मिशनऱ्यांनी हल्ला केला तेव्हा राज ठाकरे सिंधुताईंच्या मदतीला धावले होते

आई-वडिलांना मुलगी नको होती. ही मुलगी नकुशी होती म्हणून नाव चिंधी ठेवलं. जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतर ही कायमच राहिला. नवऱ्यानेच चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाळीत टाकलं. आयुष्यात भीक मागून खायची वेळ आली. मग जगण्यासाठी शेवटी स्मशान गाठलं. पण समोर आलेल्या संकटांच्या छाताडावर बसून त्यावर मात केली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं.

‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांचा असा काट्याकुट्यांचा जीवनप्रवास. अशा या मेळघाटातील सावित्रीबाई फुले आश्रमात अनाथांना जगविणाऱ्या सिंधूताई सपकाळांवर मिशनऱ्यांनी हमला केला होता. त्यासंदर्भात त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.

तर माईंच्या आयुष्याची फरफट सुरूच होती. अशातच रस्त्याच्या कडेला भीक मागणाऱ्या सिंधू माईंना आकाशवाणीवर गाऊन ३५० रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे २ कार्यक्रम झाले, आणि जमा झालेले पैसे घेऊन माई चिखलदर्‍याला परतल्या. एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदर्‍याला आणली.

त्याचवेळी महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावांतील आदिवासी निर्वासित होणार होते. आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीच लक्ष देत नाही, हे पाहून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर २-३ मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला, आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही, असं आश्वासन माईंना दिलं.

अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा अनेक लढाया त्यांना रोजच लढाव्या लागत होत्या.

चिखलदर्‍याचा परिसर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथालय त्यांना त्या परिसरात नको होतं. त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला.

‘तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देतो’

म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणार्‍या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडाण्यास दडपण आणलं गेलं. मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला, तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या. अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य. पण एवढं होऊनही माई चिखलदर्‍यातून पळ काढत नाही, हे पाहून मिशनर्‍यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एका महिन्यातच दोन हल्ले झाले. माई तरीही बधल्या नाहीत.

अशातच त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला, २२ एप्रिल १९९४ ची ही घटना. सिंधूताई मुंबईस यायला निघाल्या होत्या. एस. टी. त चढतानाच मिशनऱ्यांच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला.

शेवटी माईंनी आपल्या मानसपुत्राला एक पत्र घेऊन ‘सामना’ कार्यालयात पाठवलं. या पत्रात त्या लिहितात,

जे वाटत होतं तेच घडलं. २२-४-९४ रोजी माझ्यावर प्राणांतिक हल्ला झाला. तो होणारच होता. मी चालू ठेवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर ज्युडो-कराटे प्रशिक्षण केंद्रात अनेक बालवीर तयार होणार व उद्या अन्यायाविरुद्ध लढणार. हिंदुत्व फुलणार. धर्मजागृती होणार. ही बाब मिशनन्यांना सहन होणारी नाही म्हणून माझ्यावर हमला करून मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न झाला.

हा काही पहिला हमला नाही. याअगोदर दोन हल्ले झाले आहेत. तरीही मी अजून जिवंत आहे. हिंदुत्वाची ऊर्मी मरू देत नाही. मात्र आज अनाथांची माय पोटात हातपाय घेऊन पडली आहे. एक महिन्याने मी पुन्हा उठून उभी होईन. आपणापर्यंत येईन. मात्र तोपर्यंत माझ्या लेकरांच्या तोंडी चार घास भरवा. आपणापर्यंत माझ्या मानसपुत्राला पाठवत आहे. त्याला रिकाम्या हाती पाठवू नका.

हे पत्र लिहून सिंधूताईंनी आश्रमातील अनाथांना जगवा, अशी विनंती राज ठाकरेंना केली. त्यांनीही अमरावतीस संपर्क साधून अन्नपाण्याची सोय केली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.