राज कपूर तिच्या अंतयात्रेत सर्वात पाठीमागे चालत होता.

साल १९४८ चं होतं. राज कपूरच वय २२ वर्ष. राज कपूरने तोपर्यन्त एकही सिनेमा दिग्दर्शीत केला नव्हता. त्याला एक सिनेमा करायचा होता. आपल्या पहिल्याच पिक्चरसाठी त्याला एक स्टुडिओ पाहीजे होता. 

तेव्हा त्याला कळालं जद्दनबाई एका फेमस स्टुडिओत रोमियो आणि ज्युलिएटचं शुटिंग करत आहे. राजकपूरला त्या स्टुडिओत कोणत्या सुविधा आहेत त्याची माहिती हवी होती.

तो जद्दनबाईच्या घरी गेला. 

तेव्हा एका मुलीने दरवाजा उघडला. तिच्या हाताला बेसन लागलं होतं. तोच हात तिने आपल्या केसांना लावला. केसांमध्ये अडकलेल्या बेसनाकडे तो पाहू लागला. ती मुलगी जद्दनबाईची पोरगी होती. तिच नाव नर्गिस. नर्गिसच्या नावावर तेव्हा आठ सिनेमे होते. तेव्हा तिच वय होत वीस वर्ष. 

पुढे खूप वर्षानंतर बॉबी रिलीज झाला तेव्हा बॉबी सिनेमात राज कपूरने हाच सिन घेतला.

राजकपूर आणि नर्गिसची प्रेमकथा म्हणजे एक दंतकथा आहे. कोणी कोणाला वापरून घेतलं ते कधिच कळत नाही. सांगणारे सांगतात, नर्गिसचे खूप हाल झाले. बाकीचे लिहतात नर्गिस गेल्यानंतर राज कपूर स्वत:ला सिगरेटचे चटके द्यायचा. त्याला पटत नव्हतं की नर्गिस आपणाला सोडून गेली. नर्गिसच्या अंतयात्रेत तो काळा गॉगल घालून तो सर्वात शेवटी राज कपूर चालत होता. लोकांनी त्याला पुढे येण्याची विनंती केली पण राजकपूर मागेच राहिला. 

राजकपूरचा पहिला पिक्चर येणार होता आग. त्या पिक्चरसाठी राज कपूरने नर्गिसला घ्यायच ठरवलं. पण नर्गिसच्या आईने सांगितलं की तिच नाव कामिनी कौशल आणि निगार सुल्ताना यांच्या वरती हवं. तिला मानधन म्हणून दहा हजार हवेत. राज कपूरने ते मान्य केलं. सिनेमाला सुरवात झाली आणि तिच्या आईने मानधनाची रक्कम ४० हजार केली. राज कपूरने ती देखील मान्य केली. 

नर्गिसला तोपर्यन्त समजून गेलं होतं की, राज कपूर तिच्या प्रेमात आहे. पण इथे  राज कपूरचं टायमिंग चुकलं होतं. नर्गिस आणि राजकपूरच्या पहिल्या भेटीच्या अगोदर चार महिन्यांपुर्वीच राजकपूरच लग्न झालं होतं. 

त्यांच्या वाढत्या मैत्रीमुळे कपूर घरात देखील वादळ निर्माण होण्याची चिन्ह होती. आग सिनेमाच्या वेळी वाढत गेलेली जवळीक पाहून सिनेमाच्या सेटवर खुद्द तिची आई येवू लागली. 

आग नंतरचा सिनेमा होता बरसात. राज कपूरला या सिनेमाचं शूटिंग काश्मिरमध्ये करायचं होतं. पण नर्गिसच्या आईने त्यासाठी परवानगी दिली नाही. राज कपूरने महाबळेश्वरला काश्मिर केलं आणि शुटिंग पुर्ण केलं. पृथ्वीराज कपूरने राज कपूरला समजवण्याचा प्रयत्न केला पण राज कपूरवर काहीच फरक पडत नव्हता. 

वेळ गेला आणि आवारा शूटिंगला आला. तोपर्यन्त नर्गिसच्या आईचं निधन झालं. त्यानंतर हे दोघं मोकळेपणाने भेटू लागले. बरसात सिनेमा संपता संपता सुरू झालेलं हे प्रेम प्रकरण आवाराच्या वेळी अस्मानावर होतं. 

या काळात नर्गिस आणि राजकपूर हे वेगळे नव्हते. नर्गिस आर.के. स्टुडिओतच ती थांबून असायची. इतकं की जेव्हा आर.के. स्टुडिओ अडचणीत आला तेव्हा नर्गिसने तिच्या हातातल्या बांगड्या विकल्या. आपला पैसा, आपलं भविष्य तिने पुर्णपणे आर.के. स्टुडिओसाठी अर्पण केलं. ती हे सगळं राजकपूरसाठी करत होती आणि तेव्हाच राजकपूर म्हणाला होता, 

मेरी बिबी मैरी बच्चों की मॉं हैं, लेकिन मेरी फिल्मो की मॉं तो नरगिस हैं. 

तिच्या झोकून देण्याची किंमत फक्त राजकपूरने सिनेमापुरती मर्यादित ठेवली होती. राजकपूर तिला वापरून घेत असल्याबद्दल अनेकांनी लिहलं. याउलट देवानंद आपल्या आत्मचरित्रात लिहतात की, 

आम्ही रशियात सहा आठवडे होतो. ते एकत्रच रहायचे. राज कपूर दारूच्या आहारी गेलेला असायचा. कधीकधी त्याला उठता देखील येत नसायचं. नर्गिस हे सगळ सावरायची. नर्गिसला घेवूनच राज कपूर प्रत्येक ठिकाणी जायचां.

हळुहळु राज कपूरने आपलं हे नातं मान्य करावं हि इच्छा नर्गिसची देखील जागी झाली. 

पण राजकपूर तिच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हता. मधु जैन यांनी लिहलं आहे की, नर्गिसने तेव्हा मोरारजी देसाईं यांचा सल्ला देखील घेतला होता. कायदेशीररित्या राजकपूरसोबत लग्न करण्यासाठी कोणत्या अडचणी येवू शकतात त्याची माहिती तिला हवी होती. 

पण राज कपूरच्या मनात लग्नाची गोष्ट नव्हती. राज कपूर आणि नर्गिसमध्ये पहिल्यासारखी केमिस्ट्री राहिली नाही हे नर्गिसकडे पाहूण जाणवतं होतं. तशा चर्चा होवू लागल्या होत्या. राज कपूरने खूप वर्षांनंतर दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. नर्गिस मला विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नव्हती. मी तिला एका सिनेमात काम करण्यास सांगितलं होतं पण म्हाताऱ्या व्यक्तिची भूमिका का करायची म्हणून ती नाही म्हणाली. आणि दूसऱ्याच दिवशी तीने मदर इंडिया साईन केला होता. 

मदर इंडियाच्या सेटवरच तिच्या आयुष्यात सुनिल दत्त आला. सुनिल दत्त तिच्या प्रेमात पडला. ती सुनिल दत्तच्या प्रेमात पडली आणि पुढचा मागचा विचार न करता त्यांनी लग्न केलं. मदर इंडिया रिलीज होईपर्यन्त हि गोष्ट लपवून ठेवण्यात आली. कारण सुनिल दत्त या सिनेमात नर्गिसच्या मुलाचा रोल करत होता. 

जेव्हा त्यांच्या लग्नाची गोष्ट राज कपूरला बसली तेव्हा तो त्याच्यासाठी मोठा धक्का होता. राज कपूर आणि नर्गिसची हि गोष्ट संपली ती तिच्या अंतयात्रेतच. तेव्हा राजकपूर तिच्या अंतयात्रेत सर्वात पाठीमागे चालत होता. 

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.