अशाप्रकारे शिवसेनेत असताना राज ठाकरेंचे पंख छाटण्यास सुरवात करण्यात आली होती

साधारण नव्वदच्या दशकात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही ठाकरे घराण्याची तिसरी पिढी शिवसेनेच्या राजकारणात निर्णय घेताना दिसू लागली होती. बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा तेव्हापासूनच सुरु होती.

राज ठाकरे अगदी लहान असताना पासून बाळासाहेबांच्या सभांना हजर असतं. तीच वक्तृत्वाची स्टाईल, तेच हावभाव, तेच भेदक डोळे. विद्यार्थी सेनेच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंची पॉप्युलॅरीटी प्रचंड वाढली होती.

तर उद्धव ठाकरे नेहमी पडद्यामागे राहून काम करणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जायचे. त्यांची कामाची पद्धत ठाकरेंच्या परंपरागत स्टाईल पेक्षा वेगळी होती. ते कमी बोलायचे मात्र शिवसेने वर त्यांची पकड देखील जबरदस्त होती.

१९९४ साली नाशिक येथे भरलेल्या कुंभमेळ्यात शिवसेनेचे अधिवेशन भरवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंना देण्यात आली होती.

सुभाष देसाई,शिशिर शिंदे,बबनराव घोलप या तिघांनी अवघ्या तेरा दिवसाच्या कमी वेळेत हे अधिवेशन भरवले आणि त्याच यशस्वी संयोजन करून दाखवलं. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे पब्लिक प्लॅटफॉर्म वर दिसत होते.

एकेकाळी सामनाच्या हिंदी दैनिकाचे संपादक असलेले संजय निरुपम म्हणतात की,

त्या अधिवेशनापासूनच राज व उद्धव यांच्यातील दरी बद्दलची चर्चा मीडिया मध्ये सुरु झाली होती.

त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत देखील तिकीट वाटप करताना या दोन्ही चुलत भावंडांच्या मतांचा जरूर विचार करण्यात आला होता. शिशिर शिंदे हे उद्धव ठाकरेंना मुलुंडमधून निवडणुकीस उतरण्याचा आग्रह करत होते. त्यांचं म्हणणं होतं की,

“उद्धवजींनी फक्त फॉर्म भरण्यास आणि त्यानंतर थेट विजयी झाल्याचं सर्टिफिकेट घेण्यासाठी यावे. बाकीची निवडणुकीची जबाबदारी आमची.”

पण उद्धव ठाकरे निवडणुकीला उभे राहिले नाहीत मात्र त्यावेळच्या प्रचारात मात्र त्यांनी भाग घेतला.

९५ सालच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी सेनेच्या उमेदवारांसाठी १०० प्रचारभा घेतल्या. राज ठाकरे यांनी तब्बल १५० सभा घेतल्या तर उद्धव ठाकरे ८० सभांना उपस्थित होते. या निवडणूकीच्या कॅम्पेनिंग मधील गाणी निवडण्यापर्यंत प्रत्यके गोष्टीत हे दोन्ही भाऊ आघाडीवर होते.

छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्याचा फायदा राज व उद्धव यांना झाला होता. सामनाच्या ऑफिस मध्ये दोघांची केबिन बनवण्यात आली होती. शिवसेनेत नवीन सत्ताकेंद्र उदयास आले होते.

त्यावर्षीच्या निवडणुकीत शरद पवार मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेसचा दरारून पराजय झाला. अपक्ष आमदारांच्या मदतीने शिवसेना भाजप युती सरकार सत्तेत आले. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये राजसमर्थकांची संख्या देखील लक्षणीय होती. राज यांनी हट्टाने आपल्या समर्थकांना मंत्रीपदे मिळवून दिली होती. 

राज यांची वाढती ताकद पक्षातील जुन्या नेत्यांना जाचत होती. यात समावेश होता मनोहर जोशी यांचा.

मनोहर जोशी हे शिवसेना स्थापनेच्या वेळेपासूनचे शिवसैनिक. बाळासाहेबांचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता म्हणूनच युतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली होती. दादर हा मनोहर जोशी यांचा बालेकिल्ला. राज ठाकरे यांचे याच भागात वर्चस्व वाढत चालले होते. राज यांचे राहत घर देखील कृष्णकुंज दादरला होते. त्यांच्या मातोश्री कन्स्ट्रक्शन या कंपनीचे झोपडपट्टी पुनर्विकास व बरेच उद्योग दादर मध्ये चालले होते. मनोहर जोशींना हे आव्हान वाटू लागले.

या काळातला एक किस्सा सांगितला जातो कि एकदा राज ठाकरे यांनी कोकणात शिवसेनेची कार्यकर्ता नोंदणी कार्यक्रम सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी सेनेतल्या एका मंत्र्याला या कार्यक्रमाची जबाबदारी दिली. पण त्या मंत्र्याने उलट राज ठाकरे यांनाच खडसावले,

“तुम्हाला एका मंत्र्याला आदेश देण्याचा अधिकार कोणी दिला ?”

पक्षातील कार्यकर्त्यांना सूचना दिली गेली होती की राज ठाकरे व त्यांच्या समर्थकांनी सुरु केलेला कार्यक्रम प्रमुख नेतृत्वाने स्पष्ट आदेश दिल्याशिवाय पूर्ण करू नयेत. ही घटना म्हणजे राज ठाकरे यांचे पक्षातील पंख कापण्यास सुरवात आहे असे मानण्यात आले.

काही शिवसेना नेत्यांनी आपल्या केबिनमध्ये राज ठाकरे यांचे फोटो लावले होते ते देखील काढून टाकण्याचे आदेश आले. रमेश किणी प्रकरणानंतर राज यांचे पाय आणखी गोत्यात आले.

असं म्हणतात की राज ठाकरे राहायला मातोश्री पासून दूर असल्यामुळे त्याचा तोटा त्यांना झाला.

मातोश्रीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नेत्याला किंवा कार्यकर्त्याला शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहचायचे झाले तर उद्धव ठाकरे आणि त्यांची वहिनी स्मिता ठाकरे यांच्या मार्फतच जावे लागे. उद्धव यांनी हि संधी साधून पक्षात आपली जागा मजबूत केली. या साऱ्याचा परिपाक म्हणून उद्धव ठाकरे हे शिवसेना कार्याध्यक्ष बनले आणि काही काळातच राज यांनी पक्ष सोडला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.