आज जगाचं डोकं उठवणाऱ्या रशियाच्या पब्लिकने एकेकाळी राज कपूरला गाडीसकट डोक्यावर घेतलं होतं

कॉलेजमध्ये फ्रेशर्स किंवा गॅदरिंगमध्ये वेगवेगळे दिवस साजरे करण्याची पद्धत आहे बघा. यामध्ये ट्रेडिशनल डे, कल्चरल डे, मिसमॅच डे, असे काय काय दिवस असतात. त्यातच रेट्रो डे आणि कॅरेक्टर डे  या दोन्ही दिवसांत एका गोष्टीवरून कायम पोरांमध्ये तंटे होतात. राज कपूर यांचं कॅरेक्टर कोण निभावणार? हा तो मुद्दा.

काय आहे ना ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ची जोडी जमली की कॉलेजमध्ये लय हवा होते, असं म्हणतात.

आपल्यातील पुष्कळ लोकांच्या आजीचं क्रश असणाऱ्या राज कपूर यांची क्रेझ आजच्या तरुणाईमध्ये देखील कायम आहे. पन्नासच्या दशकापासून ते एकविसाव्या दशकापर्यंत स्वतःचं नाव एव्हरग्रीन राहील अशी कामगिरी करणाऱ्या या अस्सल कलाकाराने फक्त भारतातंच नाही तर रशियाच्या जनतेलाही दिवाणं केलं होतं. तेही इतक्या लेव्हलवर की कोणत्याही दिग्गज नेत्याचं होणार नाही असं जंगी स्वागत त्यांचं रशियात करण्यात आलं होतं, शिवाय त्यांची गाडी देखील खांद्यावर उचलून धरली होती.

यावरून राज कपूर यांचे इतके तुफान चाहते रशियात कसे झाले? हाच प्रश्न पडतो. 

भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ ला. मात्र त्यापूर्वीच भारताने सोव्हिएत युनियनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. १९५० च्या दशकात कोरियन युद्धादरम्यान नेहरूंनी अमेरिकेसमोर झुकण्याला ठाम नकार दिला आणि याच नायकत्वाने रशियाला प्रभावित केलं. पण खरा टर्निंग पॉइंट आला १९५३ मध्ये. सोव्हिएत हुकूमशहा स्टॅलिन अचानक मरण पावला आणि निकिता ख्रुश्चेव्ह यांनी रशियाचा कारभार सांभाळला.

ख्रुश्चेव्ह यांनी सोव्हिएत प्रजासत्ताकांना सिनेमासह सांस्कृतिक आयातीवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या. इकडे भारतात हिंदी सिनेसृष्टीचा सुवर्ण काळ चालू होता. राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार असले भन्नाट कलाकार दशक गाजवत होते. तेव्हाच रशियाने फॉरेन चित्रपटांच्या आगमनाला परवानगी दिल्याने रशियातही आपली जादू पसरवण्याची संधी या कलाकारांना मिळाली.

यात पहिला क्रमांक लावला तो राज कपूर यांच्या ‘आवारा’ चित्रपटाने.

पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीस, जर्मनीबरोबरच्या विनाशकारी युद्धानंतर, रशिया अजूनच उध्वस्त झाला होता. लोक गरीब झाले होते आणि जीवनात मोठा एकांत आला होता. अशात आवारा आशेची किरण बनून रशियन लोकांच्या आयुष्यात आला.

राज कपूर यांचे चित्रपट मुळातच जमिनीशी जोडलेल्या माणसाचं चित्रण करणारे होते. अगदी साधारण गरीब असा माणूस, त्याच्या आयुष्यात अनेक समस्या मात्र सगळ्या परिस्थितीचा नेहमी हसत मुखाने सामना करणारा ‘आवारा पठ्ठा’ रशियनांच्या मनात घर करून गेला. गरिबीने ग्रासलेले भारतीय लोक हसतमुखाने मोठ्या संकटांना तोंड कसे देतात? हे वास्तव्य राज कपूर यांनी आवारातून रशियन लोकांपर्यंत पोहोचवलं. 

आधीच सर्वस्व गमावून भावनिक द्वंद्वात अडकलेल्या रशियन भावंडांना राज कपूर यांनी आवारातून भावनिक साद घातली होती. खडतरातील खडतर प्रसंगांत हसत राहण्याची शिकवण त्यांनी दिली. आनंदी आयुष्याच्या या मंत्राने आवाराच्या माध्यमातून रशियन लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तर ज्या चेहऱ्याने त्यांना हे दान दिलं तो चेहरा तेव्हापासून रशियन भावांसाठी देवदूत ठरला. 

‘हिंदू – रुसी भाई भाई’ हे घोषवाक्य जन्माला येणारं ते ५० चं दशक होतं. हे संबंध सिद्ध करणारा हेलिकॉप्टर शॉट राज कपूर यांनी मारला होता.  

त्यांच्या रशियन फॅन फॉलोईंगचे लय किस्से ऐकण्यात आहेत.

यात महत्त्वाची घटना अशी की, सोव्हिएत युनियन हा असा देश आहे जो देश प्रोटोकॉल म्हणजेच नियम फॉलो करण्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा सहन करत नाही. मात्र राज कपूर सोव्हिएत युनियनच्या भेटीसाठी जेव्हा गेले तेव्हा व्हिसाशिवाय त्यांना देशात एंट्री देण्यात आली होती. तेही हसत मुखाने. 

सहज एंट्री दिल्यानंतर राज कपूर विमानतळाच्या बाहेर पडले आणि टॅक्सीची वाट पाहू लागले. तोपर्यंत लोकांना राज कपूर मॉस्कोमध्ये असल्याची बातमी पसरू लागली होती. थोड्याच वेळात त्यांची टॅक्सी आली आणि ते आत बसले. मात्र अचानक त्यांना जाणवलं की टॅक्सी रस्त्याने पुढे जात नाहीये तर आकाशाकडे वरती जातेय. जेव्हा त्यांनी गाडीच्या बाहेर बघितलं तेव्हा लोकांनी त्यांची गाडी खांद्यावर उचलून धरली होती.

यातून कल्पना येते, काय बाप वेड असणार लोकांना त्यांचं!

राज कपूर यांच्या रशियातील आगमनाने भयानक धुमाकूळ घातला होता. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं असं स्वागत केलं जसं कोणत्याही देशाच्या प्रमुखाचं किंवा जगात प्रसिद्ध सेलिब्रिटीचं देखील होणार नाही. त्यांना भेटण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी रशियन फॅन्स अगदी सैरभैर पळत होते. एकच कल्ला झाला होता.

आवारानंतर राज कपूर यांचा ‘श्री ४२०’ हा चित्रपट रशियात खूप गाजला. या दोन्ही चित्रपटातून त्यांच्या चार्लीन चापलीनशी सुसंगत असणाऱ्या पात्राने रशियन पब्लिकच्या मनात घर केलं. भारतीय सिनेसृष्टीची ओळख रशियनांना करून दिली ती याच चित्रपटांनी. आजही या चित्रपटांचा उल्लेख ‘भारतीय सिनेमाचा महान शोमॅन’ असा केला जातो.

चित्रपटांमधून साध्या माणसाच्या रूपाने प्रेक्षकांच्या जीवनात प्रवेश करणारे राज कपूर खऱ्या आयुष्यातही अगदी तसेच साधे होते. म्हणून तर लोकांना अपील होत होते, आपल्यातीलच एक वाटत होते. हीच त्यांची खासियत त्यांनी आयुष्यभर जपली. जीवनभर प्रेरणा आणि प्रेम दिलखुलासपणे सर्वांना देत राहिले आणि त्यामुळेच जगभरातील चाहत्यांकडून त्यांनाही ते मिळत गेलं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.