राज ठाकरेंच्या २००३ आणि २००८ च्या आंदोलनांमुळं मराठी पोरं रेल्वेत भरती होऊ लागली…

राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेत ते कुठल्या मुद्द्यावर बोलणार, उद्धव ठाकरेंनी मुन्नाभाई म्हणत केलेल्या टीकेला उत्तर देणार का? अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांच्याबाबत काय भाष्य करणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या.

राज यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला, पण ब्रिजभूषण यांच्यावर मात्र थेट नाव घेऊन टीका केली नाही.

यावेळी त्यांनी बोलताना, ज्या मुद्द्यावरून एवढं रण पेटवलं गेलं त्या उत्तर भारतीयांविरुद्धच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. 

पण मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी राज आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं छेडलेलं हे आंदोलन खरंच यशस्वी झालं होतं का? हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या पक्षाची स्थापना केली. मनसे स्थापन झाल्यावर राज यांनी अजेंड्यावर मराठीचा मुद्दा घेतला होता. मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात, दुकानांवरच्या पाट्या मराठीत असाव्यात यावरुन आंदोलनाचं अस्त्र उगारलं. मराठी पाट्या नसल्यानं अनेक दुकानाचं खळ्ळ खट्याकही झालं.

मात्र मनसेला बूस्टर दिला तो रेल्वे भरतीसाठी झालेल्या आंदोलनामुळं…

१९ ऑक्टोबर २००८ ला, मुंबईत रेल्वे भरतीसाठी परीक्षा घेतल्या जाणार होत्या. या परीक्षा केंद्रांवर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यांचं म्हणणं होतं, की परीक्षा महाराष्ट्रात होत असल्या, तरी इथं मराठी मुलांना प्राधान्य दिलं जात नाहीये. सर्व भरणा हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या लोकांचा आहे. मुंबईत होणाऱ्या परीक्षांमध्ये त्यांची संख्या जास्त कशी काय..?

या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. 

मनसे कार्यकर्त्यांची परीक्षार्थ्यांशी बाचाबाची झाली, कित्येक उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाली आणि परीक्षा केंद्रांचीही तोडफोड झाली. मुंबईत अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या, पण महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटायला वेळ लागला नाही. राज्यभरात उत्तर भारतीयांना मारहाण झाली आणि मनसेचं आंदोलन आणखी तीव्र झालं.

महाराष्ट्रात अशा घडामोडी घडत असतानाच, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही राडा झाला. तिथल्या नागरिकांनी रेल्वे रोखण्याचे, आग लावण्याचे प्रयत्न करत राज ठाकरेंना विरोध दर्शवला. या प्रकरणाची चर्चा, उत्तर भारतीय नागरिकांपासून ते केंद्रातल्या उत्तर भारतीय नेत्यांपर्यंत झाली.

राज यांना या प्रकरणात अटकही झाली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणच्या बसेस फुटल्या, मनसेकडून महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली. या सगळ्या आंदोलनाचा राज यांना प्रचंड राजकीय फायदा झाला.

पण ज्या मराठी मुलांसाठी हे आंदोलन झालं, त्यांना याचा कसा फायदा झाला?

राज यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या परीक्षांमध्ये मराठी मुलांनाच प्राधान्य दिलं पाहिजे, परीक्षा मराठीतही झाल्या पाहिजेत अशा मागण्या केल्या होत्या.

त्यानंतर तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी, रेल्वे भरतीच्या परीक्षा मराठीमध्येही होतील असं जाहीर केलं. सोबतच त्या असंही म्हणाल्या, “कुणीही ज्या प्रदेशात राहत असेल तिथली स्थानिक भाषा आलीच पाहिजे.” 

त्याहून मोठी घोषणा ममता यांनी मुंबई भेटीदरम्यान केली होती ती म्हणजे, ”राज्यात ज्या नोकऱ्या उपलब्ध असतील, तिथं पहिलं प्राधान्य भूमीपुत्रांनाच दिलं जाईल.”

राज ठाकरेंच्या मनसेनं केलेल्या रेल्वे भरती आंदोलनाचा हा रिझल्ट मानला गेला. त्यानंतर मनसेनं काही वेळा रेल्वे भरती मार्गदर्शनासाठी कार्यक्रमही घेतले.

पण आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज यांनी पहिल्यांदाच रेल्वे भरतीचं आंदोलन केलं होतं अशातली गोष्ट नव्हती. 

त्यांनी २००३ मध्येही याच प्रकारचं आंदोलन केलं होतं आणि ते चांगलंच गाजलंही होतं.

भारतीय विद्यार्थी सेनेनं १८ नोव्हेंबर २००३ ला मुंबईतल्या रेल्वे रिक्रुटमेंट सेंटरवर हल्ला केला आणि नासधुसही केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. याच महिन्यात भारतीय विद्यार्थी सेनेनं कल्याणमध्ये रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली. 

बाहेरच्या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची कॉल लेटर्सही फाडण्यात आली. त्यानंतर राज यांनी कल्याण रेल्वे स्टेशन आणि रेल्वे पोलिस यांच्या विरोधात मोर्चेही काढले. 

“बाहेरच्यांना इथं मुंबईत आणून लावायचा प्रयत्न कुणी केला, तर तो हाणून पाडला जाईल,” असं राज यावेळी म्हणाले होते. त्यांच्या आंदोलनामुळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि लालूप्रसाद यादव यांच्यात शाब्दिक टोलेबाजी रंगली होती. राज यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर जेव्हा रेल्वेचं आंदोलन छेडलं, तेव्हा लालू प्रसाद यादव यांच्यावरच निशाणा साधला होता.

राज यांच्या २००८ मधल्या आंदोलनानंतर मात्र भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याचा कायदा करण्यात यावा अशी मागणी सर्वस्तरांमधून झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही याचा मोठा राजकीय फायदा झाला. तर रेल्वे भरतीत भूमीपुत्रांना प्राधान्य मिळू लागलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.