चलो बुलावा आया है माता ने बुलाया है’ गाणाऱ्याला खरा ब्रेक थ्रू राज कपूर यांनीच दिला..
सिनेमाच्या मायानगरीत संघर्ष कोणाला चुकलाय? प्रत्येकाला संघर्षातूनच आपल्या ध्येयाकडे जायचं असतं. कधी कधी अनपेक्षित पणे संधी चालून येते आणि करिअरला नवा आकार येतो. अर्थात प्रत्येकाच्या बाबतीत असं घडत नाही पण पंजाबमध्ये जन्मलेल्या एका गायकाच्या बाबतीत असं घडलं.
पंजाब मधील अमृतसर मध्ये जन्मलेल्या एका गायकाचा सत्तरच्या दशकामध्ये मोठा बोलबाला होता. भजन आणि लोक संगीतावर आधारीत गाणी गाण्यात तो माहीर होता. त्याचा आवाज हा खास ‘फोक म्युझिक’ साठीच बनला होता असे वाटते.
त्या काळात पंजाब मधील प्रत्येक संगीताच्या कार्यक्रमात तो गात होता. ऑर्केस्ट्रा मध्ये त्याच्या गाण्यांना मोठी लोकप्रियता मिळत होती. पण त्याचे स्वप्न होते बॉलीवूडमध्ये गायचे. त्यासाठी तो प्रयत्न देखील करत होता पण यश मिळत नव्हते. पण अचानक एके दिवशी त्याला मुंबईमधील एका कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली. ही नवोदित गायकांसाठीची एक स्पर्धा होती. या पंजाब मधील गायकाने प्रचंड मेहनत घेतली. काहीही करून आपल्याला ही स्पर्धा जिंकायचीच असे त्याने मनाशी ठरवले. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेऊ लागला.
मुंबईतील या कार्यक्रमाचे शीर्षक होते ‘बैसाखी की शाम’ यात भारतातील अनेक गायकांनी भाग घेतला होता. त्याने घेतलेल्या परिश्रमाला चिकाटीला आणि जिद्दीला फळ आले. या स्पर्धेत या गायकाला ‘गोल्ड मेडल’ मिळाले! त्याला कृतकृत्य वाटत होते. पण खरी धमाल पुढेच आहे.
या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाला महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग आणि प्रख्यात अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक राजकपूर उपस्थित होते. त्या गायकाला हा फार मोठा सन्मान वाटला.
राज कपूरला या गायकाचा आवाज प्रचंड आवडला होता.
कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले आणि त्याला सांगितले, ”माझ्या आगामी चित्रपटांमध्ये तुला गाणे गायचे आहे!” त्या गायकाला आता स्वर्ग दोन बोटे उरला होता. कारण ज्यांची गाणी ऐकत तो मोठा झाला होता तो राज कपूर त्याच्या आगामी चित्रपटात त्याला घ्यायची संधी देत होता! राज कपूर ने लगेच संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना तिथे बोलावे आणि याच्याकडून लगेच एक गाणे गाऊन घ्यायला सांगितले.
एल पी यांनी त्याच्या स्वराला साजेशी एक धून तयार केली. वस्तुत: काश्मीर आणि पाकिस्तानातील फोक म्युझिक ची ट्यून होती आणि गाणे देखील तिथले लोकगीत होते. गाणे रेकॉर्ड झाले हा गायक पुन्हा पंजाबला निघून गेला. आपण रेकॉर्ड केलेले गाणे कोणत्या चित्रपटासाठी आहे त्याला काहीच माहिती नव्हते. त्याला काळजी पण वाटत होती गाणे चित्रपटात घेतात कि नाही…
तब्बल दोन वर्षानंतर हे गाणे हे काय चित्रपटात घेतले गेले. आणि संपूर्ण भारतभर हे गाणे आणि हा गायक प्रचंड लोकप्रिय झाला. चित्रपट होता १९७३ साली प्रदर्शित झालेला ‘बॉबी’ आणि गाणे होते ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो….’ गायकाचे नाव ते नरेंद्र चंचल. अशा प्रकारे नरेंद्र चंचलला पहिल्यांदाच एका मोठ्या बॅनर मध्ये गायला मिळाले.
नरेंद्र चंचल यांच्या या गाण्याला त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.
त्यानंतर नरेंद्र चंचल यांनी बॉलीवूडमध्ये अनेक गाणी गायली. पण त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती वैष्णोदेवीच्या गाण्यांनी. ‘चलो बुलावा आया है माता ने बुलाया है’,’ तूने मुझे बुलाया शेरावालीये मै आया मै आया…’ या गाण्यांनी संपूर्ण देशात प्रचंड लोकप्रियता मिळवली.
वैष्णोदेवीचे गाणे म्हणजे नरेंद्र चंचल असे समीकरणच झाले. दरवर्षी ३० डिसेंबरला नरेंद्र चंचल वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असे आणि वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबरला संपूर्ण दिवसभर माताच्या दरबारामध्ये जाऊन तिची सेवा करत असे आणि भक्ती गीते गात असे.
राजकपूर सारख्या जोहरीने या हिऱ्याला बरोब्बर ओळखले आणि त्याला आपल्या सिनेमात गायला देऊन त्याच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला!
-भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू
- राज कपूर आणि नर्गिसच्या लव्ह स्टोरीत थेट मोरारजी देसाईंची एंट्री झाली होती
- देशभक्तीचे गाणे म्हणजे आवाज महेंद्र कपूरचा इतकं परफेक्ट समीकरण तयार झालं होतं…
- हृदयविकाराला हरवत मुकेशनं ‘सावन का महिना’ हे गाणं अजरामर केलं…