अजान सुरू झाली अन बाळासाहेबांनी आपलं भाषण थांबवलं, पण राज ठाकरेंनी उलट केलं..
राज ठाकरेंची औरंगाबादची सभा सुरू झाले. भाषण शेवटाकडे येवू लागले आणि अजान सुरू झाली. अजान सुरू झाल्यानंतर मात्र राज ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी पोलीसांना सुचना करत अजान थांबवण्याच्या सुचना केल्या. ऐकत नसतील तर अजान देणाऱ्यांच्या तोंडात बोळा कोंबण्याच्या देखील सुचना केल्या.
पोलीसांनी आत्ताच सांगाव नाहीतर महाराष्ट्राच्या मनगटात किती ताकद आहे असं राज ठाकरे म्हणाले. अजान सुरू झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली भाषणे थांबवल्याची उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. मात्र राज ठाकरेंनी अजान सुरू झाल्यानंतर पोलीसांना अजान थांबवण्याची सुचना केली व आपले भाषण कायम ठेवलं..
अजान सुरू असताना आपले भाषण थांबवणाऱ्यांच्या यादीतलं महत्वाच नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे..
शिवसेनेने १९८५ पासूनच अधिकृतपणे हिंदुत्ववाद स्विकारला. १९८७ साली विलेपार्लेत विधानसभेची पोटनिवडणूक ‘गर्व से कहो हम हिंदू है’ !!! असं म्हणत शिवसेनेने पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन लढवली आणि जिंकली सुद्धा.
तर किस्सा होता २००५ च्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यानचा.
या दरम्यान नुकताच राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीचं सरकार आलेलं. त्यामुळे औरंगाबादची महानगरपालिका आपल्यालाच मिळावी या हेतूने सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रयत्न सुरु केले.
काहीही करून कसेही करून औरंगाबादचा गड राखायचा सेनेने ठरवलं तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. कारण त्याच्या आधी १५ वर्षांपासून औरंगाबाद मध्ये शिवसेनेची सत्ता होती. या महानगरपालिकेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होतं. तरीदेखील सेनेच्या मनात काहीशी भीती होती की आपला गड राखला जाईल की नाही…
सेना आणि भाजपची युती होती. युतीने तर थेट बाळासाहेबांनाच प्रचारामध्ये उतरवलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून बाळासाहेबांची प्रचार सभा औरंगाबाद मध्ये आयोजित करण्यात आली होती.
औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा आयोजित केली गेली. सभा यशस्वीपणे पार पाडावी यासाठी सेनेने जोर लावला. सर्वजण या सभेकडे लक्ष ठेवून होते. ही सभा नेमका काय बदल घडवू शकते, वातावरण फिरवू शकते का याबाबतीत, राजकीय वर्तुळातून कित्येक आडाखे बांधले जात होते.
ठरल्याप्रमाणे सभेतील बाळासाहेबांचं भाषण सुरू झालं. बाळासाहेब आपल्या भाषणात नेहेमीचे मुद्दे मांडत होते. त्यांच्या एका – एका वाक्यावर सांस्कृतिक मंडळाचं मैदान अक्षरशः टाळ्यांनी दुमदुमून गेलं.
अचानक बाजूच्या मशीदीत आजान सुरु झाली.
आजान आवाज ऐकताच बाळासाहेब भाषण करता करता थांबले. सगळ्या मैदानात एकच सन्नाटा पसरला. काही सेकंदात आजान बंद झाली आणि बाळासाहेबांनी एक पॉज घेतला आणि पुन्हा भाषण सुरु केलं.
अजान चा धागा पकडत बाळासाहेबांनी नेहमीच्या आपल्या स्टाईलने एक हात वर करून औरंगाबादच्या जनतेला उद्देशून एक प्रश्न विचारला…..
हे.. याचसाठी विचारतोय… तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर???
बस्स्स…..मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला. मैदानातला हर एक शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावाने घोषणा द्यायला थकत नव्हता.
बाळासाहेबांचा हाच एक प्रश्न निर्णायक ठरला आणि सगळं वातावरणच फिरलं. निवडणुका व्हायच्या आणि निकाल लागायच्या आधीच बाळासाहेबांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या.
प्रतिष्ठेच्या बनवलेल्या या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत युतीला सेनेमुळे त्यातल्या त्यात बाळासाहेबांचा या सभेमुळे यश आलं. औरंगाबादचे शिवसैनिक आजही या सभेच्या आठवणी सांगतात.
औरंगाबाद-संभाजीनगर हा मुद्दा शिवसेनेने सुरुवातीपासूनच कळीचा मुद्दा बनवला
१९८८ च्या निवडणुकीच्याही आधी बाळासाहेबांनी औरंगाबाद मध्येच घोषणा केली होती की, औरंगाबाद चे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं. १९८८ च्याही निवडणुकीमध्ये याच मुद्द्याचा शिवसेनेला फायदा झाला अन सेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. मग काय सेनेने हा मुद्दा वारंवार लावून धरला.
१९९५ ला जेंव्हा शिवसेना – भाजप युतीचं सरकार आलं तेंव्हा सेनेच्या पुढाकाराने कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात आलं होतं. २००५ मध्ये देखील या सभेच्या निमित्ताने सेनेच्या वतीने संभाजीनगर हा मुद्दा पुन्हा समोर आणला आणि याही निवडणुकीत सेनेला त्याचा फायदा झाला.
हा निवडणुकीचा मुद्दा झाला….
पण बाळासाहेब म्हणायचे
“आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे. त्यात राष्ट्रीयत्व असायला पाहिजे. जे मुस्लीमधर्मीय राष्ट्रीयत्व मानतात ते आमचे आहेत”.
मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांनी मुस्लीम जोडप्याला नमाज पढण्याची परवानगी दिली होती हे सर्वच जण जाणून आहेत.
आणखी एक म्हणजे, बाळासाहेबांचे मानसपुत्र साबीर शेख हे जन्माने मुस्लीम होते. साबीर भाईंचे शिवछत्रपतींवरील प्रेम, अभ्यास बघून बाळासाहेबांनी त्यांना शिवभक्त ही उपाधी दिली होती. बाळासाहेब ठाकरे मुस्लीमविरोधी आहेत असे चित्र त्याकाळच्या माध्यमांनी रंगवलं. पण त्यांचे हे किस्से बरंच काही सांगून जातात.
तेच २०२० ची घटना तर यात भर घालते. दरम्यान मुंबईमधील शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लीम मुलांसाठी ‘अजान पठण’ स्पर्धा आयोजित केली होती. त्यावर भाजपने बरीच टीका केली होती.
बाळासाहेबांची भूमिका असो वा सद्या चालू असलेला वाद असो..हे आधी लक्षात घेतलं पाहिजे की,
“अजानला विरोध नाहीये तर लाऊडस्पीकरवरून अजान पढली जाते त्याला विरोध आहे”
हे हि वाच भिडू :
- काश्मिरी पंडितांना भारतात कुणी खरी मदत केली असेल तर ती फक्त बाळासाहेब ठाकरेंनीच
- बाळासाहेब म्हणायचे मुंबई काय धर्मशाळा लागून गेली काय? कुणीही येतं अन सेटल होतं
- एन्रॉनच्या रिबेकाबाईंसाठी बाळासाहेब जोशी सरांवर नाराज झाले होते