर बोलले.

तो दिवस संपला. परंतु राज बब्बर यांच्या या फॅन ची मजल इतकी होती की, राज बब्बर जिथे असतील तिथे ती त्यांना फोन करायची. आत्ता ती नंबर कसे शोधायची, हे तिचं तिलाच माहीत. सध्या मोबाईलवर आपल्याला फोन कोणी केलाय ते कळतं. लॅंडलाईनवर ती मुभा नाही. त्यामुळे अनेकदा राज बब्बर यांना तिच्याशी बोलावे लागायचे.

राज बब्बर आणि त्यांच्या या मोठ्या फॅन च्या कहानी मध्ये ट्विस्ट आला.

NCB अधिकाऱ्यांनी राज बब्बर यांची मोठी फॅन असलेल्या या तरुणीला अटक केली. कारण ती एक ड्रग डीलर होती. तिला अटक करुन पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. तेव्हा तिने सर्वात जास्त फोन राज बब्बर यांना केले आहेत, हे पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी राज बब्बर यांना बोलावले. झालेली सर्व हकीगत त्यांनी राज बब्बर यांना सांगितली.

“ती माझी फॅन आहे, यापलीकडे माझा आणि तिचा काही सबंध नाही. आणि ही वारंवार फोन करून मला त्रास द्यायची. त्यामुळे तुम्ही तिला अटक केली हे एका दृष्टीने चांगलंच झालं आहे.”

असा खुलासा राज बब्बर यांनी केला. ड्रग सारखं मोठं प्रकरण होतं. त्यामुळे खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी राज बब्बर यांचा फोन रेकॉर्ड चेक केला. तेव्हा राज बब्बर यांनी त्या तरुणीला एकदाही फोन केला नसल्याचे आढळून आले. सर्व चौकशी करून राज बब्बर यांची या प्रकरणातून मुक्तता झाली.

तुम्ही कोणाचेही मोठे फॅन असाल तरीही कलाकाराच्या व्ययक्तीक आयुष्यात ढवळाढवळ करणं हे चुकीचं आहे. राज बब्बर यांच्या फॅनने हीच मर्यादा ओलांडली. परंतु फॅन च्या या आगाऊपणा मुळे राज बब्बर यांना जेलची हवा खायला लागली असती एवढं मात्र नक्की…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.