मनसैनिकांची तुकडी ‘नाझी सॅल्यूट’ करुन राज ठाकरेंचं स्वागत करणार होती…
राज ठाकरे आणि बाळासाहेब….हे समीकरण म्हणजे अफलातून आहे.
दोघा चुलते -पुतण्याविषयी बोलायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे यांना राज यांच्याविषयी अतोनात जिव्हाळा होता. राज हे दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचे विद्यार्थी. त्यांचे कुटुंबही दादरमध्येच राहात असे. परंतु तरीही राज अनेकदा आपल्या काकांच्या ‘मातोश्री’ या कलानगर, वांद्रे पूर्व येथील बंगल्यात मुक्कामाला असायचे. शाळेच्या दिवसात राज कलानगर वांद्रे येथून शाळेपर्यंत प्रवास करीत. त्यांची आई त्यांचा डबा दुपारी थेट शाळेतच पाठवून देई. दादरच्या आपल्या घरी ते शनिवार रविवारी जात असत.
हळूहळू राज यांनी आपल्या काकांच्या लकबी आत्मसात केल्या. त्यांची ही वैशिष्ट्ये त्यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला, तेव्हा उघडपणे दिसून येऊ लागली.
राज ठाकरे यांची राजकीय मते कोणाला पटतील अथवा नाही मात्र त्यांचं वक्तृत्व अफाट आहे याबद्दल विरोधकांचही एकमत होईल. त्यांच्या सभा गाजतात, लोकांना भावतात. राज ठाकरे रोखठोक बोलतात, जनतेच्या मनातलं बोलतात. कधी भूमिका घ्यायला ते घाबरत नाहीत. त्यांच्या भाषणांमध्ये बाळासाहेबांची झाक दिसते असं म्हणतात.
राज ठाकरेंच्या पहिल्या भाषणाच्या वेळेस त्यांना आत्मविश्वास देणारे बाळासाहेबच होते.. तेंव्हा बाळासाहेबांनी राज यांना सांगितलेले शब्द ते आजही विसरत नाहीत.
बाळासाहेब म्हणले होते की, “मी आता तुला दोन गोष्टी सांगणार आहे ज्या माझ्या बापाने मला सांगितल्या होत्या. एक म्हणजे ज्या मैदानात जाशील त्या मैदानाची भाषा बोल. कुंपणावरती बसलेल्या एखाद्या साध्या माणसाला देखील समजेल इतकं साधं सोप्या भाषेत बोल. दुसरं म्हणजे लोकं शहाणी व्हावीत याच्यासाठी बोल आपण किती शहाणं आहे हे दाखवण्यासाठी बोलू नको.
राज ठाकरे यांच्या मनावर बाळासाहेबांचे हे शब्द कायमचे कोरले गेले. आजही ते सभा जिंकतात आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीतून लोकांना काबीज करतात ते याच दोन गोष्टींवरून.
या दोन्ही नेत्यांमध्ये तसं बरंच साम्य होतं, एक म्हणजे कला..
बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं प्रेम व्यंगचित्रकला होतं. याच मार्मिक चित्रांमुळे महाराष्ट्रात एका वेगळ्या बंडखोरीचा पाया त्यांनी रचला. फटकाऱ्यांची हि भाषा पुढे त्यांच्या राजकारणाचा पाया देखील झाली आणि ओळख देखील. बाळासाहेबांनी आपल्या पुतण्याच्या हातात कुंचला दिला आणि त्याची फटकार कशी काढायची हे शिकवलं.
आपले काका व्यंगचित्र काढत असताना लहान असलेले राज तासनतास तिथे जाऊन बसायचे.
बाळासाहेबांनी व्यंगचित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतले नाही. पण त्यांच्यावर इंग्लंडचे जगप्रसिद्ध कार्टूनिस्ट डेव्हिड लो ची चित्रे पाहून पाहून व्यंगचित्रकलेत प्राविण्य मिळवले. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या इव्हनिंग स्टँडर्ड या वर्तमानपत्रात डेव्हिड लो ने काढलेले कार्टून जगप्रसिद्ध आहेत. विशेषतः हिटलर आणि मुसोलिनी वर काढलेले कार्टून आजही अभ्यासले जातात.
राज ठाकरे शाळेत असताना बाळासाहेबांची व्यंगचित्रकला कॉपी करायचे. ते पाहून बाळासाहेबांनी छोट्या राजला डेव्हिड लोच्या चित्रांचे पुस्तक आणून दिले. बाळासाहेबांनी राज मधला व्यंगचित्रकार घडवला. फक्त राज ठाकरेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात व्यंगचित्रकला बाळासाहेबांनी रुजवली. आता कलेचा भाग सोडला तर एक किस्सा देखील दोघांमधील साम्य दर्शवतो … बाळासाहेब ठाकरे हे हिटलरचे चाहते होते आणि पुतण्या राज ठाकरे देखील…
आता मेन किस्सा म्हणजे हिटलर आणि राज ठाकरे यांचा …
किस्सा असाय की, राज ठाकरे हिटलरच्या सैन्याच्या धर्तीवर मनसे सैनिकांची तुकडी उतरवणार होते. हे वाचून तुमच्या कपाळावर आठ्या आल्या असतील त्या आधी पूर्ण किस्सा बघा काय झालेला…
वर बोलल्याप्रमाणे आणखी एक गमतीदार विरोधाभास म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच राज ठाकरेही ऍडॉल्फ हिटलरचे प्रशंसक आहेत. पण हेही लक्षात घेणं महत्वाचं आहे, राज ठाकरे हिटलरचे प्रशंसक जरी असतील तरी ते जोडीला महात्मा गांधींनाही आपले स्फूर्तिदाते मानतात. रिचर्ड अटेनबरोंचा ‘गांधी’ हा चित्रपट राज ठाकऱ्यांनी किमान दीडशे वेळा पाहिला आहे. काही वेळा तर त्यांनी एका दिवशी दोन दोनदा हा चित्रपट पाहिला असल्याचं सांगतात.
दुसऱ्या महायुद्धातील जर्मन स्ट्रॉर्म-टूपरच्या धर्तीवर मनसे कार्यकर्त्यांची एक बिनीची तुकडी बांधण्याची राज ठाकऱ्यांची योजना होती.
पक्षाचा पवित्रा आम जनतेपुढे जोरकसपणे सादर करण्याचे काम ही तुकडी करील, अशी अपेक्षा होती. सार्वजनिक ठिकाणी या तुकडीने ‘नाझी सॅल्यूट’ देऊन राजसाहेबांचे स्वागत करायचे होते.
पण……
२००९ च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी ठाण्याला आयोजलेल्या एका कार्यक्रमात या बिनीच्या तुकडीला लोकांपुढे सादर करण्याचे राज ठाकरे यांनी ठरवले होते. मात्र हे सगळे प्रदर्शन म्हणजे वादाला निमंत्रण देणारा पोकळ देखावा ठरेल, असे बहुतेकांचे मत पडल्याने ही सगळी योजना बासनात गुंडाळण्यात आली. आणि त्यानंतर काय कधी त्याचा विषय देखील निघाला नाही.
पण एकदा पत्रकार परिषदेत राज यांनी पत्रकारांना उत्तर देतांना म्हणाले होते की, “लाखो ज्यूंचा क्रूरपणे नाश करण्यासारखे हिटलरचे नकारात्मक पैलू बाजूला ठेवा. हिटलरबद्दल इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा कोणत्याही नेत्याला हेवा वाटेल,” वरून राज हेही स्पष्ट करत की, माझ्या वक्तव्यावरून तुम्हाला हवे ते निष्कर्ष काढता येतील ती काढा.
पण राज ठाकरे हिटलरच्या सैन्याच्या धर्तीवर मनसे सैनिकांची तुकडी उतरवणार होते हे ऐकायला, वाचायला पचणार नाही पण ही अशी कल्पना नक्कीच होती फक्त ती प्रत्यक्षात उतरली नाही एव्हढंच ..
हे हि वाच भिडू :
- मिशनऱ्यांनी हल्ला केला तेव्हा राज ठाकरे सिंधुताईंच्या मदतीला धावले होते
- शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र पक्ष स्थापन करणार होते..
- राज ठाकरे जया बच्चनला म्हंटले होते, ‘गुड्डी बुड्ढी झाली, तरी अक्कल येत नाही!’