उत्तर प्रदेशचा नेता मुख्यमंत्र्यांसमोर येऊन मुंबई जाळायची धमकी देत होता, आणि…

मागच्या काही काळात उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र्र हा वाद महाराष्ट्र बराच गाजत आहे. आधी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला हल्ला असो कि त्यानंतर साकीनाका बलात्कार प्रकरण असो. उत्तर भारतीयांविरोधात वातावरण चांगलंच तंग आहे.

पण आता हे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा वाद आजचा आहे का? तर नक्कीच नाही.

अगदी ५०-६० च्या दशकांपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती अशा परप्रांतीयांविरोधात वातावरण पाहायला मिळतं. आणि त्यातून काही वाद देखील बरेच गाजले. असाच एक वाद गाजला होता, १९६२-६३ च्या दरम्यान. तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार विरुद्ध उत्तर प्रदेशचे दिग्गज नेते राजनारायण.

त्यातून राजनारायण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चक्क मुंबई जाळण्याची धमकी दिली होती. 

मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी. पूर्वीपासूनच म्हणजे अगदी स्वातंत्र्यापूर्वी देखील या शहराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. मायानगरी, स्वप्ननगरी म्हणवणाऱ्या मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळतच अशी या शहराची ओळख. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आजही येतात.

याच ओळखीमुळे आणि स्थलांतरामुळे लोकवस्ती वाढली. वाढते उदयोगधंदे व कारखान्यांमुळे मुंबईतील गर्दी वाढत गेली. रोजगारासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी स्थानिक आणि परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे येऊ लागले. अगदी वडापाव विकण्यापासून ते रिक्षा-टॅक्सी चालवण्यापर्यंत हाताला मिळेल ते काम करू लागले.

मात्र यामुळे लवकरच मुंबईचे रूपांतर मानवी लोंढ्यामध्ये झाले. मुंबईच्या नागरी सुविधांवरील ताण वाढू लागला. आणि यातूनच या कामगारांचे प्रश्न निर्माण होऊ लागले.

त्यावेळी अशाच एकाकोण्या प्रश्नामुळे या कामगारांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनासाठी राज नारायण त्यावेळी मुंबईमध्ये आले.

राज नारायण म्हणजे देशातील एकेकाळच्या समाजवादी नेत्यांच्या यादीमधील सर्वात मोठं नाव.

पुढे जाऊन तर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना २ वेळा हरवण्याचा पराक्रम गाजवलेले नेते अशी दुसरी ओळख मिळवली होती. दोन वेळा कधी हरवलं, तर पहिल्यांदा न्यायालयात, ज्यामुळे देशात आणीबाणी लागू झाली. आणि दुसऱ्यांदा म्हणजे १९७७ साली त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ रायबरेलीमध्ये. ते ही तब्बल ५५ हजार मतांनी. त्यानंतर ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री बनले होते.

अशा या राज नारायण यांची सुरुवातीपासूनच उत्तर प्रदेश आणि बिहारात त्यांची विलक्षण राजकीय दहशत असायची. त्यामुळे संपूर्ण देशभरात ते इंदिरा गांधींना हरवण्याच्या आधी देखील प्रसिद्ध झाले होते. तर असे हे राज नारायण त्यावेळी मुंबईत कामगारांच्या एका आंदोलनाच्या संदर्भात मंत्रालयात दाखल झाले.

त्यावेळी मुख्यमंत्री होते मारोतराव कन्नमवार.

कन्नमवार म्हणजे अस्सल वऱ्हाडी बाज असलेले नेते. अगदी शांत आणि बोलण्यात समोरच्याला आदर द्यायचे. मात्र वेळ पडली तर मारोतराव आपल्याच बोलण्यातून आणि बेरकीपणातुन अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना अक्षरशः चपापायला लावायचे.

अशा या मुख्यमंत्री कन्नमवार यांची भेट होताच राजनारायण यांनी उत्तर प्रदेशच्या स्टाईलमध्ये कन्नमवारांशी बोलायला सुरुवात केली. कन्नमवार सुरुवातीला शांतपणे ऐकून घेत होते. पण राज नारायण मात्र हळू हळू आवाज चढवत आणि मनाला वाटेल ते बोलायला लागले. आणि बोलता बोलता ते अचानक मारोतरावांना म्हणाले,

‘मै बम्बई जला दुंगा’

राज नारायण यांची बोलण्यातील अशी भाषा ऐकून आतापर्यंत शांत असलेल्या मारोतरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, आणि सहनशक्ती संपली होती.

राज नारायण यांच्या दुप्पट आवाजात कन्नमवार त्यांच्यावर गरजले. आणि म्हणाले,

‘‘तू खुदको क्या समझता है? महाराष्ट्र के मुख्यमंत्री से तू बात कर रहा है। चुपचाप निकल जा, वरना जेलमे बंद कर दूंगा’’

कन्नमवारांचा हा आवेश पाहून अद्वातद्वा बोलत असलेले राज नारायण चांगलेच चपापले. आवाज एकदम खालच्या पट्टीत आला आणि थरथरू लागले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातून आणि मुंबईतून देखील काढता पाय घेतला आणि उत्तरप्रदेशला निघून गेले.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.