गुरुदत्त च्या अर्धवट सिनेमावरून राज खोसला ने बनवला क्लासिक ‘वो कौन थी’?

भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि मनस्वी कलावंत म्हणजे गुरुदत्त ! गुरुदत्त ने कायम काळाच्या पुढचे सिनेमे दिले. आज जगभरातील विद्यापीठांमध्ये गुरुदत्तच्या चित्रपटांचा अभ्यास केला जातो. गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे महोत्सव देश विदेशात भरवले जातात. त्या चित्रपटांवर साधक बाधक चर्चा केली जाते.  प्यासा (१९५७), कागज के फूल (१९५९) आणि साहब बीबी और गुलाम (१९६२) या तीन चित्रपटांमुळे  गुरुदत्त यांचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले.

गुरुदत्त यांना केवळ ३९ वर्षाचे आयुर्मान लाभले. 

१० ऑक्टोबर १९६४ या दिवशी गुरुदत्त यांनी आत्महत्या केली. गुरुदत्त कायम चित्रपटाच्या दुनियेत मशगुल असायचे. एकावेळी त्यांच्या डोक्यात तीन-तीन चित्रपटांच्या कथा आकाराला येत असायच्या. आणि बऱ्याचदा तर ते एकाच वेळी दोन – दोन चित्रपट फ्लोअरवर न्यायचे.

‘कागज के फूल’ हा भारतातील पहिला सिनेमास्कोप चित्रपट. या चित्रपटाच्या सोबतच गुरुदत्त यांनी ‘राज’ या चित्रपटाची सुरुवात केली होती. हा ‘राज’ चित्रपट गुरुदत्त यांचे सहाय्यक निरंजन दिग्दर्शित करणार होते. या चित्रपटांमध्ये वहिदा रहमान डबल रोल मध्ये होत्या. तर नायक सुनील दत्त हे आर्मी डॉक्टरचा रोल साकारणार होते. आधी हा रोल स्वत: गुरुदत्त च करणार होता.

या चित्रपटाला संगीत राहुल देव बर्मन यांचे होते. आर डी बर्मन यांचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे ते या चित्रपटाबद्दल प्रचंड आनंदी आणि उत्सुक होते. विकी कॉलीन्स यांच्या ‘वूमन इन व्हाईट’ या इंग्रजी कादंबरीवर हा चित्रपट बेतला होता. सिमला येथे या चित्रपटाच्या शूटिंग सुरू देखील झाले.

आर डी बर्मन यांनी आपला पहिलाच चित्रपट असल्यामुळे अतिशय काळजीपूर्वक काम सुरू केले.

त्यांनी या चित्रपटाची दोन-तीन गाणी रेकॉर्ड देखील केली. १९५८ सालच्या फिल्मफेअरच्या अंकामध्ये आर डी बर्मन आणि गीता दत्त एका गाण्याची रिहर्सल करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता. हा फोटो ‘राज’ या चित्रपटाच्या म्युझिक मिटिंग मधील होता.

गुरुदत्त जितका प्रतिभावान आणि मनस्वी कलावंत होता तितकाच तो लहरी देखील होता. त्याचा मूड जायला छोटीशी गोष्ट पुरेशी असायची. पटकन त्याचा एखाद्या गोष्टीवरील विश्वास उडून जायचा त्यामुळे त्याचे अनेक सिनेमे हे दोन-तीन रिळानंतर बंद पडत होते. 

‘राज’ या चित्रपटाच्या बाबतीत हेच झालं. एक तर गुरुदत्त यांचा ‘कागज के फूल’ हा अतिशय महत्त्वाकांक्षा आणि अप्रतिम सिनेमा असून देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटाला अजिबात यश मिळाले नाही.

हे अपयश गुरुदत्त पचवू शकला नाही. त्यामुळे निरंजन दिग्दर्शित ‘राज’ या चित्रपटाचे शूटिंग काही रिळे बनल्यानंतर थांबले.  हा चित्रपट डब्यात गेला! हेच कथानक घेवून गुरुदत्त चे आणखी एक सहायक राज खोसला यांनी १९६४ साली ‘वो कौन थी? हा क्लासिक सिनेमा बनवला.

‘राज’ या चित्रपटाचे संगीतकार आर डी बर्मन यांना अतिशय दुःख झाले.

कारण खूप मेहनतीने त्यांनी या चित्रपटाची गाणी आणि संगीत यावर काम सुरू केले होते. कायद्याप्रमाणे गुरुदत्त यांच्या चित्रपटातील गाणी ही गुरुदत्त प्रोडक्शन हाऊस ची प्रॉपर्टी होती. परंतु गुरुदत्त यांनी आरडीचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे ही गाणी त्यांना देऊन टाकली.

याच काळात आर डी बर्मन यांना मेहमूद यांचा ‘छोटे नवाब’ हा चित्रपट दिग्दर्शित करायला मिळाला. या चित्रपटाची गाणी शैलेंद्र यांनी लिहिली होती. ‘राज’ या चित्रपटाची गाणी देखील शैलेंद्र यांनीच लिहिली होती. त्यामुळे ‘राज’ या चित्रपटाची दोन गाणी छोटे नवाब मध्ये घेता येतील असे मेहमूद यांनी सांगितले. पण आर डी बर्मन यांनी त्याला नकार देऊन, ‘राज’ या चित्रपटातील गीता दत्त यांनी गायलेल्या एका गाण्याच्या चालीवर ‘छोटे नवाब’ या चित्रपटातील एक गाणे तयार केले.

हे गाणे मोहम्मद रफीच्या स्वरात होते आणि गाण्याचे बोल होते ‘या इलाही तू करले…’ ‘राज’ या चित्रपटात आर डी बर्मन यांनी आशा भोसले, गीता दत्त आणि शमशाद बेगम या तिघींच्या स्वरामध्ये एक त्रयी गीत गाऊन घेतले होते. या गाण्याचे पुढे काय झाले ते कळालेच नाही.

परंतु गीता दत्त यांच्या स्वरातील पहिले गाणे (जे आर डी बर्मन चे संगीत क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर जे पहिले गाणे होते) त्या गाण्याची धून मात्र आरडी बर्मन यांनी पुन्हा कधीही कुठेही वापरली नाही. त्यांच्या दृष्टीने ते त्यांची हि पहिली रचना होती. त्यामुळे त्यांनी ती रचना त्यांनी कायम आपल्या काळजात ठेवली कधीही कुठेही त्यांना ती वापरावीशी वाटली नाही.

भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.