आपल्या आयुष्यातले प्रसंग पिक्चरमध्ये वापरण्याची कला फक्त राज कपूरलाच जमली…

हिंदी सिनेमाच्या बेपत्ता युगात भटकताना अनेक गाण्यांच्या मेकिंगच्या कथा मनाला आज देखील आकर्षित करतात. ‘आरके’ या चित्र संस्थेच्या ऐंशीच्या दशकातील प्रेम रोग या चित्रपटातील एका गीताचा किस्सा हा असाच भन्नाट आहे.

 १९७८ साली आरके चा ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गाणी पंडित नरेंद्र शर्मा, विठ्ठल भाई पटेल आणि आनंद बक्षी यांनी लिहिली होती. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. राज कपूर यांनी आपल्या पुढच्या चित्रपटासाठी याच टीमला रिपीट करायचे ठरवले. 

बाल विधवा विवाह या तशा कालबाह्य झालेल्या परंपरेवरील हा चित्रपट आर के संस्थेचा ‘प्रेम रोग’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. 

या चित्रपटात राज कपूर यांना नायिका लग्न होण्यापूर्वी आपल्या माहेरच्या अंगणात एक गीत गाते अशा सिच्युएशन वर गाणे हवे होते. यात नायिका लहान, अल्लड असते . लग्न/विवाह/ससुराल/पती याचे तिला काहीही माहित नसते. लग्न झाल्यावर फक्त दुसऱ्या घरी जाणार एवढेच तिला ठावूक असते. राज कपूर यांनी पंडित नरेंद्र शर्मा यांना गाण्याची सिच्युएशन सांगितली आणि गाणी लिहून द्यायला सांगितले. परंतु नरेंद्र शर्मा यांनी नम्रपणे ‘माझ्या ऐवजी संतोष आनंद हे गाणे चांगल्या पद्धतीने लिहू शकतील’ असे सांगितले. तो काळ निरोगी मैत्रीचा होता. मोठ्या दिलाने पंडित नरेंद्र शर्मा यांनी संतोष आनंद यांचे नाव सुचवले.

राज कपूर यांनी संतोष आनंद यांना बोलावून गाण्याची सिच्युएशन सांगितली. त्यांना या गाण्यातील तीन कडव्यांमध्ये तीन वेगवेगळे भाव हवे होते.

पहिल्या कडव्यामध्ये ती नायिका आपल्या मैत्रिणींना संबोधित करते दुसऱ्या कडव्यात ती आपल्या आईला संबोधित करते आणि तिसऱ्या कडव्यात ती आपल्या मित्राला संबोधित करते.

राजकपूर आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांना कायम चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणत असायचे. ‘बॉबी’ चित्रपटातील डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांची पहिली भेट आठवा. बेसनाच्या पीठाने भरलेले हात घेऊन बॉबी दरवाजा उघडते हा प्रसंग राज कपूरच्या वैयक्तिक आयुष्यात देखील आला होता. ज्या वेळी पहिल्यांदा ते नर्गिस ला भेटायला गेले होते त्य वेळी नर्गीस याच ‘अवतारात’ होती.

‘प्रेम रोग’ चित्रपटातील या गाण्यात नायिका  तिसऱ्या अंतऱ्यामध्ये तिच्या मित्राला अंगठ्याने चिडवत ‘तेरा यहां कोई नही’ असे म्हणते. राज कपूरच्या वैयक्तिक जीवनात देखील असाच  प्रसंग आला होता. राज कपूर जेव्हा स्वत:च्या लग्नासाठी एक मुलगी पाहायला गेले होते त्यावेळी त्या लहानग्या मुलीने राज कपूर यांना अंगठा दाखवून असेच चिडवले होते! त्या निरागस मुलीची ती कृती राजला खूप भावली होती.

हा प्रसंग, ही घटना राज कपूरच्या मनामध्ये कायम कोरली गेली होती. प्रेम रोग चित्रपटाची या गीताच्या वेळी हा प्रसंग दाखवता येईल असे त्यांना वाटले आणि संतोष आनंद यांना त्यांनी आवर्जून तसे सांगितले.  

गाण्याची सिच्युएशन लक्षात आल्यानंतर संतोष आनंद दिल्लीला आपल्या घरी गेले. आपल्या छोट्या मुलीला मांडीवर घेऊन तिच्याकडे पाहत बसले. डोक्यात राज कपूरच्या गाण्याचे विचार चालू होते. आज ना उद्या ही मुलगी देखील लग्न करून दुसऱ्याच्या  घरी जाणार  ही भावना त्यांच्या मनात पहिल्यांदाच आली आणि त्यांचे डोळे पाणावले.

तिला मांडीवर घेऊनच त्यांनी ते गाणं तिथल्या तिथे एकटाकी लिहून काढले आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला जाऊन त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना फोन करून  गाणे तयार असल्याचे सांगितले. एल पी यांनी सुंदर चालीत हे गीत बांधले. अभिनेत्री नंदा या सिनेमात पद्मिनी कोल्हापुरेच्या आईचा रोल करीत होती. दोघी ही मराठी त्यामुळे त्यांचे छान ट्युनिंग निर्माण झाले. पुढे आहिस्ता आहिस्ता , मजदूर मध्ये त्या दोघी मायलेकी होत्या.

चित्रपटाच्या वेळी राज आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खोलवर जपलेल्या आठवणी रुपेरी पडद्यावर मांडत असे. त्या मुळे त्यातील उत्कटता, सच्चेपणा मनाला भावत असे.  राजकपूर त्याच्या मनासारखी गोष्ट घडल्याशिवाय पुढे जात नसे. आज चाळीस वर्ष झाली तरी या गाण्याची प्रत्येक ओळ आणि प्रत्येक फ्रेम रसिकांच्या लक्षात आहे.!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.