घर बदलल्यावर राज ठाकरेंचं नशीब पण बदलतं, हा इतिहास आहे

राज ठाकरे, हे नाव नुसतं वाचलं तरी डोळ्यांसमोर करडी नजर, भारदस्त आवाज आणि बाळासाहेबांची छबी या गोष्टी आपसूक येतात. शिवसेनेचं भावी नेतृत्व म्हणून राज ठाकरेंकडे कायम पाहिलं जायचं, मात्र महाबळेश्वरला झालेल्या पक्ष अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्ष पद गेलं आणि वादाच्या ठिणगीची आता मशाल होणार हे सगळ्या जगाला कळून चुकलं.

अर्थात हे सगळं काही एका दिवसात घडलं नाही. अनेक दिवस चालू असलेला संघर्ष, अंतर्गत धुसफूस या गोष्टींमुळं हे सगळं घडून आलं. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, तेव्हा फक्त सेनेचे चाहतेच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनाही धक्का बसला होता.

राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आणि काकणभर जास्तच लाडके. लहानपणीपासून काकांच्या सावलीत वाढलेल्या राज यांच्यावर बाळासाहेबांची मोठी छाप होती. त्यामागचं कारणही विशेष होतं.

बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय १९६६ मध्ये मातोश्री या कलानगरमधल्या बंगल्यात राहायला गेले. त्याआधी संपूर्ण ठाकरे कुटुंब ‘कदम मॅन्शन’ या एकाच इमारतीमध्ये एकत्र राहत होतं. राज यांचं घर आणि शाळा (बालमोहन विद्यामंदिर) दोन्ही दादरमध्ये. तरीही राज फक्त शनिवार-रविवारी आपल्या घरी जायचे. इतर वेळी ते मातोश्रीवरच रहायचे. इतका त्यांना आपल्या काकांचा म्हणजेच बाळासाहेबांचा लळा होता.

राज राजकारणात सक्रिय झाले आणि एकेक पायरी चढत त्यांनी शिवसेनेत महत्त्वाचं स्थान कमावलं. भारतीय विद्यार्थी सेनेचा झेंडाही त्यांनी जोमात फडकावला. त्यांची राजकीय प्रगती आणि जबरदस्त व्यक्तिमत्व पाहता त्यांच्याकडून लोकांच्या आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या.

२००० सालाच्या आसपास राज आणि त्यांचं कुटुंबीय कृष्णकुंज या इमारतीत शिफ्ट झाले. त्याआधीच चार वर्षं रमेश किणी प्रकरणात राज यांच्या नावाला आणि शिवसेनेलाही बरंच नुकसान सहन करावं लागलं. हे प्रकरण निवळेल असं वाटत असतानाच उलटं झालं आणि ते आणखी चिघळत गेलं.

नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतर, राज यांच्याबाबतचं सेनेतलं वातावरण आणखी चिघळत गेलं. याचं पर्यावसान सेनेचं कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यात झालं. पुढची चार वर्ष पक्षांतर्गत धूसफुसीनं कळस गाठला. नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारखे विश्वासू साथीदार शिवसेना सोडून गेले.

पण बाळासाहेबांसाठी राज यांनी शिवसेना सोडणं हा सगळ्यात मोठा धक्का होता.

२००६ मध्ये राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीच्या टप्प्यात राज यांच्या पक्षाला जबरदस्त यश मिळालं. गेल्या काही वर्षांत मात्र त्यांच्या पक्षाचा ग्राफ खालावला. आता बदललेला झेंडा, बदललेला अजेंडा आणि मराठीहृदयसम्राट या उपाधीवरून ‘हिंदूजननायक’ ही नवी उपाधी असे अनेक बदल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नजीकच्या भूतकाळात झाले.

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी युती होण्याचे संकेतही दिले गेले. पण अजून त्याबाबत काही स्पष्टता मिळालेली नाही.

फॉर्मात असलेल्या राज यांचा वेग कृष्णकुंजवर गेल्यावर काहीसा मंदावला. थोडक्यात त्यांचं नशीब काहीसं बदललं. आता मात्र राज यांचं नशीब पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. तेही त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त गरज असताना.

 

दिवाळीचा मुहूर्त साधत राज नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले आहेत. ज्याचं नाव आहे ‘शिवतीर्थ.’ शिवसेनेचा जन्म आणि वाढ ज्या शिवाजी पार्क मैदानावर झाली, त्या मैदानाला शिवतीर्थ म्हणतात. बाळासाहेबांना मानणाऱ्या अनेकांसाठी शिवतीर्थ हे श्रद्धेचं स्थान आहे.

त्यामुळं आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊन राज यांचं नशीब पुन्हा बदलावं आणि त्यांच्या पक्षाचा आलेख पुन्हा उंच जावा अशी प्रत्येक मनसैनिकाची इच्छा असेल. पक्षाच्या अजेंड्यात आणि घरात केलेला हा बदल राज यांना किती फायद्याचा ठरतोय, ही आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्येच समजेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.